मरायचे नसेल तर वर्कींग स्टाईल बदला लवकर

कोरोना महामारीमुळे जगात अनेक चांगले-वाईट बदल झाले आहेत. सततचे लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे एकीकडे प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे शहरांमध्येही लोकांना शुद्ध हवा मिळू लागली आहे. पण त्याचवेळी नव्याने रुजलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ऑफिसचे तासही वाढवले आहेत. या ‘न्यू नॉर्मल’ ठरत असलेल्या ‘वर्कींग स्टाईल’मुळे लाखो जणांचा जीव जाण्याची धोक्याची घंटा जागतिक आरोग्य संघटनेनं सादर केलेल्या अहवालामुळे वाजली आहे. If you don’t want to die, change your working style soon; WHO warns people about working habits changed due to Covid-19 pandemic


वृत्तसंस्था

जिनिव्हा : कोरोना विषाणूने जगात उच्छाद मांडण्यापूर्वीचे दिवस जरा आठवा. ऑफिस वेळेत गाठण्याची धडपड असायची. ऑफिस सुटल्यावर घरच्या ओढीनं वाट काढण्याची लगबग असायची. ओव्हरटाईम केला तर बोनस किंवा किमान बॉसची शाबासकी तरी मिळायची. पण कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मलमध्ये हे सगळंच चित्र बदलून गेलं आहे. वर्क फ्रॉम होममध्ये किती तास काम करावं लागतं याचा हिशोबच राहिलेला नाही. विशेषतः आयटी, बँकींग क्षेत्रातल्या लोकांना याचा फटका जास्त बसतोय. याच सलग काम करण्याच्या सवयीमुळे दरवर्षी जगात लाखो लोकांचा बळी जातो आहे.

होय, हे खरं आहे. पीसीवर किंवा लॅपटॉपवर तासनातस खुर्चीत बसून काम करणं हे फार आरोग्यदायी नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) या संदर्भात इशारा दिला आहे. सलग तास न तास काम करण्याची घातक सवय कोरोनाच्या साथीमुळे जगभरच्या लोकांना लागली आहे. या संदर्भातला पहिला अहवाल डब्ल्यूएचओने प्रकाशित केला आहे. सन 2016 मध्ये सलग तास न तास काम केल्याने तब्बल 7 लाख 45 हजार लोक जगभरात मृत्यूमुखी पडले असल्याचे यात म्हटले आहे. सन 2000 च्या तुलनेत हे प्रमाण थेट 30 टक्क्यांनी वाढले आहे. हृदय संबंधित विकारांमुळे हे सर्व मृत्यू झाले आहेत.डब्ल्यूएचओचे तांत्रिक अधिकारी फ्रँक पेगा यांनी या संदर्भात खुलासा केला –

“आमच्याकडे असे काही पुरावे आहेत ज्यावरुन दिसतं की जेव्हा देशात लॉकडाऊन जाहीर होतो तेव्हा कामाचे तास दहा टक्क्यांनी वाढतात. याच्याच जोडीला आर्थिक ताणदेखील वाढलेले आहेत. डिजिटलायझेशनमुळे कामांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या डिजिटलकरणामुळेच कामापासून डिस्कनेक्ट होणं लोकांना अवघड झालं आहे.”

जगातल्या पंधरा देशांमध्ये डब्ल्यूएचओ आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने अभ्यास करुन या संबंधीचा अहवाल तयार केला. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की बळी पडलेल्यांपैकी बहुसंख्य म्हणजे 72% पुरुष होते. साधारण हे सगळेच मध्यमवयीन किंवा त्याहून थोडेसे प्रौढ होते. वाढलेल्या तासांमुळे हृदय संबंधित विकारांना बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह आग्नेय आशिया आणि प्रशांत महासागर भागातल्या देशांमध्ये आहे.

एकूण 194 देशांमधील आकडेवारीवरुन असे लक्षात आले की आठवड्याला 55 तासांपेक्षा जास्तीचे बैठे काम केले तर ह्र्द्य विकाराचा धोका 35 टक्क्यांनी वाढतो. आठवड्याला 35 ते 40 तासांचे बैठे काम असेल तर ह्र्दय विकाराने मृत्यूमुखी पडण्याचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो. सन 2000 ते 2016 या दरम्यानच्या काळातील हा अभ्यास आहे. कोरोनाची साथ जगभर पसरल्यानंतरच्या कालावधीचा अभ्यास हे निष्कर्ष काढताना झालेला नाही. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनानंतरच्या काळातील बदलेलली वर्किंग स्टाईल आणि आर्थिक मंदीमुळे या धोक्यांमध्ये वाढ झालेली असेल. सध्याच्या काळात जगातील 9 टक्के लोकांना जास्त काम करावे लागत आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रस गेब्रेयसिस यांनी सांगितले की कोरोना काळातील कामाच्या पद्धतीचा अभ्यास करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. त्या आधारे वर्कींग स्टाईलमध्ये बदल सांगितले जातील. दरम्यान, योग्य प्रमाणात दिलेल्या सुट्ट्या आणि कामाच्या तासांचे नियोजन यामुळे कामगारांची उत्पादकता वाढते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी कामाचे तास मर्यादीत ठेवावेत, असे डब्ल्यूएचओने सुचवले आहे.

If you don’t want to die, change your working style soon; WHO warns people about working habits changed due to Covid-19 pandemic

महत्वाच्या बातम्या