एकनाथ शिंदे : ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडचे बंड!!


एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 प्रमाणे आपण 2022 मध्ये खेला करू शकू, अशी स्वतःची जी समजूत राऊत, ठाकरे आणि पवारांनी करून घेतली आहे, त्यालाच एकनाथ शिंदे यांनी एका एकापाठोपाठ एक ट्विट मधून झटके दिले आहेत!!Eknath shinde : politics of rebellion beyond capacity of Thackeray and Pawar !!

 12 ते 42

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या घटनाक्रमाकडे नुसती नजर टाकली तरी ही बाब अधोरेखित होते. सुरुवातीला 12 आमदार घेऊन गुजरातच्या सुरत मध्ये पोचलेले एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहाटीत पोचल्यानंतर तब्बल 42 आमदारांचे नेते बनले आहेत. ही घटनाच मुळात राजकीय दृष्ट्या फार बोलकी आहे ज्याकडे मराठी माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे.गुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीचे व्हिडिओ जारी केले आहेत, ते पाहता सूरत आणि गुवाहाटीतून परत आलेल्या 2 आमदारांच्या विश्वासार्हतेपेक्षा एकनाथ शिंदे यांची विश्वासार्हता अधिक ठळक दिसत आहे. त्यातही ठाकरे, राऊत आणि पवारांनी जो खेला चालवलेला आहे, त्या चुचकारणी आणि धमकावणीच्या पलिकडे एकनाथ शिंदे जाऊन पोहोचले आहेत!!

जाळ्यात अडकवायचे प्रयत्न

आपल्या गटातल्या आमदारांची संख्या घटली आहे हे लक्षात घेऊन आधी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चुचकरायचे. थेट एकनाथ शिंदे यांना परोक्षपणे मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन टाकायची. त्यालाही एकनाथ शिंदे बधले नाहीत तर राऊतांनी चला तुमच्या अटीनुसार महाविकास आघाडीतून बाहेर पडतो पण तुम्ही मुंबईला या, असे म्हणून चुचकारायचे आणि तेही नच जमले म्हणून संध्याकाळी शरद पवारांनी तुम्हाला मुंबईत यावेच लागेल. बंडखोरीची किंमत चुकवावीच लागेल, अशा धमक्या द्यायच्या, असले खेळ केले आहेत.

शिंदे यांनी भीक घातली नाही

पण एकनाथ शिंदे यांनी चुचकारणी आणि धमकावणे या दोन्हींना भीक घातलेली नाही.
चुचकारणी आणि धमकावणी या दोन्ही वेळी त्यांनी अजिबात वेळ न दवडता सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

बारामतीकर मैदानात आले

शिवसेनेच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याही बंडखोर नेत्याने या पद्धतीची सणसणीत आणि खणखणीत प्रत्युत्तरे दिली नव्हती. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा इतिहास जरा तपासून पहा. या नेत्यांनी बंड करताना पक्षप्रमुखांना जरूर टार्गेट केले, त्यांनी देखील विठ्ठला भोवतीच्या बडव्यांचा उल्लेख केला होता. पण त्यावेळी बारामतीकर पक्षप्रमुखांच्या मदतीला उतरले नव्हते आणि पक्षप्रमुखांच्या वतीने त्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांना दमदाटीही केली नव्हती. छगन भुजबळांना तर थेट बारामतीकरांनी फोडले होते.

 बारामतीची दमबाजी, शिंदे यांची दटावणी

आता मात्र बारामतीकरांनी थेट दमबाजीची भाषा वापरली आहे. पण या दमबाजीच्या भाषेला देखील तितक्याच दटावणीच्या आवाजात एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नेमका हाच बाकीच्यांची बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांची बंडखोरी यातला महत्त्वाचा भेद आहे!! ( ठाकरे राऊत आणि पवार हे तिथेच फक्त साम-दाम-दंड-भेद जाणतात हा समज मराठी माध्यमांनी पसरवला असला तरी तो गैर आहे ही वस्तुस्थिती आहे.)

 सर्व्हिस भेदण्याची कला

याचा अर्थ उघड आहे, एकनाथ शिंदे यांचे बंड ठाकरे, राऊत यांचे चुचकारणे आणि शरद पवारांचे धमकावणे यांच्या पलिकडचे आहे. एक विशिष्ट आणि जबरदस्त ताकद त्यांच्या मागे उभी आहे आणि त्या ताकदीवर एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे!! आणि म्हणूनच एखाद्या टेनिस मॅच सारखी सर्व्हिस भेदण्याची कपॅसिटी त्यांच्यात निर्माण झाली आहे!!

 मुख्यमंत्रीपदाची ऑफर हेच जाळे

दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन जे जाळे टाकले होते, ते जाळे काही मिनिटांमध्येच एकनाथ शिंदे यांनी उध्वस्त केले. त्यांनी भले मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ द्या. आपण आपल्या कपॅसिटी नुसार काम करू, असे बोलून एकनाथ शिंदे यांनी आपली खरी “कपॅसिटी” दाखवून दिली आहे. किंबहुना आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर जाळे टाकले आहे हे शिंदे यांनी ओळखल्याचे ते निदर्शक आहे.

राऊतांचे जाळे क्षणार्धात उध्वस्त

ते मुख्यमंत्र्यांच्या ऑफरला फसले नाहीत हे लक्षात येताच संजय राऊत यांनी दुसरे जाळे टाकले. तुमची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी मान्य करू. पण समोर येऊन बोला, असे ते म्हणाले. पण या जाळ्याला देखील एकनाथ शिंदे यांनी उध्वस्त करून टाकले. आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा. याचा सरळ अर्थ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या. मगच वाटाघाटी करू, असे शिंदे यांनी ठणकावून टाकले.

 पवारांच्या दमबाजीतली हवा राणेंनी काढली

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या जाळ्यात एकनाथ शिंदे अडकत नाहीत हे पाहिल्यानंतर दस्तुरखुद्द तेल लावलेले पहिलवान मैदानात उतरले आणि त्यांनी दमबाजीची भाषा केली. पण दमबाजीची भाषा वेगळी आणि खरा दमखम दाखवणे वेगळे. पण त्या दमबाजीच्या भाषेला देखील नारायण राणे यांच्या करवी एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. नारायण राणे यांनी शरद पवारांचे वय आणि त्यांना काय शोभत नाही हे ट्विट मधून काढले!!

 शिंदे यांनी शिवसेनेला कायदा शिकवला

मग ठाकरे आणि राऊत यांनी चुचकारलेल्या एकनाथ शिंदेंवर आमदारकी रद्द करण्याचे जाळे टाकण्यात आले. पण तेही शिंदेंनी क्षणार्धात उध्वस्त केले. आमदारकी रद्द करण्याच्या धमक्या कोणाला देता?? कायदा आम्हालाही कळतो. खरी शिवसेना आमची आहे. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत, असे सणसणीत उत्तर एकनाथ शिंदेंनी देऊन आमदारकी रद्द करण्याच्या धमक्यांमधली हवाच काढून टाकली!!

 शिंदे यांच्या बंडामागची शक्ती

या अर्थाने एकनाथ शिंदे यांचे बंड फार वेगळ्या शक्तीतून आलेले दिसते आहे. ती शक्ती शोधायला फार मोठ्या रॉकेट सायन्स अभ्यास करण्याची गरज नाही. उलट एकनाथ शिंदे यांनी कोणताही गोलमाल न करता महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करा असे थेट आणि जाहीर आव्हान दिल्यामुळे ठाकरे, राऊत आणि पवार यांची पंचाईत झाली आहे.

ठाकरे, राऊत, पवार त्रिकुटाला आव्हान

किंबहुना चुचकारणी आणि धमकावणी या राजकारणाच्या खोड्यात एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे, राऊत आणि पवार या त्रिकुटाला ढकलले आहे. आपण चुचकारणी आणि धमकावणीच्या पलिकडचे राजकारण करतो हे एकनाथ शिंदे यांनी आता सिद्ध केले आहे. त्यावर काही तोड असेल तर काढा हे एक प्रकारचे आव्हानच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे राऊत आणि पवार या त्रिकूटाला दिल्याचे दिसत आहे!!

Eknath shinde : politics of rebellion beyond capacity of Thackeray and Pawar !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात