विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव सहन करायला लागल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात बॅलेट पेपर यात्रा काढणार आहेत प्रत्येक निवडणुका बॅलेट पेपर वरच व्हाव्यात,असा काँग्रेस या यात्रेतून आग्रह धरणार आहे. मात्र राहुल गांधींची ही बॅलेट पेपर यात्रा सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या यात्रेवर ओडिशाची राजधानी भूवनेश्वर मधून जोरदार प्रहार केला.
गेल्या दशकापासून सत्तेबाहेर असलेले लोक कायमच देशावर सत्ता गाजवायचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याकडेच असल्याचे मानत होते, पण देशातल्या जनतेने त्यांना नाकारले. त्यामुळे सत्तेवर आपणास जन्मसिद्ध अधिकार आहे, असे मानणारे लोक आता जनतेवरच आपला सगळा संताप व्यक्त करायला लागलेत. देश विरोधी कारवाया करायला लागलेत. त्यामुळे देशातल्या नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी भूवनेश्वर मध्ये केले.
गेल्या दशकापासून देशातली जनता वेगळा कौल देत आहे. हा कौल अनेकांना सहन होत नाही. आपणच देशाचे कायमचे सत्ताधारी आहोत, असे काही लोक मानतात परंतु आता देशातली जनता त्यांना मानायला तयार नाही, असा टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला हाणला.
राजकारणामध्ये कुठल्या धोरणाला अथवा निर्णयाला विरोध हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. तसा विरोध कोणी केला, तर गैर मानायचे कारण नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे, पण सत्तेवर स्वतःचाच जन्मसिद्ध अधिकार मानणारे लोक खरी लोकशाहीच मानायलाच तयार नाहीत. त्यांच्या तोंडी राज्यघटनेची भाषा असते, पण त्यांची कृती देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेली असते. याबद्दल आपण सजग राहिले पाहिजे, असा इशारा मोदींनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App