पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची “पॉलिटिकल केमिस्ट्री” संपुष्टात आल्याची चिन्हे पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरच्या जाहीर सभेतून दिसली. पंतप्रधान मोदींनी प्रथमच शरद पवारांसारख्या सातत्याने आदर व्यक्त केलेल्या नेत्यावर “भटकता आत्मा” इतक्या परखड शब्दांमध्ये हल्ला चढविला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. “पवारनिष्ठ” मराठी माध्यमांना महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, अशी आशा आणि अपेक्षा वाढली. पवारांच्या प्रतिमा भंजनाला प्रत्युत्तर देण्याची त्यांची तयारी सुरू झाली. आता माध्यमांची आशा आणि अपेक्षा यातून कितपत पूर्ण होईल??, हा भाग अलहिदा iconoclasm of sharad pawar as unrestful ghost as serious as pappu!!
पण पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना “भटकता आत्मा” म्हणणे ही साधी सोपी गोष्ट नाही. किंबहुना राहुल गांधींचे “पप्पू” म्हणून प्रतिमा भंजन जसे विचारपूर्वक केले, तसाच महाराष्ट्रापुरता हा पवारांच्या प्रतिमा भंजनाचा विचारपूर्वक केलेला हा गंभीर प्रयत्न आहे.
आत्तापर्यंत पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचा राजकीय वापर काँग्रेसवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रहार करण्यासाठी करवून घेत होते. आपण पवारांविषयी जेवढा आदर दाखवू, तेवढे काँग्रेस नेते चिडतात. विशेषत: गांधी परिवार चिडतो, हे मोदींना माहिती होते, त्यामुळे त्यांनी पवारांविषयी विशिष्ट आदर बाळगून त्यांच्यावरची टीका आत्तापर्यंत सौम्य ठेवली होती. पण 2019 च्या विश्वासघाताच्या अनुभवातून शहाणे झालेल्या मोदींनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेवर “प्रयोग” केला आणि साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीवर “प्रयोग” केला. त्यातून पवार आणि ठाकरे यांना राजकीय धडा शिकवण्याचा अर्धा पोर्शन मोदींनी उरकला. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना उरलेला पोर्शन पूर्ण करायचा आहे. त्यामुळेच मोदींनी पवारांवर “भटकता आत्मा” इतक्या परखड शब्दांमध्ये हल्ला चढविला आहे. हा हल्ला वरवरचा नाही. हा पवार प्रतिमा भंजनाचा मोदीकृत गंभीर सिनेमा आहे.
2014 आणि त्याच्या आसपास मोदी आणि त्यांच्या टीमने ज्या प्रकारे राहुल गांधींचे “पप्पू” असे नामकरण करून त्यांचे प्रतिमा भंजन केले होते, ते आजही त्यांना राजकीय दृष्ट्या भोवते आहे. त्या “पप्पू” प्रतिमेतून राहुल गांधींची आजही सुटका झालेली नाही. किंबहुना स्वतः राहुल गांधींच्या राजकीय वर्तणुकीतून त्यांची “पप्पू” ही प्रतिमा भारताच्या जनमानसात अधिकाधिक खोलवर रुजली, तसेच पवारांच्या बाबतीत घडावे हा मोदींचा महाराष्ट्रापुरता तरी का होईना, पण हेतू आहे!!
– मोदींना महाराष्ट्रात स्थिरता अपेक्षित
महाराष्ट्राचे राजकारण जोपर्यंत पवार नावाच्या प्रभावातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत मोदींना अपेक्षित असलेली राजकीय स्थिरता महाराष्ट्रात येणार नाही, याची जाणीव आता स्वतः मोदींनाच झाली आहे. मोदींनी अमित शाहांना हाताशी धरून ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात भाजपचे संघटन वाढवून योगी आदित्यनाथ यांना स्थिर केले, त्यांचे प्रशासन टप्प्याटप्प्याने मजबूत करून उत्तर प्रदेशाला बीमारू राज्य या प्रतिमेतून सावरून बाहेर काढले, त्याच पद्धतीने मोदींना महाराष्ट्राला राजकीय अस्थिरतेतून खऱ्या अर्थाने सावरायचे आहे. त्यात पवार नावाचा खरा “अडथळा” आहे, जो पूर्वी मोदींना जाणवत नव्हता. पण 2019 च्या धड्यानंतर मोदींना “त्या” अडथळ्याचे उपद्रव मूल्य समजले. त्यामुळे पवार नावाचा “अडथळा” मोदींना आता महाराष्ट्रातून दूर करायचा आहे.
शरद पवार हे वेगवेगळी “राजकीय मायावी रूपे” घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात “काम” करतात हे आत्तापर्यंत अनेकदा दिसून आले. कधी ते ब्रिगेड कृत भांडारकर प्रयोग करतात, कधी पुरंदरे प्रयोग करतात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत “मनोज जरांगे प्रयोग” पवार महाराष्ट्रभर करू शकतात, याची जाणीव आता मोदींना झाली आहे. त्यावर मोदी उघडपणे बोलतील किंवा न बोलतील, पण ते “कृती” मात्र निश्चित करतील हे आता जाणवायला लागले आहे. कारण तशी “कृती” केल्याशिवाय महाराष्ट्रातला पवार नावाचा “अडथळा” दूर होणार नाही.
– उपद्रव मूल्य हीच कथित चाणक्यगिरी
पवारांच्या या उपद्रव मूल्यालाच पवारांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते तसेच पवारनिष्ठ पत्रकार पवारांची “चाणक्यगिरी” असे संबोधतात. त्यांना अनुकूल ठरतील, अशा मुलाखतीही ते सादर करतात, पवारांना अनुकूल ठरेल असे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, पण म्हणून पवारांचे उपद्रव मूल्य हे सकारात्मक राजकारण ठरू शकत नाही. हे नेमकेपणाने लक्षात घेऊनच मोदींनी पुण्याच्या रेसकोर्स वर पवारांना “भटकता आत्मा” हे “बिरुद” चिटकवले. या एका “बिरुदातून” मोदींनी पवारांचा सगळा राजकीय आयुष्याचा पटच जनतेसमोर उघड्यावर आणला.
पवार खरोखर तर तसे राजकीय दृष्ट्या भटकता आत्माच आहेत. कारण त्यांची पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा पूर्ण झाली नाही. नरसिंह राव, सीताराम केसरी, सोनिया गांधी यांच्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर पूर्ण अपयशी ठरला. महाराष्ट्रात एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करता आला नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा “विरोधी” मुख्यमंत्री “सहन” करावा लागला. त्यानंतर 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा “विरोधी” मुख्यमंत्री “सहन” करावा लागला. 2019 ते 2021 पवारांना “अनुकूल” मुख्यमंत्री लाभला, पण त्यानंतरही पवारांना “प्रतिकूल” मुख्यमंत्री सहन करावा लागत आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांना अजूनही आपल्या मुलीचे राजकारण आपल्याला हवे तसे “एस्टॅब्लिश” करता आलेले नाही. तसे ते “एस्टॅब्लिश” करायला गेले आणि त्याचे निमित्त होऊन का होईना, पण त्यांनीच स्थापन केलेला पक्ष अजित पवार त्यांच्या हाताखालून काढून घेऊन गेले. पवार इथे खऱ्या अर्थाने “भटकता आत्मा” ठरले!!
या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे त्यांचे प्रतिमा भंजन केले, त्यातून मोदींनी आपल्या राजकीय शिष्यांना पवारांच्या पुढच्या प्रतिमा भंजनाची “असाइन्मेंट” देऊन टाकली आहे. इथून पुढच्या काळात मोदींचे सगळे राजकीय शिष्य त्यादृष्टीने कामाला लागून पवारांचे उर्वरित प्रतिमा भंजन पूर्ण करतील, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. “भटकता आत्मा” या मोदीकृत प्रतिमा भंजन सिनेमातून पवारांची सुटका होणे आता दुरापास्त आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App