विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dattatray Bharne इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाच, याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम होणार असून, देशातील माल निर्यात न झाल्याने बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली असून, भविष्यात युरिया खताच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Dattatray Bharne
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. भारताचा शेतीमाल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होतो, मात्र देशातील शेतीमाल बाहेर जात नसल्याने बाजारभावावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे. “निर्यात ठप्प झाल्याने बाजारात मालाची आवक वाढली असून भाव पडले आहेत. तसेच, खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास भविष्यात युरियाचा तुटवडा भासू शकतो, त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे लागेल,” असे मंत्री भरणे यांनी सांगितले.Dattatray Bharne
अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई जाहीर
राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अहवाल प्राप्त होताच मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दरम्यान, १७ एप्रिलनंतर तापमानात मोठी वाढ होणार असून ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकणातील काजू शेती संकटात
कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेला काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी यंदा हवामान बदलामुळे उद्ध्वस्त झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे काजूच्या उत्पादनात तब्बल ६० ते ६५ टक्क्यांची घट झाली आहे. वाढते तापमान आणि अवेळी आलेला पाऊस यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. कोकणात आलेले थोडेफार उत्पन्नही आता नैसर्गिक आपत्ती आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे वाया जात असल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे.
‘शेकरू’चा त्रास, पण भरपाईचा पत्ता नाही!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांसमोर आता एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. राज्याचा राज्य प्राणी असलेला ‘शेकरू’ आता काजूच्या कोवळ्या बिया खाऊन बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. सर्वात मोठी अडचण म्हणजे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान भरपाई देणाऱ्या शासकीय यादीत ‘शेकरू’ या प्राण्याचा समावेश नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान होऊनही शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत मिळत नाही. शेकरूचा समावेश नुकसान भरपाईच्या यादीत करावा, अशी आर्त हाक सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App