विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा सोलापूरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच महाविकास आघाडीच्या बैठकांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर मुंबईत महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन पुढची रणनीती ठरवली.
मनोज जरांगे यांनी काल सोलापूरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. त्यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, खासदार नारायण राणे यांच्यावर शेरीबाजी करून टीकास्त्र सोडले. लोकं मतांसाठी पावसात भिजत होते. तुम्ही जातीसाठी पावसात भिजा, असे सांगून मनोज जरांगे यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. तुम्ही पावसात भिजला तरी तुम्हाला मते देणार नाही, असे ते म्हणाले. पण त्यांनी सगळ्या टीकेचा रोख देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या भोवतीच ठेवला. जिथे फडणवीस आणि भुजबळ एकत्र जातील तिथले त्यांचे उमेदवार पाडा, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले.
मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करताच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हुरूप चढला. जयंत पाटील, नाना पटोले, विनायक राऊत, विजय वडेट्टीवार आदींनी एकत्र बैठक घेतली. 16 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करायचे ठरले. त्याच बरोबर 20 ऑगस्टला राजीव गांधींच्या जयंतीदिनी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी महाविकास आघाडीचा महामेळावा घेण्याचे देखील या नेत्यांनी ठरविले. त्यापूर्वी काल सकाळीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली.
मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हुरूप आल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेऊन वेगवेगळे राजकीय कार्यक्रम ठरवायला अशी सुरुवात केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more