विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dattatray Bharne राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी पंढरपूर येथून केले आहे. इंधनाची उगाचच साठवणूक करण्यापेक्षा गरजेनुसारच खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.Dattatray Bharne
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज पंढपूर दौऱ्यावर होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांबाबत विचारले असता ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी इंधन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई किंवा धावपळ करण्याची गरज नाही. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, मात्र जेव्हा लागेल तेव्हाच इंधन घ्यावे. साठवणूक केल्यामुळे विनाकारण गोंधळ निर्माण होत आहे.” याचवेळी दत्तात्रय भरणे यांनी पावसासाठी पांडुरंगाला साकडे घालत हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरू दे आणि राज्यात चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थनाही केली.Dattatray Bharne
परभणीत पेट्रोल पंपावर हाणामारी
एकीकडे कृषीमंत्री साठा मुबलक असल्याचे सांगत असताना, परभणीच्या मानवत तालुक्यात डिझेलसाठी चक्क हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारात असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रांगेत उभे राहण्यावरून दोन गटांत जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटांनी एकमेकांवर डिझेलसाठी आणलेले प्लास्टिकचे ड्रम आणि कॅन फेकून मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, काही काळ इंधन वितरणही थांबवावे लागले होते.
वाळू माफियांना प्राधान्य?
एकीकडे पेरणी आणि शेतीकामाच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेलसाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे वाळू माफियांना गुपचूप हजारो रुपयांच्या इंधनाची विक्री केली जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सर्वसामान्यांना ठराविक मर्यादेतच इंधन दिले जात असताना माफियांना मात्र झुकते माप मिळत असल्याचा आरोप होत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जळगावात जिल्हाधिकारी मैदानात
एकीकडे राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. मात्र, जळगाव शहरातही पेट्रोल पंपांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी स्वतः विविध पंपांना भेटी देऊन पाहणी केली. काही पंपांवर पोलिस बंदोबस्तात डिझेल वाटप सुरू असल्याचे दिसून आले. सुरक्षेच्या कारणास्तव बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये, असे सक्त निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले, तरी ग्रामीण भागात इंधनासाठी होणारी हाणामारी आणि वाढता तणाव पाहता, इंधन वितरणातील विस्कळीतपणा दूर करण्याचे मोठे आवाहन सरकारसमोर उभे राहिले आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App