2024 : मोदींपुढे “बोलके” आव्हान आणि “कर्ते” आव्हान; मंडल – कमंडलचे नवे रूप!!


अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचे वारे वाहत असताना लोकमान्य टिळकांनी सुधारकांमध्ये वास्तवात भेद असल्याचे सांगितले होते. तो भेद म्हणजे “बोलके” सुधारक आणि “कर्ते” सुधारक!! म्हणजे सुधारणेच्या नावाखाली नुसतेच बोलभांडपणा करणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक सुधारणा करणारे असा भेद लोकमान्यांनी दाखवून दिला होता. Nitish Kumar and M. K. Stalin more serious challenges before Narendra Modi for 2024 loksabha elections

– ममतांचे आक्रस्ताळे आव्हान

असाच भेद आता देशात राजकीय बाबतीत दिसतो आहे. 2024 च्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर काही “बोलकी” आव्हाने आधीपासूनच उभी आहेत, तर काही “कर्ती” आव्हाने उभी राहत आहेत. राहुल गांधी, शरद पवार, चंद्रशेखर राव ही “बोलकी” आव्हाने पंतप्रधान मोदींसमोर उभी आहेत, पण त्या पलिकडे जाऊन ममता बॅनर्जी एम. के स्टालिन यांच्यासारखी “कर्ती” आव्हाने उभे राहताना दिसत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची भर ही नितीश कुमारांची पडते आहे. त्यातही ममता बॅनर्जी यांचे आवाहन “बोलके” किंवा “कर्ते” यापेक्षा “आक्रस्ताळे” या शब्दांनी वर्णन करण्याजोगे आहे!!

– राहुल, पवार, चंद्रशेखर राव “बोलके” आव्हान

पण एम. के. स्टालिन आणि नितीश कुमार यांची आव्हाने खऱ्या अर्थाने “कर्ती” आव्हाने असल्याचे मानले पाहिजे. कारण राहुल गांधी, शरद पवार, के. चंद्रशेखर राव हे आपल्या मर्यादित राजकीय कर्तृत्वाने मोदींपुढे “बोलके” आव्हान उभे करीत असतात. मोदींना खऱ्या अर्थाने कृतीतून आव्हान देण्याची त्यांची क्षमता नाही. हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. ममता बॅनर्जी यांचे आक्रस्ताळे आव्हान पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाले आहे. पण ते देशपातळीवर यशस्वी होईल की नाही याविषयी दाट शंका आहे.

– एम. के स्टालिन यांचे संघराज्य व्यवस्थेला आव्हान

एम. के. स्टालिन आणि नितीश कुमार यांच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही. कारण त्यांची राजकीय कृती अधिक व्यापक आणि खोलवर परिणाम करणारी आहे. एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान मोदींचा प्रोटोकॉल न तोडता कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्यासमोर खरे आव्हान काय उभे राहू शकते हे दाखवून दिले आहे. मोदी जर देशात हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचे राजकारण उभे करणार असतील तर आपण दक्षिणेत द्रविडी राजकारणाच्या पुनरुत्थानाचे पाऊल उचलू, असा इशाराच स्टालिन यांनी दिला आहे. “शहास काटशह” असा हा प्रकार आहे!! एमके स्टॅलिन यांनी मोदींसमोर हिंदीला विरोध, संघराज्य व्यवस्थेतील नवे पायंडे, राज्यांना अधिक अधिकार यावर भाष्य केले आहे. “इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स” हा राहुल गांधी यांचा बोलका सिद्धांत एम. के. स्टालिन कृतीतून अमलात आणण्याची क्षमता राखतात. एक प्रकारे हे मोदींच्या निमित्ताने राज्यांनी केंद्रीय सत्तेला कायमचे व्यापक सैद्धांतिक स्वरूपाचे दिलेले आव्हान ठरू शकते, हे एम. के. स्टालिन यांनी सैद्धांतिक कृतीतून दाखण्याचा प्रयत्न चालवला आहे!!

– जातीनिहाय जनगणनेतून आव्हान

पण त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यापक सामाजिक पातळीवर आव्हान देण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांनी चालवला आहे. जातीनिहाय जनगणना करून त्यावर आधारित आरक्षण आणि सवलतींची फेररचना करण्याचा घाट नितीशकुमार यांनी बिहार मधल्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन घातला आहे आणि हे खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदींसमोर व्यापक सामाजिक आणि राजकीय आव्हान उभे राहण्याची क्षमता राखणारे आहे.

– मंडल विरुद्ध कमंडल

विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 1990 च्या दशकात जो मंडल प्रयोग केला आणि त्यावेळच्या प्रसार माध्यमांनी मंडल विरुद्ध कमंडल असा विश्वनाथ प्रताप सिंह आणि अडवाणी यांच्यात संघर्ष असल्याचा सिद्धांत मांडला, तसाच प्रयोग बिहारमध्ये नितिश कुमार करू इच्छित असल्याचे दिसून येत आहे. हे नितीश कुमार यांचे पंतप्रधान मोदींसमोर असे खऱ्या अर्थाने “कर्ते” आव्हान आहे.

– मंडल प्रयोगाचा दीर्घ परिणाम

अर्थात 1990 च्या दशकात विश्वनाथ प्रताप सिंग यांना वैयक्तिक पातळीवर मंडल प्रयोगाचा फारसा लाभ झाला नाही. पण देशाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर त्यांच्या मंडल प्रयोगाने दीर्घकाळ परिणाम केला ही वस्तुस्थिती आहे. नितीश कुमार यांच्या बाबतीतही असेच घडेल का?? नितीश कुमार बिहार मध्ये जातिनिहाय जनगणना करून वैयक्तिक राजकारणात किती फायदा होईल?? आणि नितीश कुमार यांचे वय लक्षात घेता त्या फायद्याचा नितीशकुमार हे किती लाभ उठवू शकतील?? याविषयी शंका रास्त आहे.

– भाजपला मोल्ड व्हावे लागेल

पण बिहार मधल्या जातनिहाय जनगणनेचे भारतीय राजकारणात आणि समाजकारणात दीर्घकाळ पडसाद उमटत राहतील याविषयी मात्र शंका नाही. किंबहुना याबाबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काहीना काही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामध्ये भाजपच्या मूलभूत सिद्धांत अनुरूप ठरेल असा बदल करावा लागेल हेच दिसून येत आहे!! मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विशिष्ट सैद्धांतिक धोरण राबवत वाटचाल करत आहे ती करताना नितीश कुमार यांच्या सारखे चतुर नेते आपले सामाजिक मुद्दे आपल्या पद्धतीने पुढे रेटत असतील तर तो राजकीय अपरिहार्यतेचा भाग म्हणून भाजपला नवीन वळणही घ्यावे लागेल.

– मोदी आव्हान कसे परतवतील??

1990 च्या दशकात अडवाणींनी संघटनात्मक रचना आणि बांधणी मजबूत करत विश्वनाथ प्रताप सिंह यांचे आव्हान परतवून लावले होते. पण त्याच वेळी भाजपने सैद्धांतिक पातळीवर सामाजिक न्यायाची भूमिकाही राबवली होती त्याच धोरणाचा विस्तार करून आणि मोल्ड करून मोदी नितीश कुमार पुढे आणू इच्छित असलेले सामाजिक आव्हान परतवतील का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nitish Kumar and M. K. Stalin more serious challenges before Narendra Modi for 2024 loksabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात