विशेष प्रतिनिधी
पुणे : Hadapsar Hospital हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडवण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवादविरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.Hadapsar Hospital
हडपसर भागातील कामधेनू इस्टेटच्या मागील बाजूने हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीला संशयास्पद वस्तू आढळून आली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, वस्तू बॉम्ब सदृश दिसत असतानाही रुग्णालय प्रशासनाने व वरिष्ठ डॉक्टरांनी ती वस्तू पहिल्या मजल्यावरील शौचालयातून बाहेर काढून मोकळ्या मैदानात ठेवली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.Hadapsar Hospital
…तर झाली असती जीवितहानी
हाच जर स्फोट दवाखान्याच्या शौचालयात घडला असता तर जीवित हानीला देखील सामोरे जावे लागले असाही अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, रुग्णालयात किंवा परिसरात मोठा घातपात घडवण्याचा कट होता का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दिसून आलेल्या एका तरुणासह १५ ते १७ जणांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आयईडी अत्यंत सराईतपणे बनवल्याचे उघड
आयईडी अत्यंत सराईतपणे बनवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या मागे प्रशिक्षित किंवा स्फोटकाबाबत माहिती असलेल्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्तालय , एटीएस सह विविध तपास पथके या प्रकरणाचा समांतर तपास करत असून, फॉरेन्सिक विभाग आणि बीडीडीएसने घटनास्थळावरील नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने पुढील परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App