नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो अनपेक्षित पराभवाचा फटका बसला, त्याचा परिणाम लगेच दिसून आला. संसदेभोवती घराणेशाहीचा फास घट्ट आवळला गेला. Dynasty engulfs parliament, with unexpected loss of BJP
काँग्रेसला लोकसभेमध्ये 99 जागा मिळताच पक्षावर पुन्हा गांधी परिवाराने कब्जा केला आहे. इतकेच नाही, तर पवारांच्या परिवारापाठोपाठ अख्ख्या गांधी परिवाराचीही संसदेत एन्ट्री होणार आहे. राहुल गांधींनी रायबरेलीची जागा आपल्याकडे राखून ठेवून वायनाडची जागा सोडली आहे आणि त्या जागेवर प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. मात्र या सगळ्या प्रकारात लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय मात्र काँग्रेसने लटकताच ठेवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने देशातल्या घराणेशाही विरोधात जोरदार हल्लाबोल केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारात त्यांनी घराणेशाहीवर तिखट प्रहार केले. परंतु, प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्या ऐवजी घराणेशाहीवादी पक्षांना बरे यश मिळाले. पण त्याचा परिणाम म्हणून पवारांच्या घरातले 3 खासदार झाले. त्या पाठोपाठ आता गांधी परिवारातले देखील 3 खासदार संसदेत पोहोचणार आहेत. यापैकी सुनेत्रा पवारांचा लोकसभेत पराभव होऊन देखील अजित पवारांनी त्यांना राज्यसभेची संधी दिली. या निर्णयाला भाजपने पाठिंबा दिल्याने त्या राज्यसभेत बिनविरोध निवडून येऊ शकल्या.
त्यामुळे आता सुप्रिया सुळे लोकसभेत, तर शरद पवार आणि सुनेत्रा पवार राज्यसभेत, असे पवार घरातले संसदेतले प्रतिनिधित्व असेल, तर सोनिया गांधी राज्यसभेत आणि राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी लोकसभेत, असे गांधी परिवाराचे लोकसभेत प्रतिनिधित्व असेल. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या अनपेक्षित अपयशामुळे संसदेत घराणेशाही परतल्याचे फळ दिसेल.
आत्तापर्यंत पवार आणि गांधी परिवारातले प्रत्येकी 3 सदस्य कधीच एकत्रितपणे संसदेत नव्हते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभेत असायचे. त्यामध्ये आता सुनेत्रा पवारांची भर पडली आहे, तर इंदिरा गांधी यांच्या काळापासून स्वतः इंदिरा गांधी आणि संजय गांधी हे लोकसभेत असायचे. राजीव गांधी राजकारणाच्या कक्षेबाहेर असायचे. परंतु, संजय गांधींच्या निधनानंतर त्यांची अमेठीची जागा राजीव गांधींनी भरून काढली. इंदिरा गांधींच्या निधनानंतर रायबरेलीची जागा काँग्रेसच्या इतर नेत्यांनी भूषविली. नंतर ते सोनिया गांधींनी भूषविली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये गांधी परिवारातले फक्त 2 सदस्य संसदेत प्रतिनिधित्व करीत होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लोकसभेत अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीचे प्रतिनिधित्व केले होते. प्रियांका गांधी निवडणूक लढविण्यापासून दूर होत्या.
2019 मध्ये राहुल गांधी वायनाड मध्ये पोहोचून त्यांनी तिथून लोकसभेत प्रतिनिधित्व केले. मात्र आता कायद्यानुसार त्यांना रायबरेली किंवा वायनाड यापैकी एक जागा सोडावीच लागणार होती. वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांच्या जागी काँग्रेसने प्रियांका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नवी दिल्लीतल्या घरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल सहभागी झाले. बाकी कोणतेही नेते त्या बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे काँग्रेसचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय गांधी परिवारातले 3 सदस्य आणि परिवाराबाहेरचे 2 सदस्य यांनी घेतला. तिथेच राहुल गांधी यांनी वायनाड जागा सोडून रायबरेली जागा आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ प्रियांका गांधींनी वायनाडची उमेदवारी करावी हा निर्णयही त्यांनीच घेतला. तो फक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केला.
काँग्रेस संसदीय पक्षाने सोनिया गांधी यांची आधीच संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली आहे काँग्रेसचे संसदेत लोकसभेतले 99 बळ लक्षात घेता पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद येणार आहे. काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीने राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारावे असा आधीच ठराव करून त्यांना विनंती केली आहे. परंतु त्यांनी त्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आता प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवल्यानंतर त्या तिथून निवडून आल्या, तर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते काँग्रेसमध्ये घाटत आहे.
पण या सगळ्याचा खरा राजकीय अर्थ हाच की 2024 च्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने संसदेमध्ये घराणेशाही परतली आहे. किंबहुना आधीच्या घराणेशाहीपेक्षा ती अधिक घट्ट झाली आहे. कारण गांधी परिवारातले 3 आणि पवार परिवारातले 3 असे संसद सदस्य पुढची काही वर्षे घराणेशाहीतून लोकांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App