सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट भागांसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बीएमसी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय नवी मुंबई, ठाणे रायगडमधील आणि पुणे जिल्ह्यातीलही सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबई शहरात सोमवारी नऊ तासांत 101.8 मिलीमीटर (मिमी) पावसाची नोंद झाली, जी त्याच कालावधीत झालेल्या उपनगरांच्या तुलनेत जवळपास सात पट अधिक आहे, तर महाराष्ट्राच्या इतर काही भागातही अतिवृष्टी झाली. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, शहरातील कुलाबा हवामान केंद्रात सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 101.8 मिमी पावसाची नोंद झाली.
याउलट, मुंबईच्या उपनगरातील हवामानाचे मापदंड मोजणाऱ्या सांताक्रूझ हवामान केंद्रात सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत केवळ 14.8 मिमी पावसाची नोंद झाली, असे ते म्हणाले. साधारणपणे मुंबई शहरात उपनगरांच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडतो.
IMD ने सांगितले की, मंगळवारी सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट भागांसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दक्षिण कोकणासाठीही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. IMD ने मराठवाडा आणि विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App