विशेष प्रतिनिधी
लातूर : विधानसभा निवडणूक 1995. लातूरमध्ये अजिंक्य मानले जाणारे काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचा जनता दलाचे शिवाजीराव कव्हेकर यांनी 30,000 मतांनी पराभव केला आणि इतिहास घडविला. पुन्हा एकदा या इतिहासाची पुनरावृत्ती लातूरमध्ये होतेय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे अमित देशमुख यांच्यासमोर यावेळी सोईचा उमेदवार नाही तर भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील यांनी अमित देशमुख यांना आव्हान दिले आहे.
भाजपकडून देशमुख यांच्या समोर सतत सोयीचा उमेदवार उभा केला जातो, अशीच समजूत मतदारसंघातील मतदारांची होती, त्यामुळे देशमुख यांचा विजय दरवेळी सोप्पा होत गेला. मात्र यावेळी भाजपकडून प्रथमच तगडे आव्हान त्यांना देण्यात आले आहे . माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील लढत असल्याने चुरशीची निवडणूक होणार आहे.
त्यातच वंचित बहुजन आघाडीनं विनोद खटके यांना उभे केले आहे. त्यामुळे दलीत आणि मुस्लिम मतांच्या काँग्रेसच्या भरवशाच्या मतपेढीला सुरुंग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही निवडणूक जरी कागदावर तिरंगी असली तरी मुख्य लढत ही देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठापणाला लागलीय.
लातूर शहर मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास याच मतदारसंघाने दोन वेळा मुख्यमंत्री दिलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघाचं १९८० पासून प्रतिनिधित्व करीत आलेय. विलासरावांचा हा वारसा पुढे अमित देशमुख यांनी चालवत सलग तीन वेळा मतदारसंघावर विजय मिळवलाय… भाजपकडून त्यांना फारसे तोडीचे उमेदवार दिले जात नाहीत अशी खंत येथील मतदारसंघामध्ये होती. हेच पाहून भाजपने यंदा अर्चना पाटलांना उभं केलंय..
लोकसभा निवडणुकीच्या पुर्वीच अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिलीय. डॉ. अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रूग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा राहिलाय. २०१९ सालापासून त्या निवडणुकीची तयारी करताहेत. परंतु कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती. आता त्यांना भाजपकडून विधानसभेची संधी मिळालीय.. आता त्यांच्या प्रचारासाठी भाजपची वरिष्ठ मंडळी देखील मतदारसंघात प्रचार करतांना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात येऊन गेलेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा देखील त्यांना मिळणार आहे.
१९७२ पासून लातूरला मंत्रीपद मिळत गेलंय.. शिवराज पाटील चाकूरकर पहिल्यावेळी निवडून आले होते. त्या वेळी ते उपमंत्री आणि नंतर उपसभापती झाले. सन १९८० पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द बहरली. मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलं आहे. सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे. फक्त १९९५ मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता.
आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसला दलित आणि मुस्लिम मते मिळालेली होतीय. परंतु यंदा लातूर शहर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मते खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो, त्यावर कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. यातच अर्चना पाटील चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्याने त्यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचे म्हटलं जातंय. त्यामुळे विलासराव देशमुख यांची पुण्याई अमित देशमुखांना तर अर्चना पाटलांना त्यांच्या सासऱ्यांची पुण्याई तारणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App