वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दक्षिण आशियात भारताच्या वाढत्या प्रभावाला विरुद्ध चीन आणि पाकिस्तान एकत्रित येऊन भारताला अटकाव करण्याच्या योजना आखत आहेत. चीनकडून पाकिस्तानला लष्करी प्रशिक्षणापासून ते अत्याधुनिक ड्रोन पुरवठ्या पर्यंत सर्व प्रकारची लष्करी सामग्री देण्यात येत आहे. भारताविरुद्ध कारवाया वाढविण्यासाठी चीनची ही एक प्रकारे पाकिस्तानला चिथावणी देत असल्याचे मानले जात आहे. China supports Pakistan in every possible way against India
चीन पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य पुरवत आहे. भारताच्या नाठाळ शेजा-यांकडून कायमंच सीमेवर भारताविरुद्ध अनेक डाव रचले जात आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताने पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडल्याने पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामुळे ढसाढसा रडणा-या पाकिस्तानला आता पुन्हा चीनने आपल्या मांडीवर बसवून गोंजारायला सुरुवात केली आहे. भारतविरोधी कारवायांची चीनची खुमखुमी अजून थंड झालेली नसून, चीनने आता पाकिस्तानला अत्याधुनिक ड्रोन पुरवल्याची माहिती समोर येत आहे.
चीनकडून पाकला पुरवण्यात येणारे हे ड्रोन अधिक पेलोड क्षमतेचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानकडे पाच ते सात किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन उपलब्ध असून 14 ते 15 किलोमीटरचे अंतर कापण्याची त्यांची क्षमता आहे. हे ड्रोन 6 ते 8 तास काम करू शकतात. पण आता चीनने 15 ते 20 किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन पाकला पुरवल्याचे समजत आहे. हे अत्याधुनिक क्षमतेचे ड्रोन 20 तासांसाठी कार्यरत राहत असून, 20 ते 25 किमी पर्यंतचे अंतर सहज पार करू शकतात. तसेच चीनकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे सैन्य अधिकारी चीनच्या पीपल लिबरेशन आर्मी(पीएलए)च्या मुख्यालयात तैनात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. पाकिस्तानी लष्कराचे कर्नल अधिकारी चीनच्या सैन्य आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागात तैनात केले आहेत. हे पाकिस्तानचे लष्कर चीनच्या सशस्त्र दलात प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या 2016 च्या अहवालानुसार, पाकिस्तानने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी) आणि त्या कामाशी निगडित लोकांच्या सुरक्षेसाठी 9 हजार सैनिक आणि आपल्या निमलष्करी दलाच्या 6 हजार जवानांसह एक विशेष सुरक्षा विभाग स्थापन केला आहे. हे सर्व अधिकारी आणि सैनिक भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये फ्रंटवर दिसण्याची शक्यता भारतीय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App