नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप धुडकावला. शिवसेनेच्या फुटीवर शिक्कामोर्तब केले. स्वतः एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन भाजपच्या श्रेष्ठींच्या आशीर्वादाने टायगरचे ऑपरेशन केले.
समाजवादी पार्टी फुटण्याचे भाकीत
त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटणार असल्याच्या बातम्यांचे पेव फुटले. मोठमोठ्या नेत्यांनी उघडपणे तसे दावे केले. समाजवादी पार्टी फुटणार असल्याचा दावा उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ओमप्रकाश राजभर यांनी केले.
धर्मराव बाबांचे वक्तव्य आणि त्याचा अर्थ
त्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुद्धा फुटण्याची चर्चा सुरू झाली. शरद पवारांनी जरी शिवसेनेच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करण्याची घोषणा केली, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फुटण्याची चर्चा मात्र ते थांबवू शकले नाहीत. उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आम्ही फोडण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच फुटून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. 12 डिसेंबर पर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल आणि त्यांच्या पक्षातले पाच खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
याचा अर्थ असा की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडण्याचे ऑपरेशन टायगर करावे तरी लागले. त्यासाठी कष्ट घ्यावे लागले. फुटणाऱ्या खासदारांना सत्ता पदांची आश्वासने द्यावी लागली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडण्यासाठी कुणाला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. ते खासदार स्वतःहूनच फुटून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येतील. भाजप जो काही सत्तेचा तुकडा देईल, त्यावर ते राजकीय गुजराण करतील, असाच धर्मराव बाबा आत्राम यांच्या म्हणण्याचा आशय निघाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App