शिंदेंची पवार स्तुती; महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिंदेंची पवार स्तुती महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!, अशीच घटना आज पुण्यात घडली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची जी स्तुती केली, त्यातून महाविकास आघाडीतल्या फुटाफुटीची अधिकृत नांदीच झाल्याचे दिसत आहे!! CM eknath shinde parise sharad Pawar may lead disturbance in MVA, Uddhav Thackeray and Congress

शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांनी कृषी मंत्री म्हणून देशातल्या कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणले. काही बदल घडवले. ते राज्याच्या हितासाठी नेहमीच मार्गदर्शन करतात. सरकार कोणाचेही असो, त्या सरकारला सूचना करतात. मी देखील त्यांना कधी सल्ला मागण्यासाठी फोन करतो, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची स्तुती केली आहे. याचे वेगवेगळे अर्थ मराठी माध्यमांनी आपापल्या बातम्यातून काढले आहेत. पण शिंदे यांनी पवारांची फक्त स्तुती केली हे अर्धसत्य आहे. उलट जाहीर व्यासपीठावरून त्यांनी पवारांना न आवडणारे विषय देखील आवर्जून काढले. केंद्रातले सहकार खाते अमित शाहांकडे आहे. ते महाराष्ट्रातल्या सहकार चळवळी विषयी मार्गदर्शन करत असतात याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

दावोस मधून महाराष्ट्रात झालेली गुंतवणूक, त्याची आकडेवारी यावरून महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी टीका केली. त्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी पवारांसमोर थेट प्रत्युत्तर दिले. जी आकडेवारी सरकारने दिली आहे, ती खरी आहे दावोसमधून महाराष्ट्रातली टीम परतल्यानंतर त्याचे सगळे तपशील जाहीर करून दावोस मध्ये जे करार झाले, ते सगळे प्रत्यक्ष अमलात येतील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली हे प्रत्युत्तर जरी शरद पवार यांच्यासमोर दिले असले, तरी ते प्रत्यक्षात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना दिलेले प्रत्युत्तर होते.

सुभाष देसाई यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे – फडणवीस सरकारच्या दावोस मधल्या करारावर शंका व्यक्त केल्या होत्या. त्याला देखील एकनाथ शिंदे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या कार्यक्रमानंतर त्यांच्या भोवती जमलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रत्युत्तर दिले. दावोस मध्ये आधी जे मंत्री गेले होते, त्यांनी कोणते करार केले, त्या कंपन्यांच्या टर्नओव्हर काय होता? बॅलन्सशीट काय होते? यामध्ये मी जाणार नाही, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. जाहीर कार्यक्रमात त्यांनी जयंत पाटलांना टोला हाणून घेतला. केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केले आहे. त्या खात्याचे मंत्रीपद अमित शाह यांच्याकडे आहे. ते महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीविषयी मार्गदर्शन करतात, असा पवारांना न आवडणारा विषय देखील एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर आवर्जून काढला. सहकारी साखर कारखान्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते अडचणीत आले असताना अमित शाहांचा विषय शिंदे यांनी काढून प्रत्यक्षात पवारांनाही डिवचले आहे. माध्यमांनी मात्र पवार स्तुतीच्या बातम्या जास्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची थेट स्तुती करणे याचा सरळ अर्थ उद्धव ठाकरेंना डिवचणे असेच राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. तशीही महाविकास आघाडी आता कागदावरच उरली आहे. प्रत्येक घटक पक्ष आपापली दिशा स्वतंत्रपणे शोधण्याच्या मूडमध्ये आहे. ठाकरे गटाला स्वतःच्या अस्तित्वाची चिंता भेडसावत आहे, तर राष्ट्रवादीला आपला गमावलेला पाया विस्तारण्याची चिंता आहे. काँग्रेस आपल्या अंतर्गत कलाहाने ग्रासली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेसला जी छोटी नवसंजीवनी मिळाली होती. ती नवसंजीवनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सत्यजित तांबे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे विफल ठरली आहे. 26 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या काँग्रेसच्या हात जोडो अभियानाला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळवायचा?, याची चिंता काँग्रेस जणांना भेडसावत आहे.

याचा अर्थ महाविकास आघाडीतली तीनही घटक पक्ष वेगवेगळ्या चिंतांनी ग्रासले आहेत. अशातच जे मुळातच स्वतंत्रपणे स्वतःचे अस्तित्व शोधू पाहत आहेत अशा घटक पक्षांना अधिकृतरित्या वेगळे पाडण्याचे “राजकीय काम” एकनाथ शिंदे यांच्या पवार स्तुतीने केल्यास आश्चर्य वाटायला नको!!

कारण यातून एकनाथ शिंदे यांनी जसे शिवसेनेच्या ठाकरे गटाला डिवचले, तसेच ते काँग्रेसलाही डिवचले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांनी जरूर विश्वास ठेवला होता. पण तो सत्तेपुरता होता. आता स्वतःच्या पक्षांच्या राजकीय अस्तित्वासाठी पवारांवर विश्वास ठेवणे अथवा विसंबून राहणे शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना तसेही शक्य नाही. त्यामुळे शिंदे यांच्या पवार स्तुतीतून महाविकास आघाडीच्या फाटाफुटीची नांदी म्हटली गेल्यास त्यात नवल असणार नाही!!

CM eknath shinde parise sharad Pawar may lead disturbance in MVA, Uddhav Thackeray and Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात