अजितदादांचे अख्खे भाषण माध्यमांनी दाखविले. भाषणातले भरपूर किस्से सांगितले, पण दस्तुरखुद्द शरद पवारांना बारामतीतून अजितदारांनी “डी ब्रँड” करून टाकले!!, हे मात्र लपविले…, असे काल बारामतीत घडले. शरद पवारांच्या 53 – 54 वर्षांच्या राजकीय संसदीय कारकीर्दीत पहिल्यांदा बारामतीत जंगी सभा झाली आणि त्या सभेत त्यांच्याच पुतण्याने प्रथमच शरद पवारांचे नाव एकदाही घेतले नाही, हे पवारांचे “डी ब्रँडीकरण” अजितदादांनी काल बारामतीत करून टाकले!!
वास्तविक बारामती आणि शरद पवार हे गेल्या 53 – 54 वर्षांचे सलग राजकीय समीकरण आहे. बारामतीतले कुठलेही राजकीय पान शरद पवारांशिवाय हलूच शकत नाही, हा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे, असे वाटत होते. यातला इतिहास खरा आहे. पण कालचे अजित पवारांचे भाषण ऐकल्यावर त्यातले वर्तमान संपले आणि भविष्य गायब झाले. याचा सोप्या भाषेत अर्थ असा की शरद पवार हे आता अजित पवारांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी “ब्रँड” उरलेले नाहीत!! हजारो बारामतीकरांच्या साक्षीने स्वतः अजित पवारांनीच शरद पवारांना आपल्या राजकीय कारकीर्दीतून “डी ब्रँड” करून टाकले!!
पवार वगळून बारामती
बारामतीच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, जेवढे राजकीय – सामाजिक मेळावे झाले, त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवारांचे नाव त्यांच्या बाजूने अथवा विरोधात घेतलेच गेले. त्याला कुणाचा पर्यायच नव्हता. पण काल अजित पवारांनी तब्बल एक तासाचे भाषण केले. त्यात बायकोने जेवढे “किस” घेतले नाहीत, तेवढे लोकांनी माझे “किस” घेतले, असे सांगून लोकांना हसविले. पहाटे 5.00 वाजता दचकून का उठतो?, हे लोकांना ऐकविले. बारामतीकरांनीच आपल्याला उपमुख्यमंत्री केले. त्यांच्या उपकारात राहू इच्छितो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपद अजून मिळाले नाही याची खंत व्यक्त केली. पण पवारांचे नाव भाषणातून वगळले.
अजितदादांच्या भाषणातले भरपूर किस्से माध्यमांनी रंगवू – रंगवून लिहिले आणि सांगितले. पण अजित पवारांनी कालच्या तासाभराच्या भाषणात एकदाही शरद पवारांचे अथवा सुप्रिया सुळे यांचे नावही घेतले नाही. ते का?? आणि त्याचा नेमका अर्थ काय??, हे मात्र माध्यमांपैकी कोणीही सांगितले नाही. अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेणे याचा अर्थ पवारांना त्यांच्या बारामतीतूनच “डी ब्रँड” करून टाकणे होय. हा त्यातला वास्तव अर्थ आहे!!
बाळासाहेब बँड विरुद्ध पवार ब्रँड
हे नेमके काय घडले??, हे समजून घ्यायचे असेल, तर महाराष्ट्रातल्या दोन “पॉलिटिकल ब्रँडचा” नेमकेपणाने आढावा घेतला पाहिजे. त्यातले पहिले “पॉलिटिकल ब्रँड” म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे “पॉलिटिकल ब्रँड” म्हणजे शरद पवार. बाळासाहेबांच्या हयातीत ते ब्रँड बनले होते. ते फक्त शिवसेनेचे ब्रँड नव्हते, तर महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी पक्षांचा हवाहवासा वाटणारे चेहरा होते आणि आहेत. त्यांच्या निधनानंतरही हिंदुत्ववादी पक्षांचा बाळासाहेब हेच ब्रँड आहेत. आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी पक्षांची जबरदस्त चलती आहे. त्यामध्ये भाजप, शिवसेनेचे दोन गट, मनसे हे चार पक्ष आहेत आणि या प्रत्येक पक्षांचे नेते बाळासाहेबांचे नाव हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतातच घेतात ही वस्तुस्थिती आहे!!
पवार ब्रँड आक्रसला
पण त्याच्या उलट शरद पवार नावाच्या ब्रँडचे होत चालले आहे. पवार हे काँग्रेससाठी कधीच “ब्रँड” नव्हते. ते काँग्रेसमध्ये असताना अनेक नेत्यांपैकी एक नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर केल्यानंतर ते स्वतःच्या पक्षाचे ब्रँड बनले. पण आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच माझा फोटो वापरू नका अन्यथा कोर्टात खेचेन, असा दम भरून स्वतःचाच “ब्रँड” आक्रसून घेतला आहे. अजित पवारांनी काल 26 ऑगस्ट 2023 रोजी बारामतीत भाषण करताना पवारांचे नावच घेतले नाही, यात ते “डी बँड” झालेच, पण त्याच वेळी राष्ट्रवादीचे अजितनिष्ठ गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील इथून पुढे आम्ही शरद पवारांचे फोटो वापरणार नाही, असे सांगून आपल्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीत अजितनिष्ठ गटही शरद पवारांना “डी ब्रँड” करेल, हेच सांगून टाकले.
राजकीय हयातीतच “डी ब्रॅण्डिंग”
शरद पवारांचे हे “डी ब्रॅण्डिंग” त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या हयातीत घडले. हे मात्र माध्यमांनी पूर्ण लपवून ठेवले. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी किंवा न फुटण्यापूर्वी कोणी बारामतीत अथवा महाराष्ट्रात कधी असा विचार तरी केला होता का??, की शरद पवारांचे नाव बारामतीतल्या एखाद्या जाहीर सभेत, सत्कार समारंभात अथवा एखाद्या सार्वजनिक समारंभात मुख्य वक्ता घेणारच नाही!!… असा विचार करण्याची बिलकुल कोणी हिंमतही केली नसेल!!… पण अजित पवारांच्या भाषणात मात्र ते प्रत्यक्षात घडून आले. अजित पवारांनी पवारांचे नावही बारामतीच्या भाषणात घेतले नाही. जणू काही बारामतीच्या राजकीय इतिहासात शरद पवार नावाचे कोणी व्यक्ती होते की नाही!!, हाच संशय अप्रत्यक्षपणे अजितदादांनी भाषणातून तयार केला.
बारामतीतही मोदी ब्रँड!!
उलट त्याच वेळी आपण विकासासाठी का आणि कसे सत्तेत गेलो, हे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. हेच ते नरेंद्र मोदी होत, ज्यांनी 2015 मध्ये बारामतीचा दौरा करून शरद पवारांना आपले राजकीय गुरु म्हटले होते. त्यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो अशी कृतज्ञता व्यक्त केली होती.
आमदार रोहित पवारांसारखे नेते मोदींच्या या सौजन्य भाषणाचे राजकीय भांडवल करून शरद पवारांचे महिमामंडन करत होते. पण आज त्याच मोदींनी राजकारणातला असा डाव खेळला की खुद्द पवारांच्या बारामतीत त्यांच्याच पुतण्याने त्यांना “डी ब्रँड” करून टाकले. तब्बल तासभराच्या भाषणात एकदाही अजितदादांनी शरद पवारांचे नावही घेतले नाही यातूनच महाराष्ट्राच्याच काय, पण देशातल्या राजकारणातले खरे “चाणक्य” कोण हे सिद्ध झाले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App