सल्ले देणारे किती आले… किती गेले… १० जनपथ ना तस्स की मस्स झाले…!!


काँग्रेस नेतृत्वाला सल्ले देणाऱ्या नेत्यांना जेव्हा राज्यांची जबाबदारी दिली, तेव्हा हे नेते ना राज्य जिंकू शकले, ना काही मोठा परफॉर्मन्स दाखवू शकले. आता जे नेते लडत – खडत – अडखळत प्रयत्न करताहेत त्यांना सल्ला द्यायला आणि फर्ड्या इंग्रजीत पत्र लिहायला ते पुढे आले आहेत. त्यांचे १० जनपथने ऐकायचे कारणच काय…?? ज्यांची मूळात जनतेच्या दरबारात राजकीय किंमत कमी आहे त्यांना जास्त किंमत द्यायचे कारणच काय…?? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. why 10 Janpath should not adhere to suggestions by saturday club leaders of the congress?


सल्ले देणारे किती आले आणि किती गेले… १० जनपथ ना तस्स की मस्स झाले…!! असे सलमान खुर्शीद यांची पीटीआयची मुलाखत वाचून म्हणावेसे वाटले. खरेच काँग्रेसने गेल्या कित्येक वर्षात कितीतरी पराभव पाहिलेत आणि पचवलेत. पण काँग्रेसश्रेष्ठींनी ना कोणाचे ऐकले, ना कोणाचे अनुकरण केले. तरीही १० जनपथ बसलेल्या नेतृत्वाला १९९९ पासून कोणीही नाही हलवू शकले ना कोणी आव्हान देऊ शकले.

ज्यांनी आव्हान दिले त्यांना बाहेर जावे लागले आणि आपापले सवतेसुभे संभाळावे लागले. त्यात कोणी यशस्वी झाले. कोणी अपयशी ठरले. कोणी दुसऱ्याच्या पेपरातून स्वतःचे डंके वाजवत राहिले. पण १० जनपथने ना कधी असल्या फुसक्या टिमक्यांचा आवाज ऐकला. ना कधी त्या टिमक्यांना भीक घातली.

ज्यांची राजकीय औकात प्रादेशिक नेतृत्वाची होती, पण त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाचा आव आणला, त्यांना कायमच १० जनपथने “चार घरे अलिकडेच” त्यांची जागा पुरती दाखवून दिली आहे. दिल्लीत जनपथवर जाऊन जरा डोळे उघडून नीट कानोसा घ्या. सगळे कळून येईल.



जिथे प्रादेशिक सुभेदारांची ही अवस्था तिथे सलमान खुर्शीद यांच्यासारख्या आपल्या सुभेदारीत म्हणजे उत्तर प्रदेशात चौथा हिस्सा मिळवून पराभूत होणाऱ्या नेत्याला विचारतेय कोण…?? एक तर ते एवढे महिने होते कुठे?, हा प्रश्न मुलाखतकाराने विचारायला हवा होता. पण तो प्रश्न त्याने विचारला नाही म्हणून त्या प्रश्नाचे खरे – खोटे उत्तर नाही द्यावे लागले त्यांना. पण तरीही हा प्रश्न उरतोच, सलमान खुर्शीद इतके दिवस होते कुठे?? बंगाल, आसाम, केरळच्या निवडणूका सुरू होत्या. त्यावेळी ते गेले होते कुठे?? त्यांनी पक्षाच्या प्रचारात किंवा कामात भाग का नव्हता घेतला?? आणि त्यांनीच कशाला… ज्या जी – २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून वेगवेगळ्या सूचना केल्या होत्या आणि सल्ले दिले होते, त्यापैकी सगळे नेते ५ राज्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी गेले होते कुठे?? त्यांच्यापैकी किती नेते सहभागी झाले होते प्रचारात किंवा पक्षाच्या कामात…??

पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारायचा किंवा सवाल खडे करायचा अधिकार तेव्हा मिळतो, जेव्हा तुम्ही पक्षाच्या कामात असता किंवा पक्षासाठी झोकून देऊन काम करता. सलमान खुर्शीद काय किंवा जी – २३ गटातले नेते काय हे सगळे राज्यसभा सदस्य आणि दिल्लीतल्या सॅटर्डे क्लबचे सदस्य किंवा खान मार्केटचे आवडते नेते आहेत. पक्ष संघटनेशी, पक्ष कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध आलाय केव्हा आणि कुठे??, याचे उत्तर हे नेते कधी देतील काय?? किंवा त्यांना थेट कोणी हा प्रश्न विचारेल काय??

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वावर त्यांचा आक्षेप आहे. असू द्यात ना. पण हे दोन्ही नेते निदान ५ राज्यांमध्ये प्रचाराला गेले. ज्या काही सभा घेतल्या त्या या दोन नेत्यांनी घेतल्या आणि त्यांच्याच सभांना गर्दी जमली होती. सलमान खुर्शीद आणि जी – २३ नेते गेले होते का कधी सभा घ्यायला?? आणि जमवली होती का त्यांनी कधी एवढी गर्दी?? त्यांच्यापैकी किती जणांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूका लढविल्या होत्या काँग्रेसने?? सलमान खुर्शीद गुलामनबी आझाद हे अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि जम्मू – काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष होते. गुलामनबींना तर काँग्रेसने जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. मग या दोन्ही नेत्यांनी उत्तर प्रदेश आणि काश्मीर काँग्रेसची सत्ता आणली काय?? काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली किती जागा जिंकू शकली त्या राज्यांमध्ये??, याचा हिशेब हे दोन नेते देतील काय??

२०१४ आणि २०१९ या सलग दोन पराभवांनमुळे १० जनपथमधले नेतृत्व अडचणीत आले आहे म्हणून सलमान खुर्शीद आणि जी – २३ नेते सल्ला देण्याच्या फंदात पडू शकले आहेत. काँग्रेस नेतृत्व त्यांचे ऐकून घेतेय. नाही तर एव्हाना कारवाई झाली असती या नेत्यांवर.

इथे १० जनपथचे किंवा राहुल – प्रियांकांचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. तसे करण्याचे कारणही नाही. पण खरा मुद्दा हा आहे, की आज त्यांना न मागता सल्ला देण्यासाठी जे नेते पुढे येत आहेत, त्यांचे राजकीय कर्तृत्व काय हे तपासले पाहिजे. त्यांनी असे काय राजकीय कर्तृत्व दाखविले की काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे ऐकून पक्ष वाढीसाठी पुढची पाऊले टाकावीत…??

या नेत्यांना जेव्हा राज्यांची जबाबदारी दिली, तेव्हा हे नेते ना राज्य जिंकू शकले, ना काही मोठा परफॉर्मन्स दाखवू शकले. आता जे नेते लडत – खडत – अडखळत प्रयत्न करताहेत त्यांना सल्ला द्यायला आणि फर्ड्या इंग्रजीत पत्र लिहायला ते पुढे आले आहेत. त्यांचे १० जनपथने ऐकायचे कारणच काय…?? ज्यांची मूळात जनतेच्या दरबारात राजकीय किंमत कमी आहे त्यांना जास्त किंमत द्यायचे कारणच काय…?? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण हा खरा कळीचा मुद्दा आहे…!! हे प्रश्न विचारले की त्यांची “सल्लागारी” बाहेर पडेल…!! आणि मग त्यांना १० जनपथला सल्ला देण्याची राजकीय असाइनमेंट “किती खांबांच्या रोडवरून” नेमकी कोणी दिली हे देखील समजून येईल…!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात