देशमुख – मलिक / सत्तार – राठोड : तुम्ही हार्ड विकेट काढल्या; आम्ही निदान सॉफ्ट विकेट तर काढू; महाविकास आघाडीचे टार्गेट


विशेष प्रतिनिधी

नागपूर :  तुम्ही भले हार्ड विकेट काढल्या, पण आम्ही निदान सॉफ्ट विकेट तर काढू, असे टार्गेट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवल्याचे दिसत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने यावर जास्त कठोर भूमिका घेतली आहे. मागच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान राजकीय बॉलिंग करून त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या हार्ड विकेट काढून दाखविल्या होत्या, इतकेच नाहीतर संजय राठोड, सचिन वाझे परमवीर सिंग यांच्यासारख्या महाविकास आघाडीच्या ब्लू आइड बॉईजना देखील पॅव्हेलियनमध्ये पाठविले होते. पण आता सत्ता बदलली ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आले. त्याला 6 महिने झाले. पण महाविकास आघाडीला अजून एकही विकेट काढणे जमलेले नाही. Devendra Fadanavis bowled out Anil Deshmukh and Nawab Malik, now MVA targets Abdul Sattar and Sanjay Rathod

देवेंद्र फडणवीस यांनी हार्ड विकेट काढून दाखवल्या, तर निदान महाविकास आघाडीने सॉफ्ट विकेट तरी काढल्या पाहिजेत म्हणून सध्या अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या शिंदे गटाच्या मंत्र्यांना जोरजोराने बाउन्सर्स टाकणे सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी निर्लज्जपणा हा शब्द वापरून अब्दुल सत्तारांना टार्गेट केले आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये अब्दुल सत्तारांच्या बाबतीत काही ना काही घडत आहे. ते कधी महिला खासदारांचा अपमान करतात, कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिणार का?, विचारतात आणि आता तर गायरान जमीन खाजगी मालकाला देण्याचा प्रताप त्यांनी केला आहे, असा निर्लज्जपणा तुम्ही सहन कसा करता?, असा सवाल अजितदादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तुम्ही मनात आणले तर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेऊ शकता, असेही अजितदादांनी फडणवीसांना सुनावले आहे. दादांची ही सुनावणी फडणवीसांना असली तरी प्रत्यक्षात अब्दुल सत्तारांच्या रूपाने शिंदे गटाचे मंत्री त्यांनी टार्गेट केले आहेत.



त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय राठोड यांना देखील अशाच गायरान जमिनीच्या मुद्द्यावर टार्गेट केले आहे. पूजा चव्हाण हे प्रकरण सध्या साईडलाईनला गेले असले तरी त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. संजय राठोड हे देखील शिंदे गटाचेच मंत्री आहेत. याच संजय राठोडांविरुद्ध भाजपच्या चित्रा वाघ आणि बाकीच्या नेत्यांनी ठाकरे -“पवार सरकारच्या काळात प्रचंड रान उठवले होते त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. त्यामुळे हे राठोड देखील आता शिंदे गटाकडून मंत्री झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना टार्गेटवर घेतले आहेत.

महाविकास आघाडीच्या या टार्गेटचे वैशिष्ट्य असे की भाजपच्या मंत्र्यांना टार्गेटवर घेणे हे थोडे हार्ड ठरेल याची त्यांना जाणीव आहे. कारण तिथे फडणवीस आहेत. त्यामुळेच एकीकडून शिवसेना ठाकरे गट सीमा प्रश्न किंवा बाकीचे कुठले भावनिक मुद्दे काढून शिंदे गटाला टार्गेट करत असताना जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते शिंदे गटाला टार्गेट करणे पसंत करत आहेत. एक प्रकारे शिंदे गटाचे मंत्री त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. ठाकरे – पवार सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेऊन हार्ड विकेट काढल्या होत्या. आता तेवढे जमले नाही, तर निदान शिंदे गटाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे सॉफ्ट विकेट काढण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविले आहे. आता महाविकास आघाडीचे नेते खरंच या विकेट काढून दाखवतात की अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे आपल्यावर आलेल्या बाउन्सर्सना खणखणीतपणे टोलवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संजय राठोड यांचे प्रकरण

संजय राठोड हे ठाकरे – पवार सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी 29 जुलै 2019 रोजी गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे. महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे झाली होती. सावरगाव (ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) येथील गायरान जमिनीचे हे प्रकरण आहे. शासकीय इ-क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नियमात नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश दिलेले आहेत, असे नमूद करून वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असे लेखी आदेश दिलेले होते. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर या दोघांनी हा शेरा दिला होता.

 सत्तारांचा गायरान जमिनीचा घोळ

महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

Devendra Fadanavis bowled out Anil Deshmukh and Nawab Malik, now MVA targets Abdul Sattar and Sanjay Rathod

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात