भाजपचे नेते आता पवारांची “विश्‍वासार्हता” काढताहेत, पण त्यांच्याशी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी केल्याच का…??


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफर बाबत मुलाखत देऊन पुन्हा एकदा राजकीय वादळ तयार केले आहे. शरद पवार हे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना मुलाखत देऊन मोकळे झाले आहेत. या मुलाखतीनंतर त्यांनी एक चकार शब्दही काढलेला नाही. पण त्यांच्या वक्तव्यावर पत्रकार धावाधाव करत अनेक नेत्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया दिवसभर घेताना दिसत होते.BJP leaders are now taking out Pawar’s “credibility”, but why did they negotiate with him to form a government

भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांची विश्‍वासार्हता “काढली”. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खंजीर खुपसण्याच्या आठवणीही सांगितल्या. त्याची वेगवेगळी ट्विट केली. महाराष्ट्रातल्या नेत्यांना पवारांच्या मुलाखतीनंतर शरद पवारांची “विश्वासार्हता” आठवली का…?? त्याआधी इतक्या वर्षांच्या राजकारणात शरद पवारांची “विश्‍वासार्हता” नेमकी किती हे भाजपच्या नेत्यांना माहिती नव्हते का…??



पवारांशी आपण कितीही बोललो तरी बोलल्यानंतर ते शब्द फिरवू शकतात हे भाजपच्या नेत्यांना समजत नव्हते का…?? चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये या नेत्यांची ट्विट आणि वक्तव्ये पाहिली तर पवारांकङे “विश्वासार्हता” नाही, असा ठळक मुद्दा त्यांनी मांडला आहे.

पण त्यामुळेच जे महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना समजते ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजत नाही का…?? भाजपचे केंद्रीय नेतृत्व पवारांच्या एवढे प्रेमात का आहे…?? की पवारांनी यूपीए सरकारच्या काळात केलेल्या मदतीचे “राजकीय उतराई” होण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला राजकीयदृष्ट्या तोंडघशी पाडले…??, हे प्रश्न पवारांच्या मुलाखतीनंतर आणि या मुलाखतीवर भाजपच्या प्रदेश नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर उपस्थित होत आहेत.

शरद पवारांशी वाटाघाटी करताना जर कोणाला कोणती मंत्रिपदे द्यायची इथपर्यंत ठरले असेल तर शरद पवारांनी शब्द फिरवेपर्यंत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेश पातळीवरचे नेतृत्व काय करत होते…?? दोन्ही पातळ्यांवरचे नेतृत्व हातावर हात धरून बसले होते?? की मूग गिळून बसले होते…??

पवार शब्द फिरवू शकतात याची उदाहरणे चंद्रकांतदादा पाटील, केशव उपाध्ये यांनी ट्विट मधून दिली आहेत. ही उदाहरणे वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, सोनिया गांधी यांच्या संदर्भातली आहेत. जी उदाहरणे प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना माहिती आहेत ती उदाहरणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला माहिती नव्हती का…??

पश्चात बुद्धीने भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी शरद पवारांच्या “विश्वासार्हतेवर” जरूर प्रश्न निर्माण केले आहे. त्यात तथ्य देखील जरूर आहे. पण जर पवारांची एवढी “विश्वासार्हता” नव्हती तर मूळातच त्यांच्याशी वाटाघाटी करायला भाजपचे नेते का गेले…?? किंवा त्यांना वाटाघाटीसाठी का बोलावले…?? हे प्रश्न प्रदेश पातळीवरचे नेते केंद्रीय नेतृत्वाला विचारू शकतात का??

शिवसेनेबरोबर काडीमोड घ्यायचा हा मनाचा हिय्या झालाच होता तर तितक्याच आक्रमकपणे राष्ट्रवादीला देखील मोडून काढता आले असते, पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ते का केले नाही…?? या प्रश्नांची उत्तरे प्रदेश पातळीवरचे नेते देऊ शकतात का?? किंवा केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला विचारू शकतात का??

शरद पवारांच्या “विश्वासार्हतेवर” प्रश्न उपस्थित करणे सोपे आहे. त्यासाठी कोणतेही रॉकेट सायन्सचा अभ्यास करावा लागत नाही. कारण नजीकच्या राजकीय इतिहासातली ती उदाहरणे ठळक आहेत. पण “विश्‍वासार्हता” नसलेल्या नेत्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वाटाघाटी केल्यातच का…??,

हा प्रश्न जोपर्यंत परखडपणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला तोंडावर विचारला जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार का स्थापन झाले नाही?? किंवा महाविकास आघाडीचे सरकार का स्थापन झाले?? या प्रश्नांची खरी उत्तर मिळणार नाहीत.

BJP leaders are now taking out Pawar’s “credibility”, but why did they negotiate with him to form a government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात