विशेष प्रतिनिधी
सांगली : आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला कुठलाही विरोध नाही. मात्र जो ओबीसींवर अन्याय होता कामा नये असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी उपस्थित ओबीसी जनसमुदायाला केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा सांगली येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, सांगली जिल्हा हा क्रांतीकारकांचा कलाकारांचा आहे. यामध्ये आण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव, बालगंधर्व, वसंतदादा पाटील, राजाराम बापु पाटील, बापू बिरू वाटेगावकर या थोर विभुतींचा हा सांगली जिल्हा आहे. मेळाव्याला विरोध ज्यांनी केला त्या नव्या पिढीने वसंतदादा पाटील यांनी जे काम केलं त्याचं आदर्श या नवीन पिढीने घ्यायला हवा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
ते म्हणाले की, महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा वारसा आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान स्थान होत. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यात अंगरक्षकही होते. त्यांनी हिंदू मुस्लिम यासह सर्व लहान सहान जातींना त्यांनी सोबत घेऊन राज्य केलं. आता मात्र काही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांना मारतात. त्यांनी अनेकांची घरे जाळली, हॉटेलची जाळपोळ केली, अनेकांना मारहाण केली. हे कशासाठी करताय. तुम्हाला आरक्षण हवय ते कायद्याने घ्या. आमचा कुठलाही विरोध नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या हीच मागणी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
ते म्हणाले की, काही लोक भुजबळांनी सर्व आरक्षण खाल्ल असे म्हणताय त्यांना मला सांगायचं आहे. ओबीसींची संख्या ही 54 टक्के आहे. त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी आपली मागणी आहे. जनगणना केली तर सर्वच प्रश्न सुटतील सर्वांना न्याय मिळेल. घाई घाईने भाटिया कमिशनने केलेले सर्वेक्षण आम्ही मान्य करत नाही. बिहार सारख्या राज्यात आम्ही 60 टक्याहून अधिक आहोत. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण दिलं आहे. त्यातील केवळ 9.5 टक्के जागेवर ओबीसींना संधी मिळाली आहे. त्यामुळे आमचा बॅकलॉक किती मोठा आहे तो आधी भरला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जे म्हणताय आम्ही २८८ जागा लढू त्यांनी किमान ८८ तरी जागा लढाव्या त्यातील ८ तरी निवडून आणावेत हिम्मत असेल तर मैदानात उतरावं निवडणूक लढावी. आम्ही कुणाला शिव्या देणार नाही. आम्ही सभ्यतेने बोलू, आणि तुम्हालाही सुबुद्ध देण्याची प्रार्थना करू असा चिमटा छगन भुजबळ यांनी काढला.
ते म्हणाले की, आपल्याला आपले हक्क मिळवायचे असेल तर सर्व ओबीसी समाजाने एकत्र राहायला हवे. एकत्र राहिलो तरच आपण आपले हक्क मिळू शकतो. त्यामुळे ओबीसी समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून आपले न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले.
ते म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आपण शरद पवार साहेबांची भेट घेतली. अनेकांनी यावर वेगवेगळी चर्चा केली त्याची आपल्याला फिकीर नाही. आपला हा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यामुळे आपण पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनीही त्याला सकारात्मकता दर्शवली त्यानंतर त्यांच्याकडून देखील यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचे सांगत महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा या पंक्तीतून त्यांनी राज्यात शांतता राहीली पाहिजे याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App