माध्यमांनी केले “स्टार”; राजकारणात पडले “गार”…!!


मराठी माध्यमांनी आत्तापर्यंत अनेकांना राजकीय मेगास्टार केले आहे. त्यांच्या आगे – मागे भरपूर ओबी व्हॅन फिरविल्या आहेत. हजारोंनी मोठ-मोठ्या पदांच्या बातम्या छापल्या आहेत. पण यापैकी एकाही नेत्याचे राजकीय कर्तृत्व माध्यमे वाढवू शकलेली नाहीत की राजकारणातले त्यांच्या इच्छेचे (desired) यश मिळवून देऊ शकलेली नाहीत. त्यासाठी मूलभूत राजकीय कर्तृत्वच मोठे लागते. माध्यमांचा ९९.९९ टक्क्यांचा शॉर्टकट त्यासाठी उपयोगाचा नाही. Marathi Media siege mentality; they can make star campainers but not real political stars


भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्या समर्थकांसमोर केलेल्या जोरदार भाषणाचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी देखील तितकेच जोरदार केले. त्यांच्या भाषणात प्रेम कोणावर… ?? आणि नेम कोणावर…?? याचे विश्लेषण पण अगदी अचूक केले. पण तरीही मराठी माध्यमांच्या काकदृष्टीतून एक पंकजा जे बोलल्या ती एक गोष्ट निसटून गेली, ती म्हणजे त्यांनी माध्यमांची आपल्या भाषणात जी स्तुती केली, त्याला मराठी माध्यमांनी फारसे हायलाइट केले नाही.

त्या म्हणाल्या, माध्यमांनी आपले रिपोर्टिंग बरोबर केले. अगदी ९९.९९ टक्के रिपोर्टिंग बरोबर केले. प्रीतमताईंची पात्रता असताना त्यांना मंत्रिपद नाकारले गेले. त्यामुळे माझी – तुमची नाराजी आहे, वगैरे बातम्या दाखविल्या. त्यांनी खरे तेच दाखविले. पण माध्यमांनी आपली पंकजा मुंडे यांनी केलेली स्तुती फारशी हायलाइट केली नाही.

पण याचा दुसरा अर्थ असा, की माध्यमांकडे पोहोचलेल्या नाराजीची स्क्रिप्ट पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी स्वतःच लिहिली होती. म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांमधून जे साध्य करायचे होते, ते पंकजा आणि माध्यमांनी संगनमताने साध्य करून घेतले. हरकत नाही. एवढे मोठे राजकारण मराठी माध्यमांच्या माध्यमातून पंकजा मुंडे साध्य करून घेत असतील, तर त्यांच्या राजकीय बुध्दिमत्तेला दाद द्यायला पाहिजे… सलाम केला पाहिजे.

पण इतिहासात जरा (जराच बरं का… फार नाही) मागे वळून पाहिले तर माध्यमांनी ज्यांना स्टार बनवले त्यांचे राजकारणात पुढे काय झाले हे पाहिले आहे, का पंकजा मुंडे यांनी…??

नजीकच्या राजकीय इतिहासात मराठी माध्यमांनी कुणाकुणाला, कुठले – कुठले स्टार केले होते…?? शरद पवारांना, राज ठाकरेंना, पंकजा मुंडेंना, नाना पटोलेंना, नारायण राणेंनी शिवसेनेतून बंड केले तेव्हा त्यांना, अगदीच काय पण खुद्द पंकजा मुंडे यांचे मामा प्रमोद महाजनांना आणि वडील गोपीनाथ मुंडे यांना माध्यमांनी त्या त्या वेळी स्टार केले आहे.

ही सगळी राजकीय कर्तृत्ववान मंडळी आहेत आणि होती यात कोणतीही शंका नाही. अजिबात नाही. त्यांचे महाराष्ट्रातल्या राजकारणातले महत्त्व फार मोठे आहे आणि होते यातही अजिबात शंका नाही.

पण मग माध्यमांनी त्यांच्या चलतीच्या काळात त्यांना जेवढे “मोठे” दाखविले तेवढे मोठे यश या नेत्यांना राजकारणात मिळाले आहे काय…?? किंवा माध्यमांनी मिळवून दिले आहे काय…?? तर याचे उत्तर मोठ्ठे नकारार्थी आहे.

महाजन – मुंडे महाराष्ट्रातलीच काय, पण देशातली मोठी जोडगोळी होती. महाराष्ट्रात आणि देशात भाजप रूजविण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतले होते. भाजपचे स्टार कँपेनर असे त्यांना बिरूद माध्यमांनी लावले होते. पण या दोन्ही नेत्यांचे “स्टार कँपेनत्व” महाराष्ट्रात भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनवू शकले होते काय…?? या दोघांपैकी एकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याएवढे बळ माध्यमांनी त्यांना स्टार बनविल्यामुळे मिळू शकले होते काय…?? याचे उत्तर शोधायला गेले असता मोठा नकारच मिळतो.

महाजन आणि मुंडे हे दोन्ही मोठे नेते आज हयात नाहीत. त्यांची राजकीय पुण्याई त्यांच्या वारसांच्या सध्या कामी येते आहे.

पण जे नेते आज हयात आहेत, की ज्यांना त्यांच्या चलतीच्या काळात मराठी माध्यमांनी स्टार हे बिरूद लावले त्यांना तरी तेवढे मोठे यश राजकारणात मराठी माध्यमे मिळवून देऊ शकली आहेत का…?? शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी शंका नाही. पण गेली ३० वर्षे शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या त्यांची संख्या प्रत्येक पेपरवाइज आणि चॅनेलवाइज मोजली तर १० हजारांच्या पुढेच भरेल. पण मग झाले का शरद पवार पंतप्रधान…?? बरं पंतप्रधानपदाचे सोडा… गेली साधारण ५ ते ७ वर्षे शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या मराठी माध्यमे तिखट – मीठ लावून देत आहेत. मग मराठी माध्यमांनी दिले का त्यांना राष्ट्रपतीपद मिळवून…?? याचेही उत्तर मोठ्ठे नकारार्थी आहे.

मनसे पक्षाच्या पदार्पणातच राज ठाकरे यांना १३ आमदारांची घसघशीत बक्षिसी महाराष्ट्राच्या जनतेने दिली होती. राज ठाकरे हे त्याच्याही आधीपासून स्टार कँपेनर आहेत. ते आधी शिवसेनेचे स्टार कँपेनर होते. आता मनसेचे स्टार कँपेनर आहेत. पण त्यांचा राजकीय प्रवास मराठी माध्यमे स्टार कँपेनर पदाच्या पुढे नेऊ शकली आहेत काय…?? राज शिवसेनेत असताना त्या पक्षाला विधानसभेचा १०० आकडा गाठता आला होता का…?? आता ते मनसेचे स्टार कँपेनर असताना त्यांची राजकीय कामगिरी मराठी माध्यमे आकडेवारीत रूपांतरित करू शकली आहेत काय…?? मनसेचे आमदार, नगरसेवक वाढू शकले आहेत काय…?? याचेही उत्तर तितकेच नकारार्थी आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेने विजनवासात टाकले. तेव्हा त्यांना माध्यमांनी स्टार बनविले. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या आगेमागे जेवढ्या ओबी व्हॅन फिरवल्या नाहीत, त्यापेक्षा जास्त ओबी व्हॅन ते शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्याभोवती फिरविल्या. पण जास्त ओबी व्हॅन फिरवून माध्यमांना नारायण राणेंचा राजकीय विजनवास संपविता आला नाही… तो बारा वर्षांनंतर मोदींनी संपविला. पण तेव्हा राणेंचा माध्यमी स्टारडम संपला होता… माध्यमांनी त्यांच्या मुलांना स्टारडम द्यायला सुरवात केली आहे.

पंकजा मुंडे बोलल्यात ते खरेच आहे. माध्यमांनी ९९.९९ टक्के काम केलेच आहे. पण त्यातला उरलेला जो ०.१ टक्का जो आहे, ना… तो राजकारणातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा निर्णायक यशाचा आहे. आणि तो मराठीच काय पण कोणत्याही भाषेतली आणि कोणत्याही देशातली माध्यमे कधीच देऊ शकत नाहीत. समर्थकांना महाभारतातल्या गोष्टी सांगून टाळ्या आणि माध्यमांचे स्टार कँपेनर हे पद नक्की मिळेल… पण खरा प्रश्न आहे, तो राजकीय कर्तृत्वाचा आणि राजकारणात निर्णायक यश मिळविण्याचा…!! ते कुठून आणणार…??…

Marathi Media siege mentality; they can make star campainers but not real political stars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण