उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोशल इंजिनिअरिंग परवडेल?; धर्मनिरपेक्ष मतांमध्ये वाटा तरी किती मिळेल?


विशेष प्रतिनिधी

शिवसेनेत उभी फूट पडून 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसाठी म्हणजे आपल्या गटासाठी सोशल इंजिनिअरिंगचा आकर्षक प्रयोग करण्याचे ठरवल्याचे दिसते. तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी या सोशल इंजिनिअरिंगचे सूतोवाच केले आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही ताकद एकत्र आली, तर महाराष्ट्रासह देशाचे राजकीय चित्र पालटेल, असे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांची राजकीय भाकिते कधीच स्थानिक नसतात. ती कायम महाराष्ट्रीय किंवा राष्ट्रीयच असतात. Uddhav Thackeray – Prakash Ambedkar Alliance on cards, but will this social engineering benefit Shivsena politically

बाबासाहेब आणि प्रबोधनकार

आपण केलेल्या भाकिताच्या पुष्टीसाठी संजय राऊत यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील राजकीय आणि सामाजिक मैत्रीचा संदर्भ दिला आहे. प्रबोधनकारांनी विनंती केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली आहे. ही आठवण अर्थातच इतिहासावर आधारित आहे.

 प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे

पण मुद्दा त्या पलिकडचा आहे. कारण संजय राऊत यांनी हवाला दिलेले “ते” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे होते आणि “हे” प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे आहेत… आधीच्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये आणि आताच्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये रक्ताचे नाते आजोबा आणि नातवाचे असले तरी वैचारिक दृढता आणि कसदार राजकीय + सामाजिक भूमिका यामध्ये जमीन आस्मानाचे अंतर आहे. काळ बदलला की राजकारण बदलते हे कितीही खरे मानले तरी राजकीय + सामाजिक भूमिकांमधला कसदारपणा हा गुणवत्तेचा निकष लावला, तर दोन्ही आजोबांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका आणि नातवांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका यांच्यातले महदंतर स्पष्ट व्हायला हरकत नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी

बाबासाहेबांनी काँग्रेसला जळते घर म्हटले होते. त्यांनी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षस्थान जरी स्वीकारले आणि काँग्रेस बरोबर काही काळ राजकीय सहचार्य केले, तरी नंतर मात्र त्यांचे अखेरपर्यंत पंतप्रधान पंडित नेहरू आणि काँग्रेसशी कधीही जुळले नाही. जी गोष्ट बाबासाहेबांची, तीच प्रबोधनकारांची. प्रबोधनकारांची राजकीय + सामाजिक भूमिका प्रखर होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर ती ठामपणे काँग्रेस विरोधी होती. आज काही राजकीय नेते आपल्या सोयीसाठी प्रबोधनकारांचे हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व असा भेद करत असले तरी वस्तुस्थिती तशी नव्हती. कारण प्रबोधनकारांचे जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध होते, तसेच सावरकरांशीही संबंध होते. बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर भाषणांमध्ये आणि खाजगी संभाषणांमध्ये देखील याचा हवाला देत असत. अनेकदा प्रबोधन मेळाव्यामध्ये ते सावरकरांच्या आठवणी सांगत. याचे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत. किंबहुना ज्या संजय राऊत यांनी प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांच्या संबंधांचा हवाला दिला आहे, त्यांनीच अनेकदा ठाकरे + सावरकर संबंधांचाही हवाला सामनातून दिला होता. आता नव्या राजकीय संदर्भात त्यांना तो विसरावासा वाटला असेल, पण म्हणून तो हवाला काही खोटा ठरत नाही.

हिंदुत्वाचा वारसा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

या पेक्षाही आणखी एक वेगळा मुद्दा आहे, तो उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भविष्यात येऊ घातलेल्या राजकीय युतीचा आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रबोधन.कॉमच्या प्रकाशन समारंभात प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचाच हिंदुत्वाचा राजकीय वारसा सोडून दिल्याचे ते निदर्शक आहे. 2019 पासून काँग्रेस + राष्ट्रवादीशी जवळीक आणि आता प्रकाश आंबेडकरांशी जवळीक या राजकीय प्रवासाचा वेध घेतल्यावर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा वारसा आयता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन टाकल्याचे दिसून येते. आता त्यांनी कितीही उच्चरवाने आपण बाळासाहेबांचे पुत्र आहोत, असे जाहीर केले तरी केवळ रक्ताच्या नात्याच्या पलिकडे त्यांचा तो वैचारिक हिंदुत्वाचा वारसा जनता कितपत मानेल?, हा कळीचा मुद्दा आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचा वाटा कसा मिळेल?

इतकेच नाही तर उद्धव ठाकरे एक वेगळी राजकीय मांडणी करून प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वावर वाटचाल करत असताना प्रत्यक्षात ते काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाशी जवळीक साधून आहेत. त्याच वेळी राष्ट्रवादीशी त्यांची अधिक जवळीक आहे. म्हणजेच या दोन्ही पक्षांच्या मतांचा वाटा उद्धव ठाकरेंना आपल्या शिवसेनेसाठी अपेक्षित आहे. शिवसेनेचा मूलभूत मतपेढीचा ढाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हिंदुत्ववादी राहिला आहे. तो पूर्णपणे बाजूला सरकल्यानंतर धर्मनिरपेक्ष मतांचा वाटा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कितपत मिळू शकेल??, हा खरा प्रश्न आहे.



हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट

हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी शिवसेनेशी म्हणजेच उद्धव ठाकरेंशी जवळीक जरूर साधली. पण म्हणून ते पक्ष आपल्या धर्मनिरपेक्ष मतांमधला वाटा उद्धव ठाकरे यांना मिळवून देऊ शकतील, असे समजणे राजकीय भाबडेपणाचे लक्षण ठरेल… मग भले उद्धव ठाकरे कितीही नव्याने सोशल इंजिनिअरिंग करून आपल्या शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न करोत… त्यांना धर्मनिरपेक्ष मतांचा वाटा मिळवण्यात फारच मर्यादा पडणार आहेत.

राष्ट्रवादी नकोतून धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट

यात एक उप मुद्दा देखील महत्त्वाचा आहे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरें पुढे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीचा प्रस्ताव मांडताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेस नको, अशी अट घातली आहे. याचा अर्थ मूळातच धर्मनिरपेक्ष मतांमध्ये देखील राष्ट्रवादीचा वाटा त्यांना तसाही नकोच आहे. अशा स्थितीत शिवसेनेत फूट पडल्याने जशी हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडली आहे, तशीच फुट राष्ट्रवादीला वगळल्याने धर्मनिरपेक्ष मतांमध्ये पडणार आहे. म्हणजे इथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फूट पडलेल्या धर्मनिरपेक्ष मतांमधून कितपत वाटा मिळणार?, हा मुद्दा शिल्लक राहणारच आहे. उद्धव ठाकरेंची सोशल इंजिनिअरिंगची राजकीय चाल सध्या त्यांच्या प्रेमात पडलेल्या लिबरल विचारवंत आणि पत्रकारांना आकर्षक वाटत आहे… त्यांनाही चाल कितीही आकर्षक वाटली तरी हे लिबरल विचारवंत आणि पत्रकार हे शिवसेनेसाठी राबणारे शिवसैनिक अथवा मते खेचणारे नेते नव्हेत. फारतर ते आपल्या वैचारिक वकुबानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वैचारिक रसद पुरवठा करू शकतील… पण शिवसेनेसाठी प्रश्न त्या पुढचे आहेत, एकदा हिंदुत्ववादी मतांची रसद संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला धर्मनिरपेक्ष मतांच्या वाट्यातला रसद पुरवठा कोण करणार??… आणि त्यातून त्यांच्या पक्षाची खरी उभारणी कोण करणार??… त्यामुळेच शीर्षकात विचारलेला प्रश्न अर्थवाही ठरतो आहे.

Uddhav Thackeray – Prakash Ambedkar Alliance on cards, but will this social engineering benefit Shivsena politically

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात