विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉकरोच जनता पार्टी (CJP), विदेशी निधी, ईडी चौकशी आणि गृह विभागाची तपासणी हे मुद्दे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीसह राज्यातील काही संस्थांना परदेशातून मिळालेल्या निधीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र गृह विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) संबंधित संस्थांची बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि निधीचे स्रोत तपासत असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
दिल्लीतील ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने ‘जेन-झी’ तरुण सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या प्रसिद्धीसोबतच संस्थेला मिळणाऱ्या विदेशी निधीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
पंकज भोयर म्हणाले, “कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांची गृह विभाग आणि ईडीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित संस्थांची बँक खाती, निधीचे स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.”
परदेशी देणग्या कायदेशीर प्रक्रियेनुसार स्वीकारण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत भोयर यांनी निधीच्या वापराबाबत इशारा दिला. परदेशातून मिळालेल्या पैशांचा वापर देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी किंवा बेकायदेशीर कारवायांसाठी झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारच्या चौकशीवर टीका केली आहे. “जर आमच्या संस्थेला खरोखरच परदेशातून निधी मिळत असेल आणि त्याचा गैरवापर होत असेल, तर ते गृहमंत्रालयाच्या यंत्रणेचे अपयश आहे,” असे दिपके म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टीच्या विदेशी निधीची चौकशी आर्थिक अनियमिततेच्या ठोस माहितीच्या आधारे सुरू करण्यात आली आहे की आंदोलनानंतर संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणातील ईडी आणि गृह विभागाच्या तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App