नाशिक : बरं झालं अजितदादा सत्तेच्या वळचणीला आधीच आले, नाही तर तुतारी मार्गे बाराच्याच भावात गेले असते, हे प्रस्तुत लेखक नव्हे, तर मतांची टक्केवारी आणि मतांचा ट्रेंड सांगतो आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एवढी निश्चित मते मिळाली नाहीत की, त्यांनी “स्वबळावर” किंवा स्वतःच्या महत्वाकांक्षेवर आधारित कुठली मागणी भाजप नेतृत्वाकडे करावी. उलट भाजपचे नेतृत्व देईल, तो सत्तेचा वाटा घेऊन काम करावे, अशी अवस्था अजितदादांच्या राष्ट्रवादीची झाली आहे.
पण ही अवस्था त्यांच्या काकांच्या राष्ट्रवादी पेक्षा निश्चित बरी आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार निवडून आल्यानंतर त्यांना अजितदादांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याखेरीस दुसरा पर्याय उरलेला नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9.1% मतांसह 41 आमदार मिळाले, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा 31 ने जास्त भरले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11.28% मते मिळाली, पण निवडणूक प्रचंड घासून झाल्याने प्रत्येक मतदार संघात त्यांचे उमेदवार पडत गेले. एरवी अजितदादा जर सत्तेच्या वळचणीला तेव्हाच येऊन बसले नसते, तर महायुतीच्या मतांच्या टक्केवारी मधला विशिष्ट भाग अजितदादांच्या वाट्याला आला नसता आणि हिंदुत्वाच्या लाटेमुळे अखंड राष्ट्रवादीचा मतांचा टक्काही फारसा वाढला नसता.
अजितदादा आधीच सत्तेच्या वळचणीला येऊन बसले नसते, तर त्यांचा राजकीय मार्ग आर्थर रोड किंवा तिहार याच दिशेने गेला असता, हे सांगायला कुठल्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करायची जरूर नव्हती, पण अजितदादांनी आर्थर रोड किंवा तिहार पेक्षा सत्तेच्या खुर्चीचा मार्ग निवडला, हे खुद्द त्यांच्या राजकीय तब्येतीच्या दृष्टीने बरे झाले.
शिवाय राष्ट्रवादीच्या मूळ संस्थापकांच्या चिन्हाच्या दृष्टीने देखील ते बरेच झाले. कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागले आणि जो मुद्दा या निकालांमध्ये परावर्तित झाला, तो पाहता अजित पवार आणि शरद पवार जरी एकत्रच राष्ट्रवादीत असते, तर ते देखील “बटेंगे तो कटेंगे”, “एक रहेंगे, तो सेफ रहेंगे” या हिंदुत्वाच्या लाटेत वाहूनच गेले असते.
आत्ताही आमदारांच्या संख्येत आणि मतांच्या टक्केवारीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोनच पक्ष बहुमतासाठी पुरेशा पेक्षा जास्त आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची बेरीज 189 भरते. शिवाय 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंब्याचे पत्र दिल्याने ती संख्या 194 वर पोहोचते. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या 41 आमदारांची भाजप + शिवसेना महायुतीचे सरकार बनवण्यासाठी बिलकुल गरज नाही, हा मुद्दा इथे अधोरेखित करून सांगितला पाहिजे.
Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल का मात्रा??
– “बटेंगे तो कटेंगे”चा अजितदादांना फायदा
“बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही, असे अजितदादा प्रचारादरम्यान म्हणाले होते. बारामती मध्ये पंतप्रधान मोदी प्रचारात नकोत असेही ते म्हणाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण प्रत्यक्षात अजितदादांच्या राष्ट्रवादीला “बटेंगे तो कटेंगे” घोषणेचा फायदा निश्चित झाला. लाडक्या बहिणींनी आणि हिंदू मतदारांनी भाजपचे ऐकून अजितदादांच्या पक्षाला मते दिली, म्हणूनच त्यांची संख्या 41 वर पोहोचली. अन्यथा मतांची टक्केवारी पाहता 41 आमदारांची संख्या गाठणे अजितदादांना कठीण होते. त्यांनी उभे केलेले मुस्लिम उमेदवार देखील हिंदुत्वाच्या लाटेत निवडून आले, पण सत्तेच्या वळचणीला राहून देखील वेगळा सूर काढलेले नवाब मलिक पडल्याने सुंठे वाचून खोकला गेला.
… आणि समजा, अजितदादा त्यावेळीच महायुतीत येऊन सत्तेच्या वळचणीला बसले नसते, तर मतांची टक्केवारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच मोठ्या प्रमाणावर एकवटली गेली असती आणि हिंदुत्वाची संपूर्ण लाट या दोनच पक्षांच्या पदरात मतांचे भरभरून माप टाकून गेली असती, हे आकडेवारीने सिद्ध केले.
केवळ “समय की मांग” आणि त्यावेळची नाजूक राजकीय परिस्थिती ओळखून भाजप नेतृत्वाने सावधगिरीचे पाऊल म्हणून महाराष्ट्रातले विशिष्ट सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन अजितदादा सारख्या नेत्याला सत्तेच्या वळचणीला घेऊन बसण्याचे स्थान दिले. त्याचा लाभ भाजपला होण्यापेक्षा अजितदादांना अधिक झाला, हे आकडेवारीतून स्पष्ट झाले. त्यामुळेच बरं झालं अजित दादा सत्तेच्या वळसणीला आले नाही तर तुतारी मार्गे बाराच्याच भावात गेले असते, असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली असती!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App