विराटने त्यांच्याकडे पाहिले तर, युवराज, इरफान, मुनाफ खदाखदा हसत होते

एक काळ भारतात असा होता की सचिन तेंडुलकर आऊट झाला की लोक टीव्ही बंद करत. पुढे सौरवच्या नेतृत्त्वात आणि सचिन, वीरु, लक्ष्मण, द्रविट या ‘फॅब फोर’नी देश-विदेशात भारताला अनेक चमकदार विजय मिळवून द्यायला सुरुवात केली. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने तर 2007 चा टी-ट्वेन्टी आणि 2011 चा वनडे वर्ल्ड कप भारताने घेतला. तोवर सचिनने शतकांचे शतक साजरे केले होते. सचिन निवृत्त झाल्यावर त्याची पोकळी कधीच भरुन निघणार नाही असे वाटत असतानाच विराट कोहली नावाचे वादळ आले आणि पाहता-पाहता तो जगावर राज्य गाजवू लागला. पण भारतीय संघात तो आला तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये सचिनसमोर त्याने काय केले होते माहिती आहे? When Sachin told him…Virat looked at them; Yuvraj Singh, Irfan Pathan, Munaf Patel were laughing


वृत्तसंस्था

मुंबई : सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटपटूने शतकांचे शतक केले. ही अचाट कामगिरी सचिननंतर कोणीही मागे टाकू शकणार नाही असे वाटत होते. पण सचिनच्या निवृत्तीला अजून दहा वर्षेही होत नाहीत

तोवरच विराट कोहली साठ आंतरराष्ट्रीय शतके झळकावून मोकळाही झाला आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम जर कोणी मागे टाकणार असेल तर तो विराट कोहलीच अशी जगभरच्या क्रिकेटप्रेमींची खात्री आता पटली आहे.सचिन संघात असतानाच विराट कोहलीचे भारतीय संघात आगमन झाले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात 1983 नंतर 2011 मध्ये भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला,

त्या विजयी संघात सचिन होता आणि विराटही. वानखेडेच्या मैदानावर विजयी संघ आनंदाने फेरी मारत असताना सचिनला खांद्यावर घेणाऱ्यांमध्ये विराट आघाडीवर होता. मात्र याच विराटची सचिनसोबतची पहिली भेट एकदमच मजेदार झाली होती.

नवख्या विराटने ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा त्याला सिनिअर असणारे युवराज सिंग, मुनाफ पटेल आणि इरफान पठाण हे तिघेजण तिथेच होते. त्यांनी विराटला सांगितले, “नवख्या खेळाडुंना सचिनचे (तेंडुलकर) पाय धरुन आशीर्वाद घ्यावे लागतात.

त्याशिवाय मैदानात यश मिळत नाही.” विराटने हे ऐकलं आणि तो सचिन येण्याची वाट पाहू लागला. जेव्हा सचिन ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा लगेच विराट त्याचे पाय धरण्यासाठी वाकला.

युट्यूबवर नुकत्याच झालेल्या ‘लिजेंड्स विथ अनअँकेडमी’ या कार्यक्रमात स्वतः सचिननेच या प्रसंगाची आठवण सांगितली. विराटबरोबरची पहिली भेट सचिनच्या शब्दात अशी – ड्रेसिंग रुममध्ये आल्याआल्या विराट असं काय करतोय तेच मला समजेना.

मी विराटला उठवलं आणि विचारलं की तू असं काय करतो आहेस. माझे पाय धरण्याची काही गरज नाही. त्यामुळं काही होत नसतं. त्यानंतर विराट उठला आणि त्यानं मागे वळून युवराज, मुनाफ आणि इरफान या तिघांकडे पाहिलं. त्या तिघे खदाखदा हसत सुटले होते. त्या तिघांनी विराटची चांगलीच चेष्टा केली होती.

याच शोमध्ये सचिनने क्रिकेट आणि मानसिक आरोग्य याबद्दलही सांगितलं. खेळत असताना मला मानसिक ताणतणावाचा नेहमीच सामना करावा लागला असं सचिननं सांगितलं.

सचिन म्हणाला, “वेळोवेळी मला जाणवलं की खेळासाठी शारीरिक तयारीबरोबरच स्वतःला मानसिकदृष्ट्याही तयार करावं लागतं. प्रत्यक्ष सामना खेळण्याची माझी तयारी मैदानात उतरण्याच्या आधीच सुरु झालेली असते.

कारकिर्दीतली पहिली 10-12 वर्षे मी खूपच ताण घ्यायचो. सामन्याच्या आधीच्या रात्री मला झोप येत नसे. नंतर मी मनाला समजावलं की रात्र-रात्र जागून काढणं हा देखील माझ्या तयारीचाच एक भाग आहे. मन शांत ठेवण्यासाठी मी काही ना काही करत असे.”

When Sachin told him…Virat looked at them; Yuvraj Singh, Irfan Pathan, Munaf Patel were laughing