विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी गत सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बदललेल्या खुर्चीवर केलेल्या विधानाची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. ते धुलिवंदनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक व्हावी. कारण, आजकाल ते फार फेकतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खोटे बोलू नये. यापूर्वी जे देवेंद्र फडणवीस होते, ते राज्यासाठी लढत होते. ते त्यांनी करावे. त्यांना शुभेच्छा.
काँग्रेस शिंदे, अजित पवारांना मुख्यमंत्री करेल
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवारांची स्थिती फार वाईट आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल किंवा नाही याची शाश्वती नाही. भाजप त्यांना जगू देणार नाही. त्यांच्या सर्वच योजना बंद केल्या जात आहेत. त्यांच्या लोकांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी यातून योग्य तो धडा घ्यावा. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावे.
काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेऊ. सध्या त्यांच्यात मुख्यंमत्रिपदासाठी चढाओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. काँग्रेस अजित पवार व एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रिपदाची संधी देईल. अजित पवारांनी सादर केलेले बजेट हे बिनपैशांचे आहे. ते त्यांच्या मनातील बजेट नाही, असे नाना पटोले म्हणाले.
संजय राऊत अतिविद्वान व्यक्तिमत्व
नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील आपल्या सहकारी नेत्यांनाही धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. ते संजय राऊत यांना शुभेच्छा देताना म्हणाले, त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला अतिविद्वान व्यक्तिमत्व लाभले. ते वेगवान नेते आहेत.
वडेट्टीवार सुपरफास्ट नेते, त्यांनी मोठे व्हावे
नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख मोठे नेते म्हणून केला. विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत. सुपरफास्ट आहेत. त्यांनी आणखी मोठे व्हावे व सुसाट पळावे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App