निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!


सरकार कोणाचेही असो, अजित पवार हे जर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असतील, तर ते आमदार निधी वाटपावरून अडचणीतच येतात, असा इतिहास आता घडतो आहे. ठाकरे – पवार सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी अजित पवारांवरच निधी वाटपात अन्याय केल्याचा आरोप केला होता. तोच आरोप आता अजितदादा हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनल्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते करत आहेत. Fund Distribution : The true test of Ajit pawar in the control of BJP elites and the pressure of Congress

काँग्रेसच्या नेत्यांनी तर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाच निधीवाटपातला अन्याय दूर करायचा साकडे घातले आहे. त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला नाही, तर अजितदादांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

याचाच अर्थ सरकार कोणाचेही असो अजित पवार जर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असतील, तर ते निधी वाटपावरून कोणत्या ना कोणत्या गटाकडून अडचणीत येणारच, असा आहे. त्याचे खरे कारण अजितदादांच्या अर्थमंत्रीपदात आणि त्याहीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत राजकीय स्वरूपात दडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा “डीएनए” सत्तेचा आहे, असे पवारनिष्ठ पत्रकार नेहमीच म्हणत असतात. पण त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा “डीएनए” सत्तेच्या वळचणीला राहून सातत्याने आपल्याच पक्षाचे भांडवलीकरण करणे हा आहे आणि तो आता सर्व राजकीय पक्षांनी नेमकेपणाने ओळखला आहे. त्यामुळेच अजितदादा संपूर्ण महाराष्ट्राचे अर्थमंत्री न ठरता, ते केवळ त्यांच्या गटापुरते अर्थमंत्री ठरत आहेत. किंबहुना ठरविले जात आहेत!!

अजितदादांनीच सरकार चालवल्याचा नॅरेटिव्ह

अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये मराठी माध्यमांनी महाराष्ट्रात अजित पवारच सगळे सरकार चालवत आहेत. भाजपने सरकार चालवण्यासाठी अजितदादांना आउट सोर्स केले आहे, असे नॅरेटिव्ह चालवले. जणू काही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नावाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अस्तित्वातच नाहीत आणि सगळे निर्णय अजित पवार एकट्याच्या बळावर घेत आहेत, असे पवारांना सुखावणारे “परसेप्शन” मराठी माध्यमांनी तयार केले होते.

अजितनिष्ठांचा फुगा फोडला

पण तशी वस्तुस्थिती नव्हती आणि काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अजित पवारांना विरुद्ध तक्रार करत तो पवारनिष्ठ नॅरेटिव्हचा फुगा फोडला आहे. अजित पवार हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, याचा अर्थ ते तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांनी केलेले निधी वाटप अथवा त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय हा शिंदे – फडणवीसांच्या नियंत्रणाखालचा असेल, हे भाजप श्रेष्ठींनी अजित पवारांना मंत्रिमंडळात घेतानाच स्पष्टपणे बजावले आहे आणि अजित पवारांनाही ते मान्य करावे लागले आहे.

आता जेव्हा काँग्रेस नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले, त्यांच्यापुढे निधी वाटपातल्या अन्यायाचे गाऱ्हाणे मांडले, त्यावेळीच अजित पवार स्वयंभू निर्णय घेणारे नेते नाहीत, हे अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेत्यांनीच पवारनिष्ठांना दाखवून दिले.त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासनही तितकेच महत्त्वाचे आहे. मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून तुमच्या गाऱ्हाण्यावर तोडगा काढीन, असे मुख्यमंत्री म्हणाले. यातच शिंदे – फडणवीस सरकार मधला सत्ता समतोल दिसतो आणि तो सत्ता समतोल स्वतः शिंदे – फडणवीसांनी अथवा अजित पवारांनी नव्हे, तर भाजप श्रेष्ठींनी तयार केला आहे हेही स्पष्ट दिसते.

पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना चाप

म्हणूनच अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या समर्थकांनी आणि मराठी माध्यमांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चालवलेली मोहीम याला शिंदे – फडणवीसांमार्फत भाजप श्रेष्ठींनी चाप लावला आहे.

काँग्रेस नेत्यांची हुशारी

काँग्रेस नेत्यांना त्यातले खरे इंगित कळले आहे. काँग्रेस नेते सुद्धा राजकारणात मुरलेले आणि या अत्यंत हुशार आहेत. म्हणूनच त्यांनी अजित पवारांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवला नाही, तर कोर्टात जाण्याचे इशारा देखील त्यांनी देऊन अजित दादांना कायद्याच्या कसोटीवर एक्स्पोज करण्याचे ठरविले आहे.*

अजितदादांचे अर्थमंत्रीपद आता सोपे नाही

आधीच्या काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारमध्ये आणि नंतरच्या ठाकरे – पवार सरकारमध्ये अजितदादांचे अर्थमंत्री पद जेवढे “सोपे” होते, तेवढे शिंदे – फडणवीसांच्या सरकार मधले अजितदादांचे अर्थमंत्री पद “सोपे” राहिलेले नाही. अर्थमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे भांडवलीकरण करण्याची अजितदादांची सवय आहे. ती ठाकरे – पवार सरकार असेपर्यंत निर्धोक होती. तेवढी आता ती उरलेली नाही. एकीकडून शिंदे – फडणवीसांचे आणि त्यावरच्या भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि दुसरीकडून काँग्रेस सारख्या मुरब्बी पक्षाचा दबाव यात अजितदादांच्या अर्थमंत्रीपदाची खरी राजकीय कसोटी आहे. ती कसोटी पार करताना अजितदादांना स्वयंभूपणे काही करणे शक्य नाही. त्यासाठी त्यांना शिंदे – फडणवीसांची मदत घ्यावीच लागेल आणि त्याचवेळी भाजप श्रेष्ठींचे कठोर नियंत्रण त्यांना सहन करावे लागेल. ही अजितनिष्ठ समर्थकांना आणि पवारनिष्ठ माध्यमांना न पचणारी राजकीय वस्तुस्थिती आहे!!

Fund Distribution : The true test of Ajit pawar in the control of BJP elites and the pressure of Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात