पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे जनतेने करावे पालन -उपमुख्यमंत्री अजित पवार


विशेष प्रतिनिधी 
मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचे जनतेने पालन करावे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि देशातील जनता सर्व मिळून ‘कोरोना’विरुद्धचा लढा आपण जिंकू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे.  जनतेने घरातंच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असे पवार म्हणाले.
सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यापाऱ्याने आजारी असताना मेरठपर्यंत रेल्वेप्रवास केल्याचे उघड झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचाही आता शोध सुरु आहे, इतरांचा जीव धोक्यात घालणारा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, ‘कोरोना’संदर्भात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई, नवी मुंबई, राज्यातील अनेक शहरांच्या बाजारपेठेत आजही खरेदीसाठी गर्दी होते आहे. यामुळे ‘कोरोना’संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मर्यादित ठेवायची असेल तर, राज्यातील प्रत्येकाने  ‘लॉकडाऊन’चे पालन करुन घरातंच थांबावे. खरेदीसाठी गर्दी करु नये. परराज्यातील मजूरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करुन जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हजार शासकीय व खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात