कोरोनामुक्त झाल्यानंतर तुम्ही प्लाझ्मा दान केलं का? मग हे वाचून नाराज होऊ नका

वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आणि या क्षेत्रातले संशोधन यावर सामान्य माणसाने किती विश्वास ठेवावा यावरच आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले तरी आश्चर्य वाटायला नको. कोरोना संसर्गावर यशस्वी मात करणाऱ्यांच्या शरीरात अँटीबॉडीज् (प्रतिपिंडे) तयार होतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधिताला दिल्यास त्याचे प्राण वाचू शकतात, असे सांगितले गेले होते. त्यामुळेच शेकडो जणांनी कोरोनामुक्त झाल्यावर प्लाझ्मा दान केले. यातून आपण कोणाचा तरी जीव वाचवल्याचे समाधान त्यांना मिळत होते. मात्र त्यांचे हे समाधान नव्या संशोधनाने हिरावून घेतले आहे. Are you one of the Plasma donors? …then don’t get upset as plasma therapy has been dropped by ICMR from the treatment guidelines for COVID-19


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमधून प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने सोमवारी रात्री उशीरा रद्दबातल केली.

जगात विविध ठिकाणी झालेल्या संशोधनानुसार प्लाझ्मा उपचारपद्धती कोरोनामुक्त होण्यासाठी फार उपयुक्त नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आयसीएमआरने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या या संस्थेचे राष्ट्रीय कृती दल देशातील वैद्यकीय क्षेत्राला वेळोवेळी उपचारांसंदर्भात शिफारशी करत असते. अर्थात या शिफारशी देशातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना बंधनकारक नसतात.

गेल्यावर्षी आयसीएमआरने चारशे कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचारपद्धतीची चाचणी घेतली होती. याला पीएलएसीआयडी चाचणी म्हणतात. प्लाझ्मा उपचारांमुळे कोरोनाबाधिताच्या प्रकृतीत फार सुधारणा होत नसल्याचे या चाचणीतून स्पष्ट झाले होते. मात्र तरीही अनेक डॉक्टरांनी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली होती.

आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्येही प्लाझ्मा उपचारांचा काहीच फायदा नसल्याचे स्पष्ट झाले. उलट काही शास्त्रज्ञांनी या उपचार पद्धतीमधले दोष प्रकाशात आणले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्लाझ्मा उपचारांमुळे कोरोना विषाणूमध्ये नवे चिंताजनक बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते.

ब्रिटीश वैद्यकीय जर्नल द लान्सेटने 14 मेच्या ताज्या अंकात म्हटले आहे, की ब्रिटनमध्ये पाच हजार कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले. यातून मृत्यूदर कमी करण्यात किंवा रुग्णांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली नाही.

प्लाझ्मा उपचार पद्धतीबाबत कोणताही पुरावा नसताना अनेक ठिकाणी डॉक्टरांनी कोरोनामुक्त व्यक्तींकडून प्लाझ्मा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा मिळवण्यासाठी धडपडावे लागले. अनेकांना तो मिळाला,

अनेकांच्या पदरी निराशा पडली. मात्र आता नव्या संशोधनाने हेही स्पष्ट झाले आहे की ज्यांना प्लाझ्मा मिळवता आला त्यांनाही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. प्लाझ्मा दान करुन आपण जीवनदान दिले, असे समाधान मानणाऱ्या दात्यांनाही या नव्या संशोधनामुळे खंत वाटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयसीएमआरने प्लाझ्मा उपचार पद्धती कोरोनावरील उपचारांमधून पूर्णतः वगळली असली तरी इव्हरमर्सिटीन (Ivermerctin) आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) या दोन्ही औषधांची शिफारस कायम ठेवली आहे. मात्र त्याचवेळी या दोन्ही औषधांबाबत पुराव्यांबद्दलची खात्री कमी असेही स्पष्टपणे नमूद केले आहे.

आयसीएमआर मार्गदर्शकतत्त्वे सौम्य आजारासाठी इव्हरमर्क्टिन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची शिफारस करत आहेत परंतु या दोन्ही औषधांकडे “पुराव्यांची कमी खात्री” असल्याचेही अधोरेखित केले आहे.

Are you one of the Plasma donors? …then don’t get upset as plasma therapy has been dropped by ICMR from the treatment guidelines for COVID-19