विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Shiv Sena महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शिवसेना ठाकरे गटासमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार बंडाच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली असून, ते दुपारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.Shiv Sena
ठाकरेंच्या बैठकीला दांडी, बंडाची चर्चा आणखी तीव्र
१७ जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीला अनेक खासदार अनुपस्थित राहिल्याने बंडाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अनुपस्थित राहिलेल्यांमध्ये संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश होता.Shiv Sena
सध्या लोकसभेत ठाकरे गटाचे नऊ खासदार आहेत. पक्षफुटीच्या दृष्टीने आवश्यक असलेला दोन-तृतीयांश आकडा सहा खासदारांचा असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांचे स्पष्ट संकेत
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट संकेत दिले आहेत. १८ जूनपर्यंत अनेक खासदारांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, मात्र त्यानंतर झालेल्या काही वक्तव्यांमुळे विचार बदलल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याशी कोणताही वैयक्तिक मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पक्षाची विचारधारा बदलत नसून एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आष्टीकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळण्यात येणाऱ्या अडचणी, विरोधी पक्षातील मर्यादा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीचा निर्णयामागील प्रमुख कारणांमध्ये उल्लेख केला.
ओमराजेंना रोखण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना पक्षात कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजेंची भेट घेतल्याची चर्चा आहे.
ओमराजे यांचा निर्णय या संपूर्ण राजकीय समीकरणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, त्यांच्याभोवतीचे राजकीय सस्पेन्स अद्याप कायम आहे.
उद्धव ठाकरे आज आमदार-आमदार परिषद घेणार
पक्षातील सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी अडीच वाजता पक्षाचे सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते पक्षातील परिस्थितीवर भाष्य करण्याबरोबरच पुढील रणनीती जाहीर करू शकतात.
राजकीय निरीक्षकांच्या मते, ही बैठक ठाकरे गटासाठी निर्णायक ठरू शकते.
फडणवीस-शिंदेंचे सूचक इशारे
या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेतील संभाव्य फुटीबाबत विचारले असता त्यांनी मिश्कील शब्दांत, “ऑपरेशन यशस्वी झाले आणि रुग्ण पूर्णपणे निरोगी आहे,” असे वक्तव्य केले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले. “आम्ही कोणतेही ऑपरेशन सुरू केले की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. लवकरच मोठी बातमी सर्वांना कळेल,” असे ते म्हणाले.
‘हीच खरी शिवसेना’, उद्धव ठाकरेंचा दावा
दुसरीकडे, पक्षातील सुरू असलेल्या बंडखोरीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी निराश नसल्याचे सांगितले. त्यांनी यासाठी थेट भाजपला जबाबदार धरले.
“आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. भाजपला शिवसेना संपवून तिच्यावर ताबा मिळवायचा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
आजच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
सहा खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात जातात का, ओमराजे निंबाळकर कोणती भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरे आपल्या पक्षातील असंतोष रोखण्यात यशस्वी ठरतात का, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
त्यामुळे आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, शिवसेनेतील सत्तासंघर्ष नव्या वळणावर पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App