
नाशिक : मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत “बळ” शिरल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण??, यावर मंथनाचा वेग वाढला. त्या पदासाठी तिन्ही पक्षातील नेते यासाठी आपली ताकद पणाला लावली. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते उघडपणे बोलले, पण शरद पवारांनी आपले मत गुलदस्त्यातच ठेवले होते. Sharad pawar
पण आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यावर मात्र शरद पवारांनी लगेच प्रतिक्रिया दिली. पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखे नाही, याची कबुली शरद पवारांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत दिली.
एरवी पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रादेशिक पातळीवरच्या नेत्याच्या अडचणीच्या ठरणाऱ्या वक्तव्याकडे एकतर दुर्लक्ष तरी करतात किंवा खिल्ली उडवून मोकळे होतात. राज, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा भाजप मधले प्रदेश पातळीवरचे नेते यांच्या अनेक वक्तव्यांना पवार जुमानत नाहीत. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत पवार तसे करत नाहीत. किंबहुना तसे करू शकत नाहीत. कारण पृथ्वीराज चव्हाण हे केवळ काँग्रेस मधले प्रादेशिक पातळीवरचे नेते नाहीत, तर ते केंद्राने महाराष्ट्रात पाठविलेले नेते आहेत. सोनिया गांधींचे विश्वासू आहेत.
इतकेच नाही, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पवारांना ते अनेक बाबतीत “जड” गेले होते. पवारांचे अनेकदा त्यांनी बिलकूल ऐकले नाही. किंबहुना पवारांच्या राष्ट्रवादीवर सिंचन घोटाळ्यापासून शिखर बँक घोटाळ्यापर्यंत जेवढे म्हणून आरोप झाले, त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता मूळात पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावर राहून केली होती. 70000 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात सिंचन 0.1 % झाले, हा अहवाल पृथ्वीराज बाबांनी उघड केला होता. शिखर बँक भ्रष्टाचार बाहेर आल्याबरोबर त्यांनी पवारांच्या वर्चस्वाखालचे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला होता. पवारांच्या अनेक “इंटरेस्ट”च्या फायली पृथ्वीराज बाबांनी अडकवून ठेवल्या होत्या. त्यामुळे पवार संतापून त्यांना फायलींवर सही करायला मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय, असे म्हणाले होते. पण तरीही पृथ्वीराज चव्हाण बधले नव्हते. एकूणच पृथ्वीराज बाबा पवारांना “जड” गेलेले मुख्यमंत्री होते.
पण पृथ्वीराज बाबा फक्त मुख्यमंत्री होते म्हणून पवारांना “जड” गेले, असे नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून बाजूला व्हावे लागल्यानंतर देखील अगदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील ते पवारांना “जड” गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची माळ पवारांना पृथ्वीराज बाबांच्या गळ्यात घालायची होती, पण पृथ्वीराज बाबांनी राजकीय चतुराईने पवारांवर मात करून पराभूत होणाऱ्या जागेची म्हणजेच साताऱ्याच्या लोकसभेची उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली नव्हती. त्यामुळे एकूणच मुत्सद्देगिरीच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण पवारांना “जड” ठरणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे वक्तव्य केले, त्यातले पुरेसे गांभीर्य पवारांना लगेच जाणवले, म्हणूनच त्यांनी पृथ्वीराज बाबांचे मत दुर्लक्षित करता येणार नाही, याची कबुली देऊन टाकली.
काँग्रेसची भूमिका काय?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि बहुमत मिळवून सत्तेत येतो, तेव्हा युती किंवा आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार असतात, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होतो. सरकारच्या स्थिरतेच्या दृष्टीने ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील. त्या पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील.
शरद पवारांची कबुली
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीमधील एक जबाबदार घटक आहेत, ते आमचे सहकारी आहेत. त्यांनी जे मत मांडलं आहे ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांचे केवळ 9 खासदार निवडून आले. तर काँग्रसचे 13 उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर रष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार गट) 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. त्यात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आली. त्यामुळे काँग्रेसचे आणि पृथ्वीराज बाबांचे राजकीय वजन वाढले आहे. ते आता नाईलाज झाला तरी पवार आणि ठाकरे यांना पेलावे लागणार आहे. पवारांची कबुली त्याचीच तर निदर्शक आहे!!
Sharad pawar has to accept prithviraj chavan strength in MVA
महत्वाच्या बातम्या
- Paris olympics : भारताचा खेळाडूंवर 470 कोटी खर्च, माध्यमांनी काढला खुसपटी अर्थ; पण विकसित देश खर्च किती करतात??
- Muhammad Yunus : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर सोडले मौन!
- Hindenburg : हिंडेनबर्गच्या नव्या अहवालावरून भाजपचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
- UPI payments : UPI पेमेंटमध्ये 2 मोठे बदल आहेत, कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत सर्व काही अगदी सोपे होणार