फेक पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार : अमरावतीत कलम 144, नांदेड, मालेगाव, औरंगाबादेत परिस्थिती नियंत्रणात, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर…

Tripura Effect Maharashtra Violence Due To Fake Post Who Said What Read In Details

Maharashtra Violence : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शुक्रवारी अमरावतीमध्ये त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. अमरावतीशिवाय मालेगाव, नांदेडमध्येही निदर्शने झाली. अनेक ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले. दगडफेकीच्या घटना घडल्या. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी शनिवारी बंदची हाक दिली होती. मात्र या बंददरम्यान अमरावतीत सकाळी हिंसाचार उसळला. आता येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. Tripura Effect Maharashtra Violence Due To Fake Post Who Said What Read In Details


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शुक्रवारी अमरावतीमध्ये त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. अमरावतीशिवाय मालेगाव, नांदेडमध्येही निदर्शने झाली. अनेक ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले. दगडफेकीच्या घटना घडल्या. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी शनिवारी बंदची हाक दिली होती. मात्र या बंददरम्यान अमरावतीत सकाळी हिंसाचार उसळला. आता येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. चार दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नागपुरातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

अमरावतीत तणावपूर्ण शांतता, मालेगाव आणि औरंगाबादमध्ये परिस्थिती नियंत्रणात

सध्या अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. अमरावती बंदला सकाळी दहा वाजता हिंसक वळण लागले. साडेदहा वाजता जमाव अचानक हिंसक झाला. अचानक उसळलेल्या या हिंसाचारात जमावाकडून दगडफेक सुरू झाली. दुकाने आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला. सध्या कलम 144 लागू करण्यात आले आहे.

नांदेडबाबत बोलायचे झाले तर तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 4 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर 20 जणांची ओळख पटली आहे. नांदेड हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मालेगावातही आता शांतता आहे. मालेगाव हिंसाचारावर नियंत्रण मिळवल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि क्लिपच्या माध्यमातून आणखी गुन्हेगार पकडले जातील.

राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

“भाजप धार्मिक द्वेष, तेढ पसरवल्याशिवाय राजकारण करू शकत नाही. भाजपचीच अंतर्गत संघटना आहे. दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे. हे सगळं नियोजनबद्ध आहे. राज्याला अस्थिर करण्याचं कारस्थान. ईडी, सीबीआय यांच्या माध्यमातून ओरखडाही उमटत नाही. म्हणून दंगली घडवायच्या असा कट आहे”, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, “मराठवाड्यात, नांदेडला हे प्रकार घडत आहेत. विरोधी पक्षाने महाराष्ट्राला चूड लावण्याचा प्रकार करू नये. महाराष्ट्राला वेगळी परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. दंगलखोरांचा बुरखा फाडला जाईल. खरे दंगलखोर वेगळेच आहेत. दंगलखोरांना पकडून कठोर कारवाई केली जाईल. विरोधी पक्षाला सांगणं आहे की मांजर डोळे मिटून पाहत असलं तरी जग पाहत असतं. रझा अकादमी वगैरे झूठ आहे, यामागे वेगळी माणसं आहेत. त्यांची तेवढी ताकद नाही.”

नवाब मलिक काय म्हणाले?

“जे काल घडले ते योग्य नाही, ज्यांनी नियमभंग केलाय त्यांच्यावर कारवाई होणारच, आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे, पण हिंसक आंदोलन करू नये. नियोजित पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल हे वसीम रिझवी करत आहेत”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “यापुढे हिंसा होणार नाही याची दक्षता लोकांनी घेतली पाहिजे, ही शांती भंग करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, कोण काय मागणी करेल हा त्यांचा प्रश्न आहे, पण योग्य ती सरकार कारवाई करेल”, असं मलिक म्हणाले. “मी लोकांना आवाहन करतो, की आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. पण आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल, तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता ठेवायला हवी. जे कुणी हिंसेला जबाबदार असेल, त्यांच्यावर सरकारकडून कारवाई होईल”, असंही नवाब मलिक म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने आज अमरावती बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं नुकसान झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यंसोबत सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनाही विनंती केली आहे की, आपलं राज्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शांतता राहील यासाठी सहकार्य करा. अमरावतीत शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करा. आज राज्यातील सर्व भागांत शांतता आहे. अमरावतीत एक घटना घडली आहे आणि तेथील परिस्थितीत लवकरच नियंत्रणात येईल. समाजात द्वेष निर्माण करणारं किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार. आंदोलनास कोणालाही परवानगी नव्हती, फक्त निवेदन देण्यास आणि स्वीकारण्यास परवानगी होती. सोशल मीडियातून सुद्धा अफवा पसरवू नये, सोशल मीडियावर चुकची माहीती पसरवू नये. सर्व नागरिकांनी शांतता राखा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी शांतता राखण्यासाठी मदत करावी असं आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. पालकमंत्र्यांनी आज शहरात ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले. शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर या आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी यावेळी पोलीस व प्रशासनाशी चर्चा केली व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पालकमंत्र्यांनी शहरात सक्करसाथ, इतवारा, वसंत चौक, ऑटो गल्ली, वलगाव रोड, जमिल कॉलनी आदी विविध परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सर्वांना शांततेचे आव्हान केले. अमरावती शहर हे सांस्कृतिक लौकिक असलेले शहर आहे. विविध नवनव्या उद्योगांच्या उभारणीमुळे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. अशा शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडणे अनुचित आहे. शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदी प्रकार घडविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीसांतर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मागील दोन दिवसांपासून अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. ‘महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे, असा आरोपच पटोले यांनी केला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा काय म्हणाल्या?

दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, असे अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मी नागरिकांना आणि राजकीय नेत्यांना आवाहन करतो की येथे सलोखा आणि शांतता राखणे ही आपली जबाबदारी आहे. मला सांगायचे आहे की याला राजकीय रंग देऊ नका तर लोकांच्या सुरक्षेबद्दल बोला.

त्रिपुरात जे घडलंच नाही, त्याची प्रतिक्रिया दुर्दैवी! फडणवीसांची प्रतिक्रिया

त्रिपुरात जे घडलंच नाही, त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं हे दुर्दैवी असून हिंदूंची दुकानं जाळणाऱ्यांवर सरकारनं कडक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्रिपुरातील काही घटनांच्या केवळ अफवांच्या जोरावर महाराष्ट्रातील हिंदू दुकानदारांची दुकानं जाळली जात असतील, तर सरकारनं अशा समाजकंटकांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. वास्तविक, त्रिपुरामध्ये मशीद जाळल्याची केवळ अफवा पसरली आहे. प्रत्यक्षात असं काहीही घडलं नसल्याचं त्रिपुरा सरकारनं आणि त्रिपुरा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्याचे पुरावे देणारे फोटोदेखील जाहीर करण्यात आले आहेत. एवढं सगळं स्पष्टीकरण देऊनही जर असे मोर्चे निघणार असतील आणि निष्पाप हिंदूंची दुकानं जाळली जाणार असतील, तर सरकारनं कारवाई करण्याची गरज असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारमधील मंत्रीच जर जनतेला शांत करण्याऐवजी फूस लावण्याची भूमिका घेत असतील, तर दंगलींचा आळ सरकारवर येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. जी घटनाच घडली नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात हिंसाचार आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात हिंसाचार कसा झाला? त्रिपुरातून ठिणगी

वास्तविक, शुक्रवारच्या नमाजानंतर नांदेड, नाशिक, मालेगाव, अमरावती आणि वाशीममध्ये दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. त्रिपुरातील एका मशिदीचे कथित नुकसान झाल्याच्या वृत्तानंतर हिंसाचार झाला, ज्यामध्ये त्रिपुरा सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तेथे कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही. त्रिपुरा पोलीस तपास करत आहेत की, मशिदीच्या विध्वंसाची खोटी बातमी कोणी आणि कोणत्या उद्देशाने पसरवली.

त्रिपुरा पोलिसांना बनावट पोस्ट सापडली

त्रिपुरा पोलिसांना काही ट्विटर हँडल मिळाले आहेत, ज्याद्वारे खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ट्विटरच्या ९४ लिंक्स आढळून आल्या आहेत, त्यापैकी ४७ लिंक काढून टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांना २४ बनावट पोस्ट सापडल्या, तर ६६ आक्षेपार्ह पोस्ट सापडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ३२ लिंक्स आढळून आल्या, त्यापैकी १३ फेक पोस्ट आहेत तर १९ आक्षेपार्ह आहेत. यूट्यूबवर दोन आक्षेपार्ह लिंक्सही सापडल्या होत्या, त्यापैकी एक काढून टाकण्यात आली आहे.

पाकिस्तानी कनेक्शन काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्रिपुरा पोलिसांना सोशल मीडियावर मशिदीच्या नुकसानीची खोटी माहिती पसरवल्याच्या एकूण 128 लिंक सापडल्या आहेत, त्यापैकी 37 बनावट पोस्ट आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानी कनेक्शनही समोर येत आहे. खरं तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा पोलिसांना UAPA यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ट्विटर खात्याची पाकिस्तानी लिंक सापडली आहे, जी पाकिस्तानच्या JeI दहशतवादी नेटवर्कशी जोडलेली आहे. हे ट्विटर अकाउंट भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.

Tripura Effect Maharashtra Violence Due To Fake Post Who Said What Read In Details

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात