रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या आत्महत्येचे कारण समोर; कुटुंब अंत्यविधीसाठी गावी, घरात चोरी

विशेष प्रतिनिधी

बारामती : आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुलीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीय गावी गेले असतानाच बारामतीतील त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील रुई परिसरात आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मृत्यूची परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे तसेच अन्य परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे तपास सुरू केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांना सखोल तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी मंगळवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी इमारतीच्या जिन्यातून वरच्या दिशेने जाताना दिसत असून, त्यानंतर सहाव्या मजल्यावरून तिने उडी घेतल्याचे फुटेजमधून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातही मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात अन्य कोणतेही कारण किंवा व्यक्तीचा सहभाग आढळून आलेला नसल्याने प्रकरणाची नोंद आत्महत्या म्हणून करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


घर बंद असताना चोरट्यांचा डल्ला….

एकीकडे मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच दुसरीकडे त्यांच्या बारामतीतील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या अंत्यसंस्कार व इतर विधींसाठी कुटुंबीय इंदापूर तालुक्यातील सणसर येथील जाचक वस्तीवर गेले होते. त्याच काळात अज्ञात व्यक्तींनी बारामतीतील घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.
या चोरीत नेमके काय चोरीला गेले आणि किती रकमेचा किंवा वस्तूंचा मुद्देमाल लंपास झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबीयांची तक्रारीची इच्छा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे…

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत माहिती देताना, चोरट्यांच्या हाती विशेष काही लागले नसल्याचे सांगितले. तसेच संबंधित कुटुंबीयांची सध्या तक्रार दाखल करण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलीच्या आत्महत्येचा तपास पूर्णत्वाकडे जात असतानाच कुटुंबीयांच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आल्याने या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे कोणतेही संकेत पोलिसांकडून देण्यात आलेले नाहीत.

Suicide Cause Revealed in Rohit Pawar’s PA’s Daughter’s Death; Burglary at Family Home Too

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात