विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह चालवले म्हणून लोकसभेमध्ये पराभव झाला. मोदी 400 पार गेले तर राज्यघटना बदलतील. आरक्षणावर गदा आणतील असले खोटे नॅरेटिव्ह विरोधकांनी पसरवले. त्याचा फटका भाजप आणि महायुतीला बसला, असे भाजप + शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगून देखील आता दोन महिने उलटून गेले. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे सरकारे सुरूच राहिली. त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू राहिले.
पण जे कार्यक्रम सुरू राहिलेत, त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे सत्ताधारी घटक पक्षाचे नेते जे नॅरेटिव्ह पसरवत आहेत, त्याचे काय करायचे??, त्याला उत्तरे कशी द्यायची??, हा सवाल मात्र महायुतीतला सगळ्यात मोठा भाऊ म्हणून भाजपपुढे “यक्षप्रक्ष” म्हणून समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी पसरवलेले खोटे नॅरेटिव्ह महायुतीचे नेते परतवू शकले नाहीत. ते त्यांचे अपयश सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला समजले. त्यातून ते काही धडाही शिकले हे देखील महायुतीचे नेते जाहीरपणे बोलले, पण त्यापलीकडे जाऊन महाराष्ट्रातले महायुतीचे सरकार चालवताना विशिष्ट नॅरेटिव्ह पसरवणारे अस्तनीतले निखारे जास्त फुलू लागलेत, त्याचे काय करायचे?? हा नेमका सवाल आहे आणि त्याचे उत्तर वेळीच देणे महायुतीतला मोठा भाऊ म्हणून भाजपच्या नेत्यांना भाग आहे.
हे अस्तनीतले निखारे दुसऱ्या तिसऱ्या कोपऱ्यातून आले नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच समोर आलेत. अजित पवारांचा सध्या गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्र दौरा सुरू आहे. ते ठिकठिकाणी जाऊन महिलांकडून राख्या बांधून घेत आहेत. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने”चा “आमची लाडकी बहीण” म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादीच्या पोस्टरवर “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने”चे नाव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परस्पर बदलून टाकले आहे.
पण ही बाब इथपर्यंतच थांबली असती तर हा विषय फारसा पुढेही आला नसता, पण त्या पलीकडे जाऊन सरकारी योजनेची पक्षीय जाहिरात करून सरकारी बैठकांना फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवण्याचे “राजकीय कसब” अजितदादांच्या राष्ट्रवादीने दाखविले. त्यामुळे भाजपचे स्थानिक पातळीवरचे नेते अस्वस्थ झाले. जुन्नर मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून भाजपची जमिनी स्तरावरच्या कार्यकर्त्यांची सगळी अस्वस्थता जाहीरपणे दाखवून दिली. राज्य आणि केंद्रीय पातळीवरचे नेते युती करून बसतात, पण जमिनीस्तरावरच्या कार्यकर्त्यांचे हाल होतात त्याचेच हे निदर्शक होते.
त्यातही राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्ती सारखा पक्ष असेल, तर मग एकीकडे सत्तेच्या वळचणीला बसून आपल्याच मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांची खच्चीकरण करणे ही राष्ट्रवादीची मूलभूत प्रवृत्ती आहे, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे आपणास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ते आता महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या बाबतीत घडताना दिसत आहे. प्रदेश पातळीवरून अजून तरी त्याबद्दल कुठली पावले उचलले गेल्याचे दिसले नाही. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे विशिष्ट नॅरेटिव्ह पसरवणारे अस्तनीतले निखारे ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतून तयार होत चाललेत, त्यांच्यावर मात्र पाणी ओतण्याची नितांत गरज आहे.
CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगींनी तब्बल 125 व्यांदा काशी विश्वनाथाच्या दरबारात लावली हजेरी!
– राजेंद्र शिंगणे बोलले
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे जाहीरपणे म्हणाले मी नाईलाजास्तव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलो. खरं म्हणजे मी शरद पवारांनाच दैवत मानतो, पण जिल्हा बँकेच्या काही व्यवहारांमुळे अडचणीत आलो आणि म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलो. अजितदादांनी मग 300 कोटी रुपये दिले. राजेंद्र शिंगणे यांनी केलेले वक्तव्य हे सत्तेच्या वळचणीला बसून भाजपच्याच नेतृत्वाविषयी शंका निर्माण करण्याचे नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रकार आहे. राजेंद्र शिंगणे बोलून गेले. त्यावर राष्ट्रवादीला कोणी प्रश्न विचारणार नाही. पण महायुतीतला मोठा भाऊ म्हणून भाजपला मात्र प्रश्न नक्की विचारले जाईल, तेव्हा भाजपचे नेते काय उत्तर देणार?? हा कळीचा सवाल आहे.
असाच दुसरा अस्तनीतला निखारा म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी. त्यांनी तर जुन्नरच्या काळे झेंडे प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच स्पष्टीकरण मागितले. तशी त्यांची हिंमत झाली, यातच भाजपच्या नेतृत्वाची खरं म्हणजे किरीकिरी झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी महायुतीतल्या सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना दम भरला होता. आपापल्या नेत्यांना विचारून जे बोलायचे, ते बोला. अनावश्यक बोलू नका, असे ते म्हणाले होते. परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी फडणवीस यांचे ऐकणे तर सोडूनच दिले. उलट ते आता फडणवीसंनाच जाब विचारण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले असतील तर तो अस्तनीतला निखारा वेळीच विझवण्याची जबाबदारी खुद्द अजितदादा आणि फडणवीसांची नाही का??
– राष्ट्रवादीची मूलभूत प्रवृत्ती ठेचणार कशी??
राष्ट्रवादीची मूलभूत प्रवृत्तीच सत्तेच्या वळचणीला बसून मित्र पक्षांना अडचणीत आणण्याची राहिली आहे. अशावेळी आपल्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन प्रसंगी राष्ट्रवादी सारख्या प्रवृत्तीशी दोन हात करण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी फडणवीस किंवा भाजप यांची नाही का??, हा खरा सवाल आहे. आज अमोल मिटकरी थेट फडणवीसांना जाब विचारतात. उद्या ते मोदींना जाब विचारल्याशिवाय राहतील का?? हा ही सवाल आहे. हा सवाल तयार होण्यापूर्वीच अस्तनीतला निखारा विझवणे हे फडणवीस आणि भाजपच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब नाही का?? याचे उत्तर फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांनी प्रत्यक्ष बोलून दिले नाही, तरी कृतीने देतील का??, हा सगळ्यात कळीचा सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more