राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल, पण तीच आजची काँग्रेस मधली वस्तुस्थिती आहे. Rahul Gandhi given ticket from raibareli to maintain political legacy remains with him and not priyanka Gandhi
केरळच्या वायनाड मधून आधीच लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या राहुल गांधींना काँग्रेसने अमेठी ऐवजी रायबरेली “बक्षीस” दिली. त्यामुळे वर दिलेल्या शीर्षकातील वस्तुस्थिती अधोरेखित झाली. हे नेमकेपणाने समजून घेण्यासाठी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची आजची वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे. काँग्रेसमध्ये कोणत्याही स्थितीत गांधी परिवाराचा वारसा राहुल गांधी सोडून अन्य कोणत्याही गांधीकडे द्यायचा नाही, हा सोनिया गांधींचा निर्णय आहे आणि आज तरी सोनिया गांधींच्या निर्णयाला आव्हान देण्याची कोणत्याही काँग्रेस नेत्याची अथवा कार्यकर्त्याची क्षमता नाही.
पण त्या पलीकडे जाऊन प्रियांका गांधींना रायबरेलीच्या निवडणुकीत उतरवले नाही, त्याऐवजी राहुल गांधींनाच मैदानात उतरवले, याला एक वेगळा राजकीय रंगदेखील आहे, तो म्हणजे जर रायबरेली सारख्या काँग्रेसला अनुकूल असलेल्या मतदारसंघात प्रियांका गांधी जिंकून आल्या आणि त्याचवेळी वायनाड आणि अमेठी सारख्या मतदारसंघात राहुल गांधींचा पुन्हा पराभव झाला, तर काँग्रेसचा सगळा राजकीय वारसा प्रियांका गांधींच्या हातात आयता द्यावा लागेल. त्याला पर्यायच उरणार नाही, ही खरी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांना भीती आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा सगळा राजकीय परफॉर्मन्स सतत घसरला आहे. त्याला अटकावत व्हायची तयारी नाही, तरी देखील सोनिया गांधी आणि बाकीच्या काँग्रेस जणांचा राहुल गांधींनाच गांधी परिवाराचा राजकीय वारस नेमण्याचा हट्ट आहे आणि त्या हट्टला “राजहट्ट” म्हणून अन्य कोणी काही करूही शकत नाही.
वास्तविक आपल्या नंतर आपला सगळा राजकीय वारसा प्रियांका गांधी चालवेल, असे दस्तुरखुद्द इंदिरा गांधींनी म्हणून ठेवल्याचे त्यांच्या अनेक राजकीय चरित्रकारांनी लिहून ठेवले आहे. कारण इंदिरा गांधी सारख्या कसलेल्या नेत्याला प्रियांका गांधी मधला तो “स्पार्क” दिसला होता. परंतु, इंदिरा गांधींना दिसलेला तो “स्पार्क” जर फुलला, तर आपल्यालाच तो घातक ठरू शकेल याचा अंदाज कदाचित सोनिया गांधी आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांना आला असावा, म्हणूनच प्रियांका गांधींना गांधी परिवारातल्या अंतर्गत राजकारणातूनच आजपर्यंत बाजूला टाकण्याचे षडयंत्र रचले जात असावे.
…आणि जर गांधी परिवारातूनच थेट विरोध असेल तर बाकी कुठल्याही काँग्रेस नेत्याची अथवा कार्यकर्त्याची आजतरी एवढी हिंमतच नाही, की ते प्रियांका गांधींना एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन पाठिंबा देतील.
बाकी राहुल गांधींना अमेठीत पराभवाची भीती वाटत असल्याने ते रायबरेलीत गेले, उत्तर भारतातून गांधी परिवाराने निवडणूक लढवली नाही, तर त्याचा चुकीचा मेसेज भारतीय जनमानसात जाईल वगैरे “पॉलिटिकल थिअरीज” चालविल्या गेल्या आहेत. त्यातली काही तथ्य नाकारायची कारण नाही, पण ती तथ्य देखील विशिष्ट मर्यादे पलीकडे महत्त्वाची नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून निवडणुकीच्या मैदानात उतरवून काँग्रेस नेत्या नेत्यांनी काँग्रेसचा वारसा प्रियांका गांधी यांच्यापासून “सुरक्षित” अंतरावर ठेवला आहे. त्यापलीकडे याचा दुसरा फारसा अर्थ नाही. मग राहुल गांधी वायनाड मधून निवडून येवोत किंवा न येवोत, रायबरेलीतून ते जिंकोत किंवा हरोत, ते निवडणुकीच्या मैदानात लढण्यासाठी उतरले होते, हे सिद्ध करण्यासाठी राहुल गांधींची दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारी काँग्रेस नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पुरेशी आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more