विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर 2 मधून पडद्यावर येतेय साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आणि त्यातून तयार होतो आहे, शिंदे गटाच्या प्रचाराचा प्लॉट !! dharmaveer 2 hindutva shinde group prachar
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा विषय पेटला असताना महायुतीचे हिंदुत्व हा विषय थोडा साईड ट्रॅकला गेला आहे. पण डिसेंबर अखेरपर्यंत सर्व प्रचार – प्रसार आणि नॅरेटिव्ह हिंदुत्वा भोवती फिरवण्याची महायुतीतल्या घटक पक्षांची योजना दिसते आहे. त्यामुळे योग्य ते टायमिंग साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने धर्मवीर 2 हा सिनेमा पडद्यावर आणायचे ठरवले आहे. धर्मवीर 2″ची गोष्ट देखील मुद्दाम हिंदुत्वाची ठेवण्यात आली आहे.
धर्मवीर 1 मध्ये आनंद दिघे यांच्या ठाण्यातल्या राजकीय जीवनाचा धांडोळा घेतला होता, तर धर्मवीर 2 मध्ये त्यांनी हिंदुत्वासाठी केलेले कार्य हीच थीम असेल. धर्मवीर 1 चीच टीम धर्मवीर 2 साठी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रसाद ओक आनंद दिघे, तर क्षितिज दाते हे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराचा राजकीय प्लॉट या सिनेमातून तयार होतो आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनीच धर्मवीर 2 च्या स्टोरीचा खुलासा केला. धर्मवीर 1 मध्ये आनंद दिघे हयात असताना एकनाथ शिंदे राज्यात मंत्री झाले होते, पण आता धर्मवीर 2 मध्ये ते मुख्यमंत्री झालेले दाखविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गुवाहाटी ची रंगतदार गोष्ट दिलेल्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पुढच्या वर्षीचा प्रचाराचा प्लॉट धर्मवीर 2 च्या निमित्ताने तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष विशेषतः शरद पवार आणि काँग्रेस आपल्या प्रचाराचा प्लॉट जातीय आरक्षण हा ठेवत आहेत, तर त्याला महाछेद देण्यासाठी भाजप आणि शिंदे गट हे दोन घटक पक्ष हिंदुत्वाचा फॉर्मुला अधिक मजबूत करण्याच्या मागे लागले आहेत. धर्मवीर 2 चे स्क्रीनिंग योग्य टायमिंगला आणण्याची करण्याची शिंदे गटाची त्यातूनच योजना तयार झाली आहे.
आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
“धर्मवीरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्त्व काय, ते कसे जगले, कित्येक कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि सर्वधर्मीयांना त्यांनी कसा लळा लावला होता, हे पहायला मिळालं. साहेब प्रत्येकामध्ये होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केले. पण हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच इतर धर्मीयांचा दुस्वास किंवा द्वेष केला नाही. देशभक्त आणि राष्ट्रभक्त हे बाळासाहेब ठाकरे यांना आणि दिघे साहेबांनाही प्रिय होते. एखाद्या गरजूला खरीच अडचण असल्यास, ते कसलाच विचार न करता त्याची मदत करायचे. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे काम केले, असे शिंदे म्हणाले.
दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेकदेखील आपण पाहिला. ते त्यांच्याविषयीचे प्रेम होते. आजही टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमासमोरून जाताना आपोआप हात जोडले जातात. अशी श्रद्धा, भक्ती सहजासहजी मिळत नाही. आपले सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावे लागते. तेव्हाच देवत्व प्राप्त होते. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एका सिनेमात ते मावणार नाही. पहिल्या भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालेलो आहे. यात दिघे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. मी आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय, असेही शिंदे पुढे म्हणाले.
यावेळी चित्रपटाविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. “पहिल्या भागाला जवळपास 17 ते 18 पुरस्कार मिळाले. प्रसाद ओकला तर मानलं पाहिजे. दिघे साहेबांशी त्यांचा कुठलाच संपर्क नव्हता, कधी भेटले नव्हते, त्यांना कधी पाहिलंही नव्हतं, तरी दिघे साहेब तुम्हा सगळ्यांना आवडले की नाही? कुठलंही अभिनय करताना त्यात जीव ओतावा लागतो, सर्वस्व अर्पण करावं लागतं. तेव्हाच ती भूमिका यशस्वी होते. म्हणून प्रसाद ओक यांचे कौतूक करावे तितके कमी आहे. दिघे साहेबांसोबत जे लोक होते, त्या सर्वांना विचारून प्रसाद ओक यांनी अभिनयात जीव ओतला. अनेकांनी हा चित्रपट हिंदीत बनवण्याची विनंती केली, असे त्यांनी सांगितले.
काहींना सिनेमा खटकला, काही लोकं सिनेमा बघता बघता उठून गेले, काही लोकांना काही सीन्स आवडले नाहीत. पण आता कोणाला आवडो न आवडो, आता आपण फुल फायनल आहोत. तेव्हा काही गोष्टी इच्छेविरोधात कराव्या लागल्या होत्या. त्या गोष्टी प्रवीण तरडेंनाही आवडल्या नव्हत्या, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App