Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची विरोधकांची रणनीती!

Shivaji Maharaj Statue Collapse Case

विशेष प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद समस्त शिवप्रेमीत उमटले. सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त केली.पुतळ्याचा उभारणीत सहभागी असलेले शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर गुन्हे दाखल केले. चौकशी समिती नेमली. ज्यांच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला त्या नौदलाने या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक संयुक्त बैठक घेऊन नौदल आणि राज्य शासन यांची संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच राजकोट येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही केली. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर सरकार म्हणून जे जे करणे आवश्यक होते ते ते सरकारने केले आहे. Shivaji Maharaj Statue Collapse Case

विरोधकांनीही या घटनेचा निषेध करून सरकारवर प्रत्यारोप करणे सहाजिक होते. पण या घटनेचा अवास्तव बाऊ करून विरोधक राज्यातील राजकारण आणि समाजकारणाला जो जातीय रंग देत आहेत तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी विरोधकांनी जी पातळी गाठली आहे तिला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. इथपर्यंत सारे ठीक होते. मात्र संजय राऊत, जितेंद्र आव्हाड अशा उचापतखोर नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या अवशेषांची छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.मशिवप्रेमींच्या भावना भडकवणे यापलीकडे त्यामागे दुसरा कोणताही उद्देश नव्हता.

विशेष म्हणजे राजकोट येथील या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर यापैकी एकही नेता या शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दर्शनासाठी गेलेला नव्हता. पुतळा कोसळल्यानंतर मात्र विरोधी बाकावरचे सगळे नेते राजकोट येथे गोळा झाले. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ल्यावरूनच खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्लाघ्य शब्दात शिवीगाळ देखील केली. राजकोट किल्ल्यावर पक्षाचे मशाल असलेले झेंडे फडकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीवर विरोधकांच्या आततायी वृत्तीमुळे राजकारणाचा फड रंगला, असे सिंधुदुर्ग वासियांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राला विवेकशील, बुद्धिमान आणि दूरदर्शी विरोधी पक्ष नेत्यांची उज्वल परंपरा आहे. मुद्द्यावर बोट ठेवून सनदशीर मार्गाने सरकारला सळो की पळो करून सोडणारे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र आज विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी या उज्वल परंपरेला कलंक लावला आहे.

मालवण येथे उबाठा गटाचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना डीवचत असताना महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, आणि उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांचे हे प्रमुख नेते. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेला सपशेल जातीय रंग दिसून येत होता, अशी भावना ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

आजपर्यंत कोणत्याही विरोधी नेत्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचा जातीय उल्लेख कधीही केला नव्हता. तो या तीन नेत्यांच्या पत्रकार परिषदेत केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यंगचित्रे आणि व्हिडिओ या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. “पेशव्यांचे वंशज” अशा शब्दात फडणवीसांची हेटाळणी देखील करण्यात आली. फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी अन्य कोणताही मुद्दा नसल्याने त्यांची जात काढली जात असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात पन्नास वर्षे राजकारण करणाऱ्या शरद पवारांच्या उपस्थितीतच असा प्रकार होणे पवारांच्याच राजकीय कारकिर्दीसाठी लाजिरवाणे होते. महाराष्ट्रात जातीय तणाव पसरावा, जाती जातीत भेदाभेद निर्माण व्हावेत आणि रस्त्यावरचा संघर्ष उद्भवावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका त्या पत्रकार परिषदेने येत होती. “महाराष्ट्रात मणिपूर होण्याची भीती आहे” असे विधान शरद पवार यांनी नुकतेच केले होते. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी भावना पुण्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.


Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला ठोकले; पण पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला बाजूला सारले!!


छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना गोळा करून स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्राची आज जी काही ओळख आहे ती छत्रपती शिवरायांच्या सर्व समावेशक धोरणामुळे. मात्र त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या विरोधकांनी विद्वेषाची आणि जातीय राजकारणाची घाणेरडी बीजे महाराष्ट्रात रोवली आहेत. 1948 पासून काँग्रेसने ही परंपरा सुरू केली आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही काँग्रेसचे नेते ती परंपरा पुढे नेत आहेत, असा आरोप भाजपकडून होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब यांच्याशी संघर्ष केला. मात्र या तिन्ही इस्लामी राजवटींचा उल्लेख टाळून स्वतःच्या फायद्याचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न विरोधक सध्या करीत आहेत. महाराष्ट्रावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या नावावरूनच औरंगाबाद हे नाव पडले ते बदलण्याची सुबुद्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कधीही झाले नाही. उलट मुघलांचे गुणगान गाण्याकडे, त्यांची वाहवाही करण्याकडे विरोधकांचा अधिक कल दिसून आला आहे.

औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत टाकले, शाहिस्तेखानाच्या फौजानी रयतेची लूट केली, असंख्य देवळे तोडली, स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, कातडी सोलली, आणि शीर धडा वेगळे केले. मात्र “औरंगजेबाने महाराजांचा असा अपमान केला नव्हता” अशी मुक्ताफळे आज संजय राऊत उधळीत आहेत.

मतांच्या बेगमीसाठी आपल्या राजावर झालेला अन्याय विसरून जाणारे हेच खरे शिवद्रोही म्हणावे लागतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरूनच स्वतःच्या संघटनेचे नाव शिवसेना असे ठेवले होते. मात्र त्यांच्या वारसांना आज फक्त पुतळ्या पुरते शिवाजी महाराज आठवतात. औरंगजेबाची स्तुती करून अल्पसंख्याक अनुनयाचे राजकारण ज्यांनी चालवले ते आज उद्धव यांना प्रिय वाटत आहेत हे बाळासाहेबांचे दुर्दैव असल्याची भावना जुने जाणते शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद सुरू झाला अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करीत असतात. ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्ष लावून देण्यात शरद पवार आणि त्यांनी पोसलेल्या संघटना यांचा मोठा वाटा आहे, याकडे राज यांचा रोख असतो. मतांच्या राजकारणासाठी हपापलेली काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते, हे देशाने अनेक वेळा पाहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकगठ्ठा मतांसाठी आता अशी लाचारी ठाकरेही करू लागले आहेत. पुतळ्याच्या आडून महाराष्ट्रात बजबजपुरी माजवण्याचा आणि महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. रोजच्या पत्रकार परिषदांनी तो अधिकाधिक उघड होत चालला आहे, अशाच भावना सुशिक्षित वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.

Shivaji Maharaj Statue Collapse Case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात