स्वातंत्र्ययोद्धे बाबासाहेब!!


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे फक्त इतिहासकार नव्हते, तर ते कृतिशील विचारवंतही होते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी दादर नगर हवेलीमुक्तिसंग्रामात देखील भाग घेतला होता. त्याची ही अविस्मरणीय आठवण…!!Freedom Fighter Babasaheb !!


बाहेर धो धो पाऊस पडत होता. चुकलो पडत होता नाही तर कोसळत होता. झाडा माडावरुन अन् घरा वरून, कौलावरुन पाणी अगदि धारेसारखे गळत होते. पागोळ्या अव्याहत नुसत्या पाणी सोडत होत्या. सारा परिसर अगदि चिंब चिंब भिजून वहात होता. रानावनात गच्च पाणी दाटले होते. साठलेल्या पाण्याला इतके पोट आले होते की ते कधी वाट फुटतेय असं झाले होते. जवळच्या नदिला पूर आला होता. पूर कसला महापूरच तो. तीच्या वाटेत येणाऱ्या दगड धोंड्यांवरुन उड्या टाकत नाहितर त्यांना वळसे घालून आपल्या कवेत घेत ती धावत होती. ती वेगाने पुढे पुढे उसळत, फेसाळत धावत होती. जवळच्याच एका खोपटात चर्चा चालली होती. आता या ठिकाणाहून आपण माघार घ्यायची कि नाहि याची. आता माघार घेणे इस्ट आहे कि नाहि याची. जो तो आपापले मत आग्रहाने प्रतिपादन करित होता. हाती मिळेल ती हत्यारे पात्यारे खांद्यावर टाकून वा कमरेला अडकावून आलेले ते देशभक्त वीर, जवान गडी आपल्या पुढाऱ्यांची मते आजमावीत होती.

क्षणोक्षणी उत्कंठा वाढत होती. शत्रुच्या मुलुखात येवून त्याचाच जीव घ्यायला सारे आसुसलेले होते. जीव घ्यायचा नाहितर प्रसंगी द्यायचा. कारण रणांगण म्हटले कि हे आलेच. त्या हुरुपाने सारे इथे जमले होते. आपला घर संसार सोडून त्यांनी इथं आघाडी मांडली होती. पुऱ्या तयारीनेच ते आले होते. देशासाठी मांडलेल्या रणात घरदारावर, संसारावर त्यांनी जणू तुळशीपत्रच ठेवले होते. नाहितर जळता निखारा ठेवला होता.

 

आता घर, दार, शेती, वाडी, वतन, जहागीरी, नोकरी व्यापार उद्योग, पैसा अडका, धन दौलत या कशाचाहि मोह त्यांना रोखू शकत नव्हाता. अगदि बायका, पोरं यांचाहि मोह त्यांना या क्षणी थांबवू शकत नव्हता. कोणताच मोह पाश त्यांना अडकावू शकत नव्हता.

त्यांना मोह होता केवळ देशाचा. पाश होता देशसेवेचा. त्याच्या मुक्तीचा. परक्यांनी मायभूच्या गळ्यात अडकाविलेली हि पाशवी पाशाची बेडी तोडून टाकणेसाठी त्यांना हाती जणू अवजड घणच घेतला होता. भले त्या घणाच्या ओला चुकून त्याचे प्रचंड आघाताखाली आपला संसार उघळला तरी त्याची पर्वा नव्हती. मुला लेकरांचा चेंदा मेंदा झाला तरी त्याचा खेद वाटणार नव्हता. अगदि तोच पाश गळ्यात अडकून जीव गेला असता तरी बेहत्तर. हतो वा प्राप्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महि। हा भगवान कृष्णाचा सांगावा त्यांच्या मनात घोळत होता. तीच खरी देशसेवा, तोच खरा मोक्ष, तोच खरा स्वर्ग. अशीच सर्वांची भावना होती. आता आरपारच्या संगरासाठी सारे इथे उतावळे झाले होते.
मात्र या धबाबा कोसळणाऱ्या पावसाने या लढाईचे गणितच बदलू लागले होते. मुळी हि अटितटिची लढाई होणार की नाहि यावर घनगंभीर चर्चा चालली होती. पावसाने जणू या रणांवर पाणी फिरविले होते. त्याला कारणहि तसेच होते. जी परिस्थिती पानिपताचे युद्धात मराठ्यांची झाली, त्यांना दुथडी भरुन वाहणारी यमुना आडवी आली. तसेच आता इथे हि नदि आडवी आली होती. पानिपताचे त्यावेळचे अनेकविध दाखले सांगून एक तरुण आपल्या म्होरक्याला आणि सर्व सहकाऱ्यांना आता माघार घेणे कसे रास्त आहे ते सांगत होता. तो नेता आणि सारे सहकारी ते एकचित्ताने ऐकत होते.

तेवढ्यात दुसरा एक तरुण त्या इतिहासातील दाखले देणाऱ्या युवकावर वीज कोसळावी तसा कडाडलाच.

‘‘भेकड साला! आपण या रणात झुंजायला आलो कि मैदान गांडूसारखे गांडीला पाय लावून पळून जायला. मेलो तरी बेहत्तर. पण इथून आता माघारी जाणे नाहि.’’

‘‘तुम्ही बसा हातात पाटल्या बांगड्या घालून’’

‘‘मी लढणार.’’

‘‘अगदि एकट्याने लढावे लागले तरी.’’

‘‘मी लढणार.‘‘

‘‘एकदा ठरले म्हणजे ठरले.’’

तोफगोळ्यासारखा भडिमारच त्याने केला. अगदी आगच बरसत त्याने अस्सल ठेवणीतल्या मराठमोळ्या चार सहा शिव्या हासडल्या. अगदि आईमाईचा उद्धार करालाहि त्याची जीभ कचरली नाहि. तावातावाने बोलून त्याने आपली वजनदार मुठ समोर रेखलेल्या नकाशावर ठाणकन आदळली. पुढे बोलला, बोलला कसला त्याने जणू आदेशच दिला,
‘‘ए सुधीर या ………. ला हाकलून दे रे इथून.’’

’’असली खोगीर भरती कशाला आणलीय इथं’’

‘‘हि लढाई आहे. तिथे बायाबापड्यांचं काय काम?’’

‘‘बुळचट.’’

त्याचा तो रुद्रावतार, त्याचा राग आणि तो शिव्यांचा भडिमार पाहून सारे थक्कच झाले. तो इतिहास दाखले देणारा तरुण तर अवाकच झाला. आपल्या तोंडातून ‘‘ब्र’’ हि न काढता तो आपल्या म्होरक्याकडे आणि त्या धडधडत्या तोफेकडे आलटून पालटून पाहू लागला. त्या म्होरक्याने थोडा वेळ जावू दिला अन् तो म्हणाला,
‘‘अरे वसंता, असा रागावू नको. हा आपल्याला आता जे सांगतोय नां ते गंमत म्हणून किंवा आपल्याला भिवविण्यासाठी सांगत नाहि. तर सुधारण्यासाठी सांगतोय.’’

‘‘कारण इतिहासात झालेल्या चुकांच्या अध्ययनातून आपण वर्तमानामधे दुरुस्ती करायची असते अन् आपला भविष्यकाळ उत्कर्षाकडे न्यायचा असतो.’’

‘‘हेच इतिहासातून शिकायचे असते.’’

‘‘आणि हा पुण्याचा मोठा अभ्यासक आहे. त्याचे इतिहासाचे ज्ञान गाढे आहे. मराठ्यांचा इतिहास त्याला मुखोद्गत आहे. सारे काहि तारिख वारासह तपशिलवार पाठ आहे त्याला. तसाच तो तुझ्यासारखाच कडवा देशभक्तहि आहे. त्या देशप्रेमातूनच तो देशस्वातंत्र्यासाठी शत्रुरुधीरपान करायला तो इथे आला आहे.’’

‘‘त्याच्या असा उपमर्द करु नकोस. तो त्याचा उपमर्द नसून त्याच्या ज्ञानाचा उपमर्द आहे. तो इतिहासाचा उपमर्द आहे.’’

‘‘जरा सांभाळून बोल.’’

‘‘आणि आजचे विषयात तो केवळ दाखले देतोय. निर्णय नाहि करित’’

‘‘तो आपण करायचाय. सर्वानीं. ’’

वसंताने जरा धुसमुसतच बोलणे केले, ‘‘हं!’’

‘‘पण आता माघार नको.’’ ‘‘ते इतिहासात काहिही असो.’’

‘‘अरे वसंता, पण मागे काय झालें ते ऐकून तरी घे! ’’ इति म्होरक्या.

‘‘सांग रे बाबा, तुझे ते इतिहासाच ज्ञान पाजळ एकदा.’’ वसंता निरुपायाने फुसफुसत म्हणला.

अन् तिथे सारा इतिहासपटच त्या युवकाने सगळ्या सहकार्यासमोर बैजवार मांडला. अगदि नकाशा रेखाटून समजावून दिला. पाण्याचा महापूर अन् उतारापायी पानिपतावर झालेली हानी त्यांने साऱ्यांच्या दृष्टीपुढे मांडली. विषय रणात माघार घेण्याचा नसून योग्य वेळ जाणण्याचा आहे. हे त्यांने आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने पटवून दिले. त्यासाठी किती दाखले दिले अन् किती वेळ गेला ते कोणाला कळाले देखील नाहि. सारे त्याचे ते कथन मंत्रमुग्ध होवून ऐकत होते. आता निर्णयाची वेळ आली आणि सगळे एकमेकाकडे पाहू लागले. तेवढ्यात जेवढ्या जोशात पहिला धडाका लावला होता तेवढ्या धडाक्यात वसंताच म्हणला, ‘‘ये बाबा आता तू एवढं अभ्यासलं ते खरेच आहे रे. तू एवढं सांगलंस ते आम्हाला काय माहित नव्हते. आता तुझ्यामुळे कळलं. तर तुझ्या सांगीप्रमाणे आता आपण माघार घेवू!’’

‘‘अन् परत बळ वाढवून घाव झालू.’’

‘‘शिवाजी महाराजांनी न्हाईका जयसिंगाशी लढताना चार पावले माघार घेतली. तसे यावख्ती आपणहि मागे जावू’’

नेता सुधीरने साऱ्याकडे पाहिले. साऱ्यांनी त्याला होकार भरला. माघारीचा निर्णय झाला. इतका वेळ बेंबीच्या देठापासून शिव्या हासडणारा अन त्या खाणारा असे दोनही तरुण आतापावेतो एकमेंकांचे जणु शत्रु होते ते आता गळ्यात गळे घालून गप्पा मारु लागले.

हा वसंता म्हणजे पंढरपूर नगरीचे भूषण वसंत बाबाजी बडवे. म्होरक्या सुधीर म्हणजे थोर संगितकार सुधीर फडके. आणि तो इतिहास अभ्यासक तरुण म्हणजे ब मो पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे होत. ते स्थान होते पोर्तुगिझ अमलाखालचे सिल्वासा भागातले खेडं. कारण १९४७ ला इंग्रजांच्या जोखडातील भारत मुक्त झाला तरी पोर्तुगालच्या पोर्तुगिझांचे पांढरे पाय १९५२ अुजाडूनहि अजून इथेच दादरा नगर हवेेली भागात घट्ट रोवलेले होते. आणि ते पांढरे पाय समूळ उखडून टाकणेसाठी हि सारी जवान मंडळी जिवाचे रान करुन पेटून उठली होती.

आज इतिहासाच्या अध्ययनातून बोध घेत माघार घेतली. गावी आल्यावर सर्वानी आपले बळ वाढविण्याची तयारी केली. बळ म्हणजे माणुसबळ. मात्र सारे योग्यवेळेची वाट पहात होते. संधी शोधत होते. योग्य वेळ येताच साऱ्यांना निरोप गेले. तारा आल्या अन् हे तरुण पुन्हा दादारा नगर हवेलीच्या मुक्तीसाठी एकवटले. ते मिळून सिल्वासावर चालून गेले. त्यात मुख्य होते सुधीर फडके, सवे अर्थातच ब मो तथा बाबासाहेब पुरंदरे, वसंत बाबाजी बडवे, वसंत नारायण झांजले, विष्णुपंत भोपळे, नाना काजरेकर, पिलाजीराव जाधवराव, राजाभाऊ वाकणकर, आणि बिंदुमाधव जोशी. सोबत अरविंद मनोलकर, संताजी बारंगुळे, शरद जोशींसारखे अगदि मुठभरच सहकारी होतेच. कोणी खांद्यावर बंदुक टाकून, कोणी फरशी कुऱ्हाड परजित, कोणी पिस्तुल कमरेला खोचून अन् खिश्यात गोळ्या घेवून, तर कोणी बाँब हाती घेवून, कोणी तलवार तळपत, तर कोणी अगदि काठी घेवून या स्वारीत सामील झाले होते. शत्रुहाती कोणते शस्त्र असेल तो काय करेल याची धास्ती न घेता हे सारे शत्रु चेंदायचे इराद्याने रणी पडले. या जवामर्द गड्यांपैकीचे गट झाले. कोणी पोलिस चैकीवर, कोणी तहसील कचेरीवर, कोणी गावात जनतेला आवाहन करु लागले त्यांना पोर्तुगीझाविरुद्धचे या युद्धात येण्यासाठी प्रोत्साहन देवू लागले, त्यांची भिती दूर करु लागले, कोणी परके सैन्य शोधून त्याचा पाडाव करु लागले कोणी टेहळणी तर कोणी हेरगीरी करीत होते. त्यांनी सिल्वासा वर हत्यारी आक्रमण केले. सिल्वासा पेटले. पोर्तुगिझ विरुद्ध हिंदुस्थानी असा वणवा भडकला. पोलिसांना अचूक टिपले जावू लागले. घडाघड गोळ्या उडू लागल्या. ठिकठिकाणी ठिणगी पेटली.

सिल्वासा चौकवर हाती बाॅम्ब घेवून वसंत बाबाजींनी हल्ला केला. चौकीतल्या पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी विष्णु भोपळ्यांनी हाती परशु घेवून त्यांचेवर चाल करित असल्याचे दाखविले. केलेली योजना यशस्वी झाली. पोलिसांचे लक्ष विष्णुपंतांकडे गेले आणि वसंतरावांनीं चौकीत उडी टाकली. त्यांचे हातीच्या बाॅम्बचे भितीने पोलिसांनी शरणगती पत्करली. भोपळ्यांनीं आणि वसंतरावांनीे त्यांना बंदि केले. तिकडे तहसील कचेरीवरहि धुमश्चक्रि चालूच होती. इकडे चौकीवरचा पोतुगीझ ध्वज वसंतारावांनी खाली खेचला. तिथे आता स्वतंत्र भारताची विजयपताका मोठ्या डौलाने फडफडू लागली. सिल्वासा मुक्त झाला. दादरा नगर हवेली मुक्त झाली. इंग्रजाबरोबरच पोतुगीझांचे पांढरे पाय उखडले. साऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. डोळ्यात अश्रू तरळले. आपला जन्म सार्थक झाल्याची मनोमनी जाणिव झाली. तो परक्याचा झेंडा संपला. त्याचा चोळामोळा केला गेला. वसंतराव आता तो फाडून जाळून टाकणार तेवढ्यात बाबासाहेबांनी त्यांना थोपविले. ‘‘अरे वसंता तो फाडू नको, तो आपल्या विजयाचे प्रतिक आहे.’ वसंतरावांनी तो ध्वज बाबासाहेबांचे हाती दिला. आजहि तो ध्वज बाबासाहेबांनी जपून ठेवलाय आपल्या विजयाचे प्रतिक म्हणून. विजयचिन्ह म्हणून.

बाबासाहेबांनी इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अभ्यास केला. मात्र त्यातून त्यांनी बोध घेतला आम्ही इतिहासातून काहिच शिकलो याचा. अन् तो न शिकण्याचा नतद्रष्टपणा खोडण्यासाठी त्यांनी कार्य केले. पानीपताची पुनरावृत्ती दादरा नगर हवेलीत होवू दिली नाहि. त्यांनी वेळ पाहून माघार घेतली तसे वेळ येताच समरांगणी हाती शस्त्र घेवून उडी घातली. आपल्या पुर्वजांचा विजिगिषु इतिहास केवळ सांगायचा नाहि तर तो आपल्या जीवनात आचरायचा. त्यामार्गी वाटचाल करायची. त्यासाठी प्रसंगी त्यांनी हाती शस्त्र घेतले. जसे मौर्य चंद्रगुप्ताने अन् चाणक्याने आपली भरतभु सिकंदराच्या हातून सोडविण्यासाठी घेतले तसे. छ. शिवरायांनी यवन आक्रांदकांपासून स्वराज्यनिर्मिती करण्यासाठी घेतले तसे. वीरवर बाजीप्रभु, नरवीर तानाजी मालुसरे यांनी घेतले तसे. धर्मवीर संभाजी राजांनी क्रूरकर्मा औरंगशहाविरुद्ध घेतले तसे. प्रतापी बाजीरावांनी दिल्लीपतीला घाक बसविण्यासाठी घेतले तसे. वीर सावरकरांनी इंग्रजांशी लढताना घेतले तसे. नेताजी सुभाषचंद्रांनी घेतले तसे. इच्छा, आशा, आकांक्षा एकच परक्यांचे दास्यातून मायभूची मुक्ती. तिच्या उत्कर्षासाठी, वैभवासाठी अविरत झटणे. कष्टणे.

तेच खरे इतिहास अभ्यासणे. तेच खरे शिकणे. तेच खरे अनुसरणे. ते बाबासाहेबांनी केले. ते खरे इतिहास अभ्यासक. ते खरे इतिहास आचरक. त्यामुळे बाबासाहेब केवळ ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन करणारे अभ्यासक इतिहासकार नसून सापेक्षी, मुर्तिमंत इतिहासकार आहेत. कारण त्यांनी इतिहास केवळ अभ्यासून सांगितला नाहि तर तो आचरुन सांगितला आहे. तो घडविला आहे. त्यासाठी भरतभूचे चरणी घाम ओतला आहे. आपले रक्त सांडले आहे. आपल्या रुधीराने मायभूचे पादप्रक्षालन केले आहे. हाती शस्त्र धारण करुन या हिंदुभूचे स्वातंत्र्यासाठी रणी झुंजल्याने ते स्वातंत्रयोद्धे आहेत. ते हाती शस्त्र धरते झाल्याने क्रांतिकारक आहेत. परक्या पोर्तुगीझांविरुद्ध युद्धी ठामपणे उभे राहिल्याने ते नरवीर आहेत. इतिहासात घडून गेलेल्या साऱ्या वीरपुरुषांचे ते तशा अर्थाने वारसदार आहेत. कारण त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी इतिहासपुरुषांचे पायावर पाय ठेवीत इतिहास घडविला आहे.

आज नागपंचमी.
बाबासाहेब शताब्दीत प्रवेश करते जाले आहेत त्यांचे चरणी शत शत वंदन !

© आशुतोष अनिलराव बडवे पाटील पंढरपूर

(सौजन्य : फेसबुक)

Freedom Fighter Babasaheb !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात