विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Ravikant Tupkar : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आता संघर्ष पाहायला मिळत आहे. उठलं सुटलं मला नोटिसा पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा म्हणतात, मी काय दरोडा टाकला आहे का?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना केला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करावा, असाही इशारा तुपकर यांनी दिला. तर आपण या निवडणुकीत हारलो असलो तरी जनतेच्या मनात जिंकलो आहे. त्यामुळे विधानसभेच्या सहाच्या सहा जागा लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (6 जुलै) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. Ravikant Tupkar will contest all seats in Buldhana Assembly; Preparing for the third front with Bachu Kadu
माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमा
रविकांत तुपकर म्हणाले की, लोकसभेचा पराभव आपण स्वीकारला असून अपयशाचा बाप होण्यास तयार आहे. त्यामुळे चुका दुरूस्त करून आपल्याला पुढे जायचं असल्याचं तुपकर म्हणाले. शेट्टी यांना थेट आव्हान देताना माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमावी, आम्ही लोकसभा निवडणुकीत अपक्ष असूनही पक्षापेक्षा जास्त मते घेतली, असा खोचक टोला देखील लगावला.
मी काय दरोडा टाकला आहे का?
उठलं सुटलं मला नोटिसा पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा म्हणतात, मी काय दरोडा टाकला आहे का? अशी विचारणा रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सहाच्या सहा विधानसभा जागा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून फारकत घेतली आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती
तुपकर म्हणाले की मी इमानदारीने वागतो म्हणून माझ्यासोबत 22 वर्षांपासून लोक टिकून आहेत. अनेक नेते आमदार म्हणतात की आपल्याला तुपकर सारखं करायचं आहे. ते पुढे म्हणाले की मी जर लोकसभा निवडणूक लढवली नसती तर निवडणूक हिंदू मुस्लिम अशी निवडणूक झाली असती. माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आल्याने आता अर्थसंकल्पात पण आपण आलो असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
पराभवाने खचून जाणार नाही, 2.50 लाख मत पडली
या बैठकीत रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत म्हटलं की, जरी लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो, तरी जनतेच्या मनात आपण जिंकलेलो आहोत. आपल्याला अडीच लाख मत पडली आहेत. प्रतापराव जाधव हे कागदावर जरी जिंकले असले तरी ते जनतेच्या मनातून हरले आहेत, जनतेचा कौल आपल्या सोबत असल्याने आता आपल्याला पराभवाला खचून न जाता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढायची आहे. आणि उद्यापासूनच आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागायचं आहे, असे आवाहन केले.
तिसरी आघाडी देण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंची भेट
रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलताना तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आल्यावर आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय घेऊ, असं सांगतानाच बच्चू कडू यांच्याशी काल भेट झाली. आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहोत. या तिसऱ्या आघाडीत येण्यास बच्चू कडू यांनी होकार दिला आहे. पण जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ, असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App