विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर बिहार पॅटर्न राबवा. मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव म्हणे, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar ) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची बातमी “द हिंदू” या इंग्रजी दैनिकाने “प्रसवली.” मात्र ही बातमी धादांत खोटी असल्याचे वाभाडे अजितदादांनी काढले.
अमित शाह आणि अजित पवार यांची सोमवारी मुंबई विमानतळावर भेट झाली होती. यावेळी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा अमित शाह यांच्यासमोर बोलून दाखवल्याची बातमी “द हिंदू” दैनिकाने दिली. महाराष्ट्रात राजकीय भूकंप वगैरे झाल्याचा दावा बातमीत केला. परंतु, अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही संपूर्ण बातमी फेटाळून लावली.
अजितदादा म्हणाले :
“द हिंदू” दैनिकात मी अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची जी बातमी छापून आली आहे, ती धादांत खोटी आहे. राज्यातील 25 विधानसभा मतदरासंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची बातमी देखील खोटीच आहे. महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या सगळ्या थापा आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून विधानसभेच्या 288 जागांचं वाटप करु. बहुतांश जागांचे वाटप झालेले आहे आणि उर्वरित जागावाटपाचा फैसलाही लवकरच होईल.
– जे लोक ही चर्चा करत आहेत, त्यांनाच याबद्दल विचारा. मी इतरांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणार नाही. सध्या आमचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे, महायुतीच्या सर्व घटकपक्षांना फायदा मिळवून देणे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल सांगतोय. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे. सगळे घटकपक्ष आपापल्या परीने त्याचा प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीमधील सर्व घटकपक्षांना मिळाला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी अजितदादा गटाकडून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओत लाडकी बहीण योजनेच्या नावापूर्वीचा मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला होता. अजितदादांची लाडकी बहीण योजना, असा प्रचार जाहिरातीमधून करण्यात आला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर अमित शाह यांच्या स्वागतासाठी जे बॅनर्स लावले होते, त्या बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो गायब होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्कीलपणे म्हटले की, मीच एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं की, माझा फोटो लावू नका. सध्या सगळीकडे माझे फारच फोटो दिसत आहेत. त्यामुळे मीच त्यांना माझा फोटो लावू नका, असे सांगितल्याचे अजितदादा म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App