MPSC पेपरफुटीचा धक्कादायक ‘लव्ह अँगल’; प्रेयसी पास, प्रियकर नापास, ब्रेकअपनंतर तक्रारीने फुटलं पेपरफुटीचं बिंग

MPSC Paper Leak

विशेष प्रतिनिधी

मुंबई : : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे. प्रेयसी परीक्षा उत्तीर्ण झाली, मात्र प्रियकर अपयशी ठरला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि ब्रेकअपनंतर प्रियकराने केलेल्या तक्रारीमुळे कथित पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

या प्रकरणामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. यामध्ये MPSCच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

पेपरफुटीचा कथित प्रकार नेमका कसा समोर आला?

मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदाची परीक्षा देणाऱ्या ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यात प्रेमसंबंध होते. तपासातील माहितीनुसार, परीक्षेच्या काही दिवस आधी ऋतुजाच्या वडिलांनी एका दलालाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे.

ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी कथितरित्या प्रवीण पाटील नावाच्या दलालाची मदत घेतल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. प्रश्नपत्रिका ऋतुजाच्या हाती आल्यानंतर तिने ती आपल्या प्रियकर गौरव पाटील याच्यासोबतही शेअर केल्याची माहिती आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदासाठी चाळणी परीक्षा झाली. निकालानंतर ऋतुजा परीक्षा उत्तीर्ण झाली, मात्र गौरव अपयशी ठरला. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्याचे सांगितले जाते.

ब्रेकअपनंतर प्रियकराची थेट तक्रार

दोघांचे संबंध बिघडल्यानंतर गौरव पाटीलने कथित पेपरफुटीबाबत MPSCकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या तक्रारीमुळे संपूर्ण प्रकरण तपासाच्या कक्षेत आले.

विशेष म्हणजे, तक्रार केल्यानंतर गौरवने पुन्हा MPSCला ई-मेल करून आपण मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गौरव पाटीलला अटक केली असून ऋतुजा पाटीलला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


अप्पर सचिवांसह सहा जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. यामध्ये आयोगाचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे.

पेपरफुटीमध्ये प्रश्नसंच उमेदवारापर्यंत कसा पोहोचला, त्यामध्ये कोणाची भूमिका होती आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे.

MPSCने भरती प्रक्रिया रद्द केली

पेपरफुटीच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.

त्यामुळे आता या पदासाठी नव्याने फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

४८८ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

२२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुलाखतीसाठी ५०६ उमेदवार पात्र ठरले.

यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ जुलै ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर आयोगाने २२ जुलै रोजी औषध निरीक्षक पदासाठी पात्र ४८५ आणि अपात्र ३, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती.

मात्र, त्यानंतर समोर आलेल्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता फेरपरीक्षेनंतरच या भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा पार पडणार आहे.

Shocking ‘Love Angle’ in MPSC Paper Leak

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात