आक्रमक सोलापुर पुढे राष्ट्रवादी नमली, उजनीतले पाणी पळवण्याचा आदेश रद्द

इंदापुरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या मतदारसंघालगतचा जिल्हा म्हणून सोलापुरचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मात्र भरणे यांना दुष्काळी असणाऱ्या आख्या सोलापुर जिल्ह्यापेक्षाही स्वतःच्या मतदारसंघाचे हित महत्त्वाचे वाटले. त्याला बारामतीच्या अजित पवारांनी आणि इस्लामपूरच्या जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनीही मूक संमती दिली. यातून उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पळवण्याचा घाट घातला गेला. पण या कारस्थानाविरुद्ध सोलापूर जिल्हा पेटून उठला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यापुढे नमावे लागले. NCP defensive in front of aggressive Solapur, proposal to lift 5 TMC water from Ujani dam postponed


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने बांधण्यात आलेल्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला तब्बल पाच टीएमसी पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा आदेश उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या सरकारने दिला होता. हा आदेश मागे घेत असल्याचे मंगळवारी (दि. 18) ठाकरे-पवार सरकारने जाहीर केले.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सोलापुरच्या हक्काचे पाणी पळवण्याचा नियोजनबद्ध डाव आखला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याविरोधात सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी एकच आवाज उठवला. भाजपाच्या आमदारांनी आंदोलनाचा इशारा देत जिल्हा ढवळून काढला. यामुळे सोलापुरी जनता खवळली. सोलापुरचे पालकमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा सोलापुरकरांनी दिला. जनतेमध्ये तीव्र रोष असल्याचे लक्षात आल्याने उजनीतून पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश रद्द करण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

अर्थात या नुसत्या घोषणेला जनता भुललेली नाही. “या संबंधीचा लेखी आदेश निघत नाही तोवर सोलापुर जिल्ह्यातील नागरिक ठाकरे-पवार सरकारच्या घोषणेवर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे भाजपाचे सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे पंढरपुरातील विठ्ठल मंदिराजवळील आंदोलन शुक्रवारी होणारच,” असे, भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीर केले. जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी सांगितले, “अजित पवारांवर सोलापुरच्या शेतकऱ्यांचा विश्वास नाही. अजित पवारांच्या सांगण्यावरुनच पाणी पळवण्याचे कटकारस्थान रचले गेले होते. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. गावोगावी या विरोधात ठराव झाले आहेत. वरीष्ठ उधिकारी उजनीच्या गेटवर येऊन 22 एप्रिलचा आदेश रद्द केल्याचे लेखी आश्वासन देत नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहील.” अन्यथा चार दिवसांनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्हाबंदी करु, असा इशारा देशमुख यांनी दिला.प्रस्ताव काय होता

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून येणारे सांडपाणी इंदापूर तालुक्याला देण्यासाठी शेटफळ गढी उपसा जलसिंचन योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौऱ्यात दिली होती. तेव्हापासून ठाकरे-पवार सरकारची नियत ठीक नसल्याचा संशय सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला.

लोकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर भरणे यांनी उजनीतून एक थेंबही पाणी नेणार नसल्याचे आश्वासन सोलापुरच्या जनतेला दिले. मात्र भरणे यांचे हे वक्तव्य म्हणजे राजकीय थापेबाजी असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. कारण स्वतःच्या मतदारसंघात, इंदापुरात गेल्यानंतर तेथील जनतेपुढे बोलताना भरणे यांनी शब्द फिरवला. इंदापुरच्या कार्यकर्त्यांसमोरच्या त्यांच्या भाषणाचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला.

‘यह तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है’ असे सांगत भरणे यांनी उजनीतून इंदापूर व बारामतीसाठी पाणी उचलण्याच्या योजना कशा तयार केल्या आहेत, याची फुशारकी मारली होती. भरणे यांच्या या भाषणावरुन सोलापुरचे पाणी इंदापुर-बारामतीसाठी पळवणार असल्याचे सोलापुरी जनतेला चांगलेच समजले. ही केवळ चर्चा नसल्याचेही पुढे स्पष्ट झाले. कारण ठाकरे-पवार सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाने खडकवासला उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे थेट आदेशच २२ एप्रिलला काढले होते.

यानंतर मात्र भरणे आणि अजित पवार इंदापूर-बारामतीला पाणी पळवून नेणार अशी खात्री सोलापुरच्या जनतेला झाली. त्यामुळे सांगोले, मंगळवेढे, माळशिरस, माढा, मोहोळ या तालुक्यातल्या दुष्काळी भागातून जोरदार विरोध सुरु झाला. भरणे-पवार यांच्या विरोधात वातावरण तापू लागले. भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला. लोकांची तीव्र प्रतिक्रिया पाहून जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनीही सरकारविरोधी मत मांडायला सुरुवात केली. अखेरीस जलसंपदा विभागाने सर्वेक्षण रद्द करण्याचे जाहीर केले.

उजनीत नाही अतिरीक्त पाणी

उजनी धरणात अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. मुळातच ज्या भीमा नदीच्या खोऱ्यात हे धरण आहे ते भीमा खोरेच तुटीचे आहे. उजनी जलाशयातून मराठवाड्यालाही पाणी मंजूर केले आहे. त्यात पुन्हा बारामती-इंदापूरसाठी पाच टीएमसी उचलण्याचा डाव आखला जात होता. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे 6.90 टीएमसी सांडपाणी खडकवासला कालव्यात नेण्याचा मार्ग जलसंपदा विभागाने सुचवला आहे.

NCP defensive in front of aggressive Solapur, proposal to lift 5 TMC water from Ujani dam postponed

महत्वाच्या बातम्या