नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठोकण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करून अमित शाह यांना जरूर ठोकले, पण प्रत्यक्ष राजकीय कृतीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंचे “स्वबळ” पंक्चर करून टाकले.
शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पण त्यापूर्वी संजय राऊत त्यांना भेटून आले होते. पवार दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली होती.
पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांचे दगाफटक्याचे राजकारण 20 फूट गाडले, अशी टीका शाह यांनी भाजपच्या महा अधिवेशनात केली होती. पवारांनी शाह यांच्या टीकेला तडीपार गृहमंत्री आणि श्याम भटाची तट्टाणी असे म्हणत प्रत्युत्तर दिले. मात्र, त्या पलीकडे जाऊन पवारांनी उद्धव ठाकरेंच्या स्वबळाला पंक्चर करून टाकले.
उद्धव ठाकरेंनी मुंबई सह महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेवर आगपाखड केली. पण त्या पलीकडे खरं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी गोची झाली होती. कारण उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवायचा निर्णय घेतल्यानंतर पवारांच्या पक्षाला देखील दुसरा कुठला मित्र पक्ष उरला नव्हता. अशा स्थितीत पवारांच्या पक्षाला स्वबळावर निवडणुका लढविणे फारच कठीण चालले होते. मुंबई, पुणे सारख्या महापालिका लढवताना पवारांच्या पक्षाला उमेदवार मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे पवारांनी महाविकास आघाडी पुन्हा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रयत्न करेल, असे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली. जिथे शक्य होतील तिथे एकत्र निवडणुका लढवाव्यात जिथे शक्य नाही, तिथे आपापल्या पक्षांनी आपापल्या बळानुसार निवडणूक लढवावी, अशी सूचना पवारांनी केली. पुढच्या 10 दिवसांमध्ये महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांची बैठक बोलवून एक निश्चित रणनीती आखायचे सूतोवाच शरद पवारांनी केले.
या सगळ्यात पवारांनी उद्धव ठाकरेंचे “स्वबळ” पंक्चर करून टाकले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेमध्ये सर्वेक्षण करून स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला होता. त्या निमित्ताने पक्षाला नव संजीवनी देण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार होता. काँग्रेसला त्यांनी दूर लोटलेच होते. परंतु, पवारांच्या पक्षाची त्यामुळे फारच गोची झाली होती म्हणून पवारांनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायची गुगली टाकली. या निमित्ताने जमेल तशी आणि जमेल तिथे महाविकास आघाडी टिकवून त्याचा लाभ घेण्याचा पवारांचा डाव उघड झाला.
पण आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी त्यांना संजय राऊत भेटून गेले होते. त्यातूनच पवारांचे आणि राऊतांचे काही ठरले असावे, अशा अटकळी आता राजकीय वर्तुळात बांधल्या जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App