विशेष प्रतिनिधी
सोलापूर : कुणाकुणाच्या खांद्यावर बंदूका ठेवून महाराष्ट्रात जाती जातींमध्ये विष कालवलं जातंय. पण महाराष्ट्राचा मणिपूर करायला शरद पवारांनी हातभार लावू नये, अशा परखड शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) यांनी महाराष्ट्रातल्या आरक्षण मुद्द्यावर पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले.
महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला हाणला. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी शरद पवारांवर खोचक शब्दांत टीका केली.
राज ठाकरे म्हणाले :
शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही!!
मी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी स्पष्ट सांगिलतं होतं, की मी हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी यांना देतो आहे. तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठंही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषय नाही.
सध्या माथी भडकवून राजकारण
महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठं. महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे. हे बघणंही गरजेचं आहे. मूळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचं प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही.
बाहेरच्या राज्यातील तरुण-तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण-नोकऱ्या मिळवतात. या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाही, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आज जातीपातीचं प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात, असं ऐकलं होतं. आता हे लोन महाराष्ट्रात पोहोचलं आहे, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे.
आज राजकारणाचा स्तर खाली आली आहे. राजकीय नेते ऐकमेकांना ऐकेरी भाषत बोलत आहेत. यांची विधानं माध्यमांनी दाखवणं बंद केलं पाहिजे. सोशल मीडियामुळे यांची डोकी फिरली आहे, असं वातावरण महाराष्ट्रात कधीही नव्हतं!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more