नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, असा गंभीर सवाल राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिटला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली पण या वेळच्या चर्चेचे वैशिष्ट्य असे, की ही विलीनीकरणाची चर्चा जाहीरपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरू केली. त्यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके आणि पिंपरीचे आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे आघाडीवर आले. या दोन्ही नेत्यांनी विलीनीकरणाविषयी अनुकूलता व्यक्त करून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करायला सांगितले.
– पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा आग्रह
यापूर्वीची विलीनीकरणाची चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावून धरली होती त्यामध्ये रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अमोल कोल्हे हे नेते आघाडीवर होते. कारण त्यांनाच विलीनीकरणानंतर सत्तेचे लाभ मिळणार होते. पण अजित पवारांची अकाली एक्झिट झाल्याने विलीनीकरणाच्या चर्चेला “ब्रेक” लावण्यात आला. या दरम्यान सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रवादीत प्रस्थापित होत असताना दोन महिन्यांनी विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू करण्यात आली.
पण त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, असा गंभीर सवाल समोर आला.
– पवार जिथे, धोका तिथे!!
कारण शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा एकूण आढावा घेतला तर शरद पवार ज्या राजकीय पक्षात राहिले किंवा गेले तिथल्याच नेतृत्वाला त्यांनी आव्हान देऊन सुरुंग लावण्याचा इतिहास सांगतो. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या गुरुचे न ऐकता वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले. 1980 मध्ये यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर सुद्धा शरद पवार त्यांच्याबरोबर गेले नाहीत. त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्वतंत्र चूल मांडून पाहिली. 1986 मध्ये राजीव गांधींच्या आवाहनावरून शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. पण काँग्रेसमधल्या प्रस्थापित नेत्यांना त्यांनी त्रास दिला. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे, विठ्ठलराव गाडगीळ यासारख्या बड्या काँग्रेस नेत्यांना त्रास देण्यातच पवारांनी धन्यता मानली. त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरुद्ध सुद्धा बंड करून पाहिले. पण सोनिया गांधी यांच्याविरुद्धचे बंड अपयशी ठरल्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांच्यापुढे शरणागती पत्करून स्वतःची राजकीय कारकीर्द बचावली.
– सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला सुरुंग लावायचा “डाव”??
आता जेव्हा सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व प्रस्थापित होऊ लागले आहे, त्यावेळी अचानक दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू करून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व पक्केपणाने प्रस्थापित होण्याआधीच त्यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावण्याचा शरद पवारांचा “डाव” तर नाही ना??, अशी शंका पवारांच्याच राजकीय इतिहासातल्या अनुभवानंतर आली असल्यास त्यात नवल काही नाही.
– प्रोबेशन पीरियड
कारण कुठलेही नेतृत्व प्रस्थापित व्हायला आणि त्या नेतृत्वाची मांड पक्की व्हायला वेळ लागतो. त्यामध्ये संबंधित नेतृत्वाचा आणि विरोधकांचाही कस लागत असतो. सुनेत्रा पवारांच्या बाबतीत अजून या कसोट्या पार व्हायच्या आहेत. सुनेत्रा पवारांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून “प्रोबेशन पिरियड” सुरू आहे. अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला 25 – 30 वर्षे लागली. तेव्हा कुठे त्यांच्यासारखे उप प्रादेशिक नेतृत्व तयार होऊ शकले. सुनेत्रा पवारांचे नेतृत्वाचे बीज आता कुठे पेरले गेले आहे. त्याला अजून अंकुरही फुटलेला नाही. सुनेत्रा पवार या माहेरून आणि सासरून कितीही राजकीय पार्श्वभूमीच्या नेत्या असल्या, तरी त्यांचे स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित होणे इतके सोपे नाही.
– सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वा भोवती संरक्षक कवच
सुनेत्रा पवारांपुढे अजून बरीच आव्हाने यायची आहेत. त्यांच्या नेतृत्वा भोवती सध्या तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वांचे कवच आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांच्याही नेतृत्वांवर आघात करतात पण ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर आघात करत नाहीत किंवा आघात करायला धजावत नाहीत कारण पटेल आणि तटकरे हे एक वेगळ्या प्रकारची ढाल बनून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचे राजकीय संरक्षण करत आहे. त्या पलीकडे जाऊन भाजप मधल्या वरिष्ठ नेत्यांचे संरक्षण कवच सुनेत्रा पवारांना लाभले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे नेतृत्व आजही एका सुरक्षित कवचात आहे.
– सुनेत्रांचा पत्ता टाकल्याशिवाय सुप्रियांचे नेतृत्व अशक्य
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले, तर पवार एकदम त्या पक्षाच्या पितृस्थानी येतील. आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते शरद पवारांना पितृस्थानी जरूर मानतात पण निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांना स्थान देत नाही किंबहुना त्यांची लुडबुड होऊ देत नाहीत. पण एकदा का दोऊ राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले, तर पवारांचे नेतृत्व हे केवळ पितृस्थानी राहणार नाही, तर त्यांची थेट लुडबुड राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत होईल आणि तिथे शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांचे पत्ते कापल्याशिवाय राहणार नाहीत. यातला एक प्रमुख पत्ता थेट सुनेत्रा पवारांचा असू शकतो. कारण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा पत्ता कापल्याशिवाय आता सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पवारांना प्रस्थापित करता येण्याची शक्यता नाही.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा कितीही गोड वाटली आणि ती “पवार बुद्धीच्या” माध्यमांना हवीहवीशी वाटली तरी ही प्रक्रिया अजिबात सोपी नाही किंबहुना या चर्चेमुळे किंवा प्रत्यक्ष विलीनीकरणामुळे सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, या गंभीर सवालाला तोंड देणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कठीण जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App