वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Sunil Tatkare राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.Sunil Tatkare
सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. “नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मतदारसंघातील व राज्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच त्यांचे मार्गदर्शन घेतले,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. मात्र, अवघ्या चोवीस तासांत गृहमंत्री आणि पंतप्रधानांची घेतलेली भेट केवळ विकासकामांपुरती मर्यादित नसून यामागे मोठे राजकीय गणित असल्याचा दावा विश्लेषक करत आहेत.Sunil Tatkare
शरद पवार गटाचीही ‘शाह-भेट’; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देईल, अशा राजकीय अफवा रंगल्या आहेत. दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांनी या भेटींचे कारण ‘प्रलंबित विकासकामे आणि मतदारसंघातील प्रश्न’ असे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष बैठकीत कोणत्या गुप्त मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा तपशील दोन्ही बाजूंकडून अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या भवितव्यावर पुन्हा चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)शी संवाद वाढत असल्याच्या चर्चांनाही बळ मिळाले आहे.
एका बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सलग दिल्ली भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणापासून ते एनडीएतील नव्या राजकीय समीकरणांपर्यंत अनेक शक्यता चर्चेत आहेत.
मात्र, या सर्व भेटी विकासकामे आणि प्रलंबित प्रशासकीय विषयांपुरत्याच मर्यादित असल्याचे संबंधित नेत्यांकडून सांगितले जात असले, तरी भेटींमागील राजकीय अर्थ काय, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App