विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्यांनी मतांकरीता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. मतांची लाचारी स्वीकारून ‘हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीसांनी ही टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कोणत्या जाती धर्माच्या किंवा इतर कुणाच्याही विरोधात नाही. पण आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही. जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन, असे आमचे म्हणणे आहे. कुणी मतांची लाचारी स्वीकारून ‘हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही, एवढेच नाही तर, आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
फडणवीसांकडून पुन्हा व्होट जिहादचा उल्लेख
या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा पुनरूच्चार केला. जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील, तर आम्हाला व्होटांचे धर्मयुद्ध करता येते, असे फडणवीस म्हणाले. व्होटांचे धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये विजय देखील आपल्याच बाजूने आहे, असेही ते म्हणालेत.
देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म चालणार
फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू. पण, उलेमांच्या वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या काजींना पगार द्या, 10 टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, अशा 17 मागण्या, ज्या देश हिताच्या नाहीत. त्या मागण्यांवर जर काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेला स्वधर्म चालणार आहे. आम्ही मतांचे लांगुलचालन चालू देणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडीवार हल्लाबोल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App