पवारांची “पॉवरफुल” खेळी; महाविकास आघाडीतून वंचित आघाडीची वजाबाकी!!


एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये तू तू मैं मैं असे सारखे चालले असताना पवारांची “पॉवरफुल” खेळी; महाविकास आघाडीतून वंचित आघाडीची वजाबाकी!! असे कसे काय घडले?? Sharad pawar made prakash ambedkar’s VBA minus from MVA to decrease powers of shivsena UBT and Congress

आम्ही दिलेल्या 2 जागा घ्या किंवा आणखी 2 जागा वाढवून देऊ, पण तुमचा काय निर्णय असेल तो आज म्हणजे 19 मार्च रोजी सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत स्पष्टपणे सांगा, असा “संदेश” काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. या “संदेशा”वर प्रकाश आंबेडकरांचे उत्तर काय असेल??, हे आत्तापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी बोलताना भूमिकेवरूनच स्पष्ट दिसेल. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात वजाबाकीचे राजकारण होईल, हे उघड आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचंड शक्तिशाली भाजपशी लढताना महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना वंचित बहुजन आघाडीच्या “व्होट बँकेची” गरज असताना त्यांनी महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीची वजाबाकी का केली??, या सवालांचे बारकाईने विचार करून उत्तर दिले, तर वरचे शीर्षक राजकीय दृष्ट्या बौद्धिक पातळीवर पटेल. त्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाची स्वतंत्र खेळी स्वतंत्रपणे समजून घेऊन त्याला प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला प्रतिसाद हा देखील स्वतंत्रपणे समजून घ्यावा लागेल.



प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीत एन्ट्री होण्यापूर्वीच एक खेळी करत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी परस्पर युती करून टाकली होती. मुंबई महापालिकेच्या त्यावेळी निवडणुका अपेक्षित होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची आपली युती लाभदायक ठरेल, असा उद्धव ठाकरेंचा होरा होता. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत त्या युतीची घोषणा केली होती. दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा जरूर केली, पण त्यांचे जागावाटप मात्र जाहीर केले नव्हते. या घटनेला देखील दोन वर्षे उलटून गेली आहेत, तरी देखील शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही.

पण ही युती होत असताना महाविकास आघाडीतल्या त्या वेळच्या अखंड राष्ट्रवादीचा खोडा होता. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची ताकद एकवटली, तर महाविकास आघाडीलाच सुरुंग लागेल. मुंबईत आधीच महत्त्व नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उरले सुरले महत्त्व देखील संपुष्टात येईल याची भीती त्यावेळी शरद पवारांना वाटली. त्यामुळे पवारांनी “पॉवरफुल” खेळी करत आंबेडकर – ठाकरे युतीमध्ये खोडा घालण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र यावे, अशी सूचना केली. इथेच त्यांनी खरी “राजकीय मेख” मारली.

त्यानंतर महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भरपूर वेळा वाटाघाटी झाल्या. मधल्या मध्ये पत्रांची देवाणघेवाण झाली एकमेकांवर खेचाखेची करणारे आरोप – प्रत्यारोप झाले, पण हे आरोप – प्रत्यारोप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये होत राहिले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यापासून “अलिप्त” राहिली. इतकेच नाही, तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर देखील शरद पवारांची राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीच्या “नादीच” लागली नाही. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे प्रतिनिधी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या बैठकांमध्ये सामील झाले, पण त्या बैठकांमधले गुप्त तपशील देखील सातत्याने उघड करत राहिले. यामागे “प्रेरणा” नेमकी कोणाची होती??, याचा शोध घेतल्यावर त्या मागचे इंगित देखील समोर येईल.

प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेस नेत्यांवर आणि नंतर संजय राऊत यांच्यावर टप्प्याटप्प्याने शरसंधान करत राहिले. या शरसंधानातून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वगळले, ही देखील नेमकी कोणाची “पॉवरफुल” खेळी हे लपून राहिले नाही. हे सगळे घडण्यात आणि घडवण्यात शरद पवारांचा “परस्पर” राजकीय लाभ होता, तो म्हणजे महाविकास आघाडीत जागा वाटपात शरद पवारांना तसेही तिय्यम दर्जाचे स्थान आहे. त्यांचा पक्ष फुटल्याने जागावाटपात पवारांच्या वाट्याला जास्तीत जास्त 10 जागा वाट्याला येऊ शकतात शिवसेना उद्धव ठाकरे गट 22 काँग्रेस 16 आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी 10 असे जागावाटप होऊ शकते. याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावर पवारांच्या खेळीतले इंगित समजून येईल. सर्वांत ज्येष्ठ नेते असूनही पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा देणे किंबहुना त्या घ्यायला भाग पाडणे हे पवारांचा डिवचण्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर पवार तरी महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या ताकदी कशासाठी वाढवून ठेवतील?? त्यांच्या ताकदी घटल्या, तर पवारांना ते हवेच आहे ना!! आपली ताकद नाही वाढली तर चालेल, पण शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेसची ताकद बिलकुल वाढता कामा नये, ही पवारांची “पॉवरफुल” खेळी आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीची वजाबाकी खेळण्याची करण्याची चाल त्यांनी परस्पर खेळली.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नाहीत. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचे जमले नाही, तर नुकसान ठाकरे आणि काँग्रेस यांचे होणार आहे आणि नेमका हाच पवारांचा “लाभ” आहे. तो लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी जास्त महत्त्वाचा आहे.

वंचित बहुजन आघाडी तशीही जिंकण्यासाठी कुठलीच निवडणूक लढवतच नाही. मते कापणे आणि ते मते कापण्याचे “डील” करणे हे वंचित आघाडीचे गेले कित्येक निवडणुकांमध्ये खरे काम आहे. त्याचा “लाभार्थी” कोण होतो??, हे वंचितशी “वेगळे डील” करणाऱ्यावर अवलंबून असते. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना राजकीय दृष्ट्या गरज असतानाही वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीतून वजाबाकी झाली यामागे नेमकी कोणाची खेळी आहे??, हे समजून घ्यायला फार मोठा अभ्यासाची गरज नाही!!

Sharad pawar made prakash ambedkar’s VBA minus from MVA to decrease powers of shivsena UBT and Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात