विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मते मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, असे म्हणत फडणवीस यांनी त्यांच्या आरोपांना सविस्तर आकडेवारीसह उत्तर दिले आहे.CM Fadnavis
शरद पवारांच्या आरोपांना त्यांच्याच शैलीत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०२४ लोकसभेत भाजपला मते १ कोटी ४९ लाख १३ हजार ९१४ आणि जागा ९, पण काँग्रेसला मते ९६ लाख ४१ हजार ८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३ लाख ७७ हजार ६७४ मते आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मते आणि ८ जागा. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे.
काँग्रेसला ८७ लाख ९२ हजार २३७ मते होती आणि मिळाली फक्त एकच, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख ८७ हजार ३६३ मते होती आणि जागा ४ मिळाल्या होत्या, अशी सविस्तर आकडेवारीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केली. फडणवीस म्हणाले, पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
आम्हाला ७२ लाख मते, पण आले १०; ते ५८ लाख मते घेऊन ४१ कसे?
निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले” असे सांगून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण केले.
शरद पवार म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले, तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे १ लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. मी ईव्हीएमवर शंका घेत नाही. हे फक्त मतांचे आकडे असून ते आश्चर्यकारक आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. तिथे सत्ताधारी आमच्यावर टीका करत होते. ‘लोकसभेला ईव्हीएमची तक्रार नव्हती, आताच ईव्हीएमविरोधात तक्रार का करता?’ असा युक्तिवाद सत्ताधारी करत असल्याचे मी ऐकल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App