विशेष प्रतिनिधी
पुणे : दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र, रेशनकार्ड, घरकुल देण्यासाठी प्रयत्न जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांगांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत Huge response to the ‘Divyang Kalyan Department Divyanga Ke Dari’ campaign camp
दिव्यांगांच्या अडचणी अधिक गतीने सोडवण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग धोरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी केले.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’अभियानांतर्गत महासैनिक दरबार सभागृहात एकदिवसीय शिबीर घेण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा परिषदेचं जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी विशेष प्राविण्यप्राप्त व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांगांसाठी कार्य करणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त देवदत्त माने, केंद्रीय जीएसटी विभागाच्या सहायक आयुक्त पूजा कदम, लेखिका/अनुवादक सोनाली नवांगुळ, चित्रकार विजय टीपुगडे, भारत श्री व महाराष्ट्र श्री बॉडीबिल्डर किरण बावडेकर, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती दीक्षा शिरगावकर, सांस्कृतिक मंत्रालयाकडून यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप प्राप्त प्रणय बेलेकर, वरिष्ठ राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील रौप्यपदक विजेता उत्कर्ष चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.
आमदार बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. तथापि, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची गाव, नगरपंचायत अथवा महानगरपालिकेत नोंदणी होणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने दिव्यांगांचे पाय, डोळे, आवाज बनून संवेदशील मनाने दिव्यांगांच्या अडचणी दूर कराव्यात.
समाजातील सक्षम लोक छोट्यामोठ्या समस्यांनी त्रस्त होतात, पण दिव्यांग व्यक्ती मात्र आपल्या दिव्यांगत्वावर व प्रत्येक अडचणीवर मात करतात. अशावेळी समाजातील प्रत्येक घटकानेही संवेदनशील मनाने दिव्यांग आणि गरजवंतांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यास देश अधिक ताकदवान व अधिक बलशाली होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिव्यांगांनी दुःख विसरुन आत्मविश्वासाने पुढे जावे.
दिव्यांगांसाठी युडीआयडी ओळखपत्र, रेशनकार्ड, घरकुल मिळवून देण्यात येत आहेत. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे सूचित करुन दिव्यांगांच्या बचतगटांना उद्योग, शाळा, सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास साधत हा विभाग अधिक गतिशील बनवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी लावण्यात आलेल्या सर्व स्टॉल्सला भेट दिली. तसेच दिव्यांगांना येणाऱ्या अडीअडचणींबाबतची पत्रे स्वीकारुन याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी न थांबता पुढे वाटचाल करायची असते, हा विचार खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधव देतात. या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, नोकरी, शासकीय योजना व त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची माहिती दिव्यांगांना देण्यात येत असून दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, दिव्यांग बांधवांकरिता ‘दिव्यांग भवन’ उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने लवकरच जागा देण्यात येईल. दिव्यांगांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. दिव्यांगांचा विवाह, खेळाला प्रोत्साहन, कौशल्य विकास, सेंसरी गार्डन सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच विनासायास शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
मनोगतात पूजा कदम यांनी या अभियानाचे महत्व विशद करुन युपीएससी परीक्षेतील यशापर्यंतचा आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला. दिव्यांगांनी आपल्यातील कमतरतेवर विचार न करता आपल्यातील क्षमता ओळखून शासनाच्या योजनांचा लाभ घेवून जीवनात यशस्वी वाटचाल करावी, असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रास्ताविकात म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा स्वतंत्र विभाग सुरु झाला आहे. शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान राबवण्यात येत आहे. या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून त्यांनी या अभियानाची माहिती दिली.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. महासैनिक दरबार सभागृहात सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या या शिबिरात नोंदणीसाठी दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या आकर्षक राख्या, कापडी पिशव्या, कपडे आदी वस्तूंच्या स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App